
१९४१-४२ चा काळ... दुसरं महायुद्ध त्याच्या चरण सीमेवर पोहोचतच होतं. अजून एखाद्या वर्षातच हिटलरचा पडता काळ सुरू होणार होता. पण त्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेने निर्णायक आघाडी उघडणं भाग होतं. इंग्रजांचा एक गुण वाखाणण्यासारखा आहे. भविष्यात एखादी घटना घडेल की नाही, याचा थांग नसलातरी ती आपल्याला अनुकूलच घडेल, असा पवित्रा घेऊनच ते पुढल्या जोडणीला लागतात. त्यामुळेच उद्या युद्ध जिंकल्यावर जगाची जी फेरमांडणी होईल ती आपल्याला मनासारखी व्हावी यासाठी चर्चिल आणि रुजवेल्ट यांच्यात शिखर बैठका सुरू झाल्या होत्या. वॉशिंग्टन डी सी मधील अशाच एका बैठकीला हजर राहून चर्चिल लिव्हरपूलहून लंडनला परत येत होते. ही बैठक म्हणजे भविष्यात तयार होणाऱ्या North Atlantic Territorial Organisation (NATO) ची नांदी होती. इंग्लंड बेचिराख करण्याचा हिटलरचा मनसुबा जाहीरच असल्याने विमान वापरणे म्हणजे जोखीमच. त्यामुळे रेल्वेमार्गाने चर्चिल परतत होते. रुळांचा “ खडखड ” आणि वाफेच्या इंजिनाचा तो विशिष्ट “ भक भक ” असा आवाज यांची जोड चर्चिल यांच्या विचारांना मिळाली होती. अशाच एखाद्या वळणावर जर त्यांचं लक्ष खिडकीतून त्या रेल्वेच्या इंजिनावर असलेल्या एका शब्दावर गेलं असतं तर नक्कीच त्यांच्या विचारांची साखळी तुटली असती . तरुण वयात भारतात असताना त्यांचा बराचसा काळ पुणे आणि बंगलोरला गेला होता. पुण्यात असताना हा शब्द त्यांनी ऐकला होता. तोच शब्द या इंजिनावर ठसठशीतपणे सोनेरी अक्षरात लिहिला होता. तो शब्द म्हणजे त्या इंजिनाचं नावच होतं. वाफेची इंजिनं काळाच्या ओघात मागे पडून डिझेल इंजिन आणि त्याही पुढच्या विजेच्या इंजिनाचा काळ कधीच सुरू झालेला असताना मात्र वाफेचं हे इंजिन चर्चिलना घेऊन लंडनला परत निघालं होतं, दिमाखात आणि ऐटीत... स्वतःच नाव मिरवत....
LMS KOLHAPUR 5593...
वारसा जपावा तो ब्रिटिशांनी... नेपोलियनला हरवणाऱ्या नेल्सनचं जहाज “HMS Victory “ दोनशे वर्षे उलटून गेली तरी अजूनही जपून ठेवणारी ही जमात. त्यामुळेच डिझेल आणि विजेच्या इंजिनांच्या जमान्यात मुद्दाम वाफेची इंजिनं डिझाईन करायचा आणि वापरण्याचा हट्ट त्यांनाच शोभतो. युद्धाच्या आधी म्हणजे १९३४ ते १९३६ च्या दरम्यान North British Locomotive Company या ब्रिटिश इंजिनिअरिंग कंपनीने, London Midland and Scottish Railway (LMS) या रेल्वे कंपनीसाठी, नामशेष होणाऱ्या वाफेच्या युगाची आठवण म्हणून वाफेची इंजिनं तयार करून दिली. तब्बल १९१ इंजिनं ! William Stanier या अभियंत्यांच्या कल्पक डोक्यातून तयार झालेल्या या लाल रंगाच्या इंजिनांना नाव पडलं Red Staniers. त्यापैकी १९ एप्रिल १९३५ नंतर म्हणजे पंचम जॉर्जच्या रौप्य महोत्सवानंतर (Silver Jubilee) नंतर जी इंजिनं रुळावर आणली गेली, त्यांना या Silver Jubilee ची आठवण म्हणून Jubilee Class हे नाव चिकटलं. शिवाय प्रत्येक इंजिनाचा विशिष्ट असा नंबर असणारच होता. पहिल्या महायुद्धानंतर इंग्लंडच्या जागतिक साम्राज्याचा पाया कमकुवत व्हायला सुरुवात तर झालीच होती. पण आपल्या या जागतिक साम्राज्याचं कौतुक वाजवणार नाहीत तर ब्रिटिश कसले. Commonwealth Policy च्या अंतर्गत या सर्व इंजिनाना नावं दिली गेली ती मात्र वेगळ्या पद्धतीने. ब्रिटिश कॉमनवेल्थ मधले देश, त्यातले भूभाग, ब्रिटिश अडमिरल, नेव्हल कमांडर, नेव्ही मधील जहाजे आणि ग्रीक पुराणातले योद्धे यांची नावे या इंजीनाना दिली गेली. LMS Australia, LMS Canada, LMS Falkland Island आणि भारतातली नावं म्हटली तर LMS India, LMS Indore, LMS Bombay, LMS Bihar and Orissa. आणि यातल्याच Jubilee Class 5593 इंजिनाचं बारस केलं गेलं ते LMS KOLHAPUR नावाने. होय आपलं कोल्हापूर... राजाराम महाराजांच्या मैत्रीची ब्रिटिशांनी या रूपाने ठेवलेली पावतीच ! या सर्व १९१ इंजिनांच नशीब मात्र वेगवेगळं निघालं. काही पैशाअभावी दुरुस्ती शक्य नसल्याने मोडीत निघाली तर काही अपघातात.. पण यात शेवट पर्यंत टिकून राहिली ती फक्त पाच इंजिनं ! त्या पाचमध्ये सुद्धा दैव फिदा होतं, ते LMS KOLHAPUR 5593 वर.. खुद्द चर्चिलच्या सहवासाचा लाभ तर मिळालाच पण कार्यमुक्त झाल्यावरही या KOLHAPUR 5593 ला ब्रिटिश जनतेचे प्रेम मिळत राहिलं, अजूनही मिळत आहे. आज १९३४ पासूनचा KOLHAPUR 5593 चा प्रवास आपल्याला खुद्द त्याच्याबरोबरच करायचा आहे. इथून सोयीसाठी LMS KOLHAPUR 5593 ला आपण फक्त KOLHAPUR असच संबोधू..
तसं बघायला गेलं तर KOLHAPUR गाजलं ते मात्र सेवानिवृत्त झाल्यावरच. सेवेत असताना खुद्द चर्चिलचं सारथ्य तर केलेल होतंच. १९३४ ते १९४८ पर्यंत KOLHAPUR ने LMS या खाजगी रेल्वे कंपनीअंतर्गत इंग्लंडमधील निरनिराळ्या मार्गांवर सेवा दिली. १९४८ मध्ये British Railways (BR) या सरकारी कंपनीअंतर्गत इतर खाजगी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि LMS 5593 KOLHAPUR ला नवीन नांव मिळालं 45593 KOLHAPUR. दुसऱ्या महायुद्धानंतर विजेच्या इंजिनांची कार्यक्षमता आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातली प्रगती, कोळशाची कमी कमी होत जाणारी उपलब्धता आणि प्रदूषण यामुळे वाफेच्या इंजिनांचा पडता काळ सुरू झाला आणि KOLHAPUR सारखी इंजिने पांढरा हत्ती ठरू लागली. १९६७ मध्ये KOLHAPUR च्या बॉयलरची धडधड थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. बर्मिंगहॅम - लीड्स या मार्गावर शेवटची पॅसेंजर सर्व्हिस करून KOLHAPUR ला निवृत्त करण्यात आले. त्या शेवटच्या फेरीचा एक दुर्मिळ असा फोटो ही उपलब्ध आहे. सेवानिवृत्त झाले तरी KOLHAPUR ची स्थिती अतिशय उत्तम असल्याने जी ५ इंजिने मोडीत न काढता सांभाळायची ठरली त्यात KOLHAPUR चा नंबर अगदी वरचा लागला. BR च्या Special Train Program अंतर्गत KOLHAPUR चे पाहिले Overhaul पुर्ण करुन KOLHAPUR ला रुळांवरून खाली घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि इथं सुरू झाली ती KOLHAPUR ची सेवानिवृत्ती नंतरची नशीबवान गाथा !
 |
| De -Rail करण्याआधी KOLHAPUR ची शेवटची पॅसेंजर सर्व्हिस, १९६७ |
१९६७ साली बॉयलरचे Re-Tubbing करून KOLHAPUR ला ब्रिटिश रेल्वे (BR) ने Tyseley, Birmingham येथील यार्डात कायमचं जतन करून ठेवण्यासाठी हलवलं. इथं त्याची मालकी आली, ती पॅट्रिक व्हाईटहाउस यांच्या Clun Castle Pvt. Ltd या कंपनीकडे. वाफेच्या इंजिनांचं वेड असणारा हा माणूस! पण हे वेड मात्र अतिशय व्यावसायिक होतं. या कंपनीकडे Clun Castle 7029 या Castle श्रेणीतील इंजिनाची मालकी आधीपासूनच होती. या कंपनीकडूनच वाफेच्या इंजिनावर प्रेम करणाऱ्या काही लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेला होता, Standard Gauge Steam Trust. जुन्या इंजिनांना तेल पाणी करून उत्तम प्रकारे सांभाळण्यासाठी विशेष प्रसिद्ध ! या स्टीम ट्रस्टने Tyseley डेपोमधील एक भाग या दोन्ही इंजिनांसाठी ब्रिटिश रेल्वेकडून राखून ठेवला होता. KOLHAPUR ची विक्री करण्याचा निर्णय मात्र अनेकांना पसंत पडला नाही. जॉन बार्नेस नावाच्या ब्रिटिश रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याने तर उघडउघड वृत्तपत्रात ब्रिटिश रेल्वेच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने निक्षून सांगितलं की त्या काळात लंडन ते मॅन्चेस्टर या मार्गावर सर्वोत्तम Jubilee Class इंजिन कुठलं असेल ते KOLHAPUR. |
| Clun Castle Pvt Ltd मध्ये KOLHAPUR... |
इकडे Standard Gauge Steam Trust मध्ये KOLHAPUR चा मायेने सांभाळ सुरु झाला. सुरुवातीच्या पाहणीतच लक्षात आलं की KOLHAPUR चे धुराडे आणि हूड पूर्णपणे गंजून गेलंय. परिस्थिती जवळजवळ हाताबाहेरच होती. पण यातूनही मार्ग निघाला, तो जीम केंट या रेल्वे इंजिनीअर आणि त्याच्या आठ सहकाऱ्यांमुळे. हे सर्वजण मूळचे ब्रिटिश रेल्वेचे कर्मचारी, पण KOLHAPUR वरच्या प्रेमापोटी, सलग चार महिने खपून प्रत्येक शनिवार - रविवार त्यानीं KOLHAPUR साठी दिला आणि KOLHAPUR ला एक नवसंजीवनी दिली. जीम केंटने ब्रिटिश रेल्वे (BR) मधली सरकारी नोकरी सोडून Clun Castle Pvt. Ltd. मध्ये या इंजिनांच्या देखभालीची नोकरी पत्करली. या overhaul मध्ये कोल्हापूरला Jubilee Class चा विशेष असा लाल रंगही (Red Livery) देण्यात आला. पण वाफेच्या इंजिनांचे ग्रह मात्र फिरलेलेच होते. १९६७-६८ या एका वर्षातच ब्रिटिश रेल्वेने उरलेली सर्व वाफेची इंजिने टप्प्याटप्प्याने कालबाह्य करून टाकली. ही सर्व इंजिने इतिहासजमा झाली. अपवाद फक्त Jubilee Class मधली चार पाच इंजिने आणि Clun Castle ७०२९ चा. ही इंजिने जतन करून ठेवण्याचा निर्णय झाला होता. अर्थातच नशीबवान KOLHAPUR ची ही यात वर्णी लागली. या वर्षभरातच Standard Gauge Steam Trust कडून Clun Castle Pvt. Ltd. च्याअंतर्गत अत्यंत व्यावसायिक पद्धतीने KOLHAPUR आणि Clun Castle चा सांभाळ सुरु झाला. वाफेच्या इंजिनांचे युग आता इंग्लंडमध्ये तरी संपले होते. पण शेवटच्या काही शिलेदारांपैकी KOLHAPUR आणि Clun Castle अजूनही शिल्लक होते. या वाफेच्या इंजिनांची आठवण म्हणून २९ सप्टेंबर १९६८ हा दिवस ठरवण्यात आला. टिजली (Tyseley) डेपोमध्ये अनेक कार्यक्रम ठरवले गेले. लाल रंगातल्या KOLHAPUR चे Terrance Cannio या चित्रकाराकडून एक सुंदर असे तैलचित्र काढून घेतले गेले.
 |
| KOLHAPUR चे तैलचित्र |
विशेष आकर्षण होते KOLHAPUR चे नव्या रूपातले खास प्रदर्शन. विशेष म्हणजे KOLHAPUR च्या फोटोंची स्पर्धाही ठेवण्यात आली होती. विजेत्यांना टिजली (Tyseley) डेपोमध्येच KOLHAPUR च्या फुटबोर्ड वर चढून फेरी मारायची संधी मिळणार होती. नव्या रूपातले KOLHAPUR तब्बल एक वर्षाने सार्वजनिकपणे दिसणार होते. त्याला बघायला आणि “ ऐकायलाही ” २९ सप्टेंबर १९६८ रोजी Birmingham मध्ये गर्दी उसळली. Birmingham Daily Post या वृत्तपत्राने तर त्या दिवशी विशेष अंक काढला होता. या पहिल्या वहिल्या Open Day ला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. तो प्रतिसाद बघूनच भविष्यात KOLHAPUR चे असे अनेक ओपन डे घेण्याचे नियोजन ठरले. लोकांच्या मनात वाफेच्या इंजिनांबद्दल कुतूहल, प्रेम आणि आस्था अजूनही शाबूत असल्याचं Clun Castle Pvt. Ltd च्या मार्गदर्शक मंडळाच्या लक्षात आलं. KOLHAPUR आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल असा अंदाज आल्यावर KOLHAPUR च्या देखभालीसाठी Clun Castle Pvt. Ltd ने Tyseley Depot मधील आपले खाजगी यार्ड आता उपयुक्त अशा अवजड यंत्रसामुग्री, स्पेअर्स आणि मशीन्स ने सुसज्ज करून ठेवले. पण या यार्डाबाहेरही KOLHAPUR वर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत होती. त्यामुळे Jubilee Class Preservation Society, Clun Castle Preservation Society असे क्लब उत्साही लोकांनी आधीच तयार केलेले होते. वाफेची इंजिनं आता इतिहास जमा होणार म्हणल्यावर या सर्व क्लबचे एकत्रीकरण करून त्यांची एकच सोसायटी तयार करण्यात आली आणि तिचा अध्यक्ष म्हणून केंट सॉल्ट याची निवड झाली. ही निवड झाल्यावर या पठ्ठ्याने काय करावे ? KOLHAPUR इंजिन स्वतः चालवत त्याने डेपो मध्ये एक फेरी मारली आणि KOLHAPUR ला पुन्हा वाहतुकीसाठी रूळांवर (Main Line) वर आणण्यासाठी लोकांचा रेटा वाढवायचा असा विडाच उचलला. दरम्यान, Clun Castle Pvt. Ltd ने Tyseley Depot मध्ये पुढचा ओपन डे ठरवून ठेवलाही. ४ मे १९६९.
 |
| ४ मे १९६९ च्या ओपन डे ची गर्दी.. |
या वेळच्या ओपन डे ला मात्र पूर्ण व्यावसायिक रूप देण्यात आले होते. या चार तारखेच्या ओपन डे ला तिकीट लावण्यात आलं. KOLHAPUR आणि इतर इंजिनांच्या छोट्या प्रतिकृती, इंजिनांच्या नेमप्लेट्स यांची विक्री करण्याचे स्टॉल्स या ओपन डे मध्ये ठेवण्याचे नियोजन होते. जुन्या रेल्वे आणि रेल्वे स्टेशनची संबंधित पण आता कालबाह्य झालेल्या काही विशिष्ट गोष्टी उदा. स्टेशनवरील जुन्या पद्धतीचे दिव्याचे खांब, नेम पोस्ट, स्टेशनवरील बाकडी, रेल्वेची इतिहास जमा झालेली तिकीटे यांचीही विक्री होणार होती. ४ मे १९६९ चा KOLHAPUR चा हा ओपन डे एकदम हिट ठरला. तब्बल १२००० लोकांनी तिकीटे काढून, रांगा लावून, KOLHAPUR चे दर्शन घेतले. या सर्वातून Clun Castle Pvt. Ltd ला भरगच्च महसूल मिळाला. जर यार्डातच फिरणारे वाफेचे इंजिन जर इतका महसूल देत असेल तर वाहतुकीसाठी पुन्हा रूळांवर (Main Line) आल्यावर, या वाफेच्या इंजिनांनी ओढलेल्या पॅसेंजर डब्यातून प्रवास करण्यासाठी लोकांचा किती प्रतिसाद मिळेल याचा अंदाज आला. कोल्हापूरला मर्यादित स्वरूपात का होईना पण मेन लाईनवर आणले पाहिजे यासाठी हालचाली सुरू झाल्या. KOLHAPUR चे एका पाठोपाठ एक असे ओपन डे भरायला सुरुवात तर झालीच होती. या सर्वात प्रचाराची धुरा सांभाळली होती Birmingham Daily Post ने. ओपन डे ची जाहिरात, आकर्षक फोटो, लुभावणाऱ्या टॅगलाईन्स यांच्यासकट Birmingham Daily Post चा विशेष अंक काढला जायचा. दरम्यानच्या काळात Clun Castle Pvt. Ltd कडे Eric Treacy 5028 नावाच्या अजून एका वाफेच्या इंजिनाची भरती झाली. आता ब्रिटिश जनता KOLHAPUR 5593, CLUN CASTLE 7029 आणि ERIC TREACY 5028 या तीन इंजिनांना Big 3 of Birmingham म्हणून ओळखायला लागली होती. उत्पन्न वाढल्यामुळे Clun Castle Pvt. Ltd ने आता आपल्या Big 3 साठी स्वतःचे हक्काचे घर शोधले. ब्रिटिश रेल्वेच्या डेपोमध्ये आता आश्रितासारखं राहण्याची गरज राहिली नव्हती. ओपन डे चे उत्पन्न आणि बर्मिंगहॅम च्या जनतेने दिलेल्या 50 हजार पौंडांचा उपयोग करून Tyseley येथेच त्यांनी स्वतःचे सुसज अत्याधुनिक असे शेड उभारले.
 |
| ओपन डे मध्ये विक्री केली जाणारी KOLHAPUR ची स्मरणचिन्हे ... |
१९७१ च्या एप्रिलमधल्या एका ओपन डे ला KOLHAPUR वरचे एक विशेष पोस्टल तिकीट जारी करण्यात आले. हे तिकीट आणि इंजिनांची माहिती छापलेली पाकीटे यांची हातोहात विक्री झाली. बर्मिंगहॅम आणि आसपासच्या लोकांची रविवारची सकाळ आता Tyesely Depot च्या दारात सुरु होऊ लागली. कोल्हापूरला बघायला आणि ऐकायला गर्दी होऊ लागली. शेवटी लोकांची इच्छा फळाला आली. ब्रिटिश रेल्वेने मर्यादित स्वरूपात जुन्या वाफेच्या इंजिनंना मेन लाईनवर आणण्यासाठी परवानगी दिली. अर्थातच हा मान मिळाला KOLHAPUR ला. तब्बल दहा वर्षानंतर वाफेचं इंजिन धडधडणार होतं लॅमिंग्टन ते बर्मिंगहॅम या मार्गावर. प्रवासाचं नावही ठरलं, द स्टीम रन. तिकीटाचे दर ठरले, जाहिराती सजल्या आणि KOLHAPUR चे वेगवेगळे फोटो पेपर मध्ये झळकायला लागले. तारीख ठरली ९ सप्टेंबर १९७९. जाहिरातीचा एक भाग म्हणून KOLHAPUR वर आधारित चित्र रंगवा स्पर्धा, KOLHAPUR च्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषा असे उपक्रम घेतले गेले. विजेत्यांना अर्थातच KOLHAPUR ने ओढलेल्या किंगमेकर स्टीम स्पेशल एक्सप्रेस मधून प्रवास करण्याची संधी मिळणार होती. प्रवासाचा कालावधी एक तासापेक्षा कमीच असणार होता. या पहिल्या स्टीम रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि असे अनेक पुढे स्टीम रन आयोजित केले जाऊ लागले. आता KOLHAPUR लोकांच्या जास्त परिचयाचं झालं होतं. तरीही लोकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळे मार्केटिंग फंडे सुरूच होते. अशाच एका ईस्टर संडेला KOLHAPUR चा स्टीम रन ठेवला होता आणि येणाऱ्या पहिल्या साडेसातशे मुलांना बक्षीस होते Easter Eggs, ते ही KOLHAPUR मधून फिरता फिरता. ख्रिसमसच्या वेळी सुद्धा लहान मुलांसाठी सांताक्लॉज भेटायला KOLHAPUR मध्येच येणार आहे अशाही जाहिराती केल्या जात.  |
| KOLHAPUR च्या स्टीम रन च्या विविध जाहिराती... |
 |
| (Main Line) रुळांवर पुन्हा परतण्याची घोषणा |
१९८० चा जुलै महिना उजाडला आणि अचानकच ब्रिटिश वृत्तपत्रांत बातमी झळकली. “ ब्रिटिश सरकारने पुन्हा वाफेचे युग आणायचं ठरवलंय आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसना आता काही ठराविक स्टीम इंजिनं जोडली जातील.” आता इथेही KOLHAPUR चं नशीब जोरावर होतं. नेमकं याच वेळेला CLUN CASTLE 7029 चं overhaul सुरू होतं त्यामुळे मेन लाईनवर व्यावसायिक पुनरागमन करण्याची माळ पडली ती पुन्हा KOLHAPUR च्याच गळ्यांत. २७ सप्टेंबर १९८० रोजी KOLHAPUR, Saultly, Birmingham येथून एक एक्सप्रेस घेऊन निघाले. प्रवास संपणार होता Didcot, Oxfordshire येथे. जवळपास १४५ मैलांचा हा प्रवास होता. तब्बल तेरा वर्षानंतर KOLHAPUR व्यवसायिक पद्धतीने प्रवासी वाहतूक करणार होते. अर्थात हा प्रवासही कुठल्याही अडथळ्याशिवाय पार पडला. या मोठ्या कामगिरीमुळे कोल्हापूर बद्दलची उत्सुकता वाढीला लागली. जवळपास 50 वर्षांच्या या इंजिनाचे नाव KOLHAPUR का ? याबद्दल आता ब्रिटिश पेपरमधून विचारलं जाऊ लागलं. एक सर्वसाधारण अंदाज असा होता की KOLHAPUR हे भारतातील रेल्वे उद्योगाशी संबंधित सर्वात मोठे शहर आहे आणि त्याचंच नाव या इंजिनाला दिलं गेलयं. ज्या काळात भारतात रेल्वे मार्ग विस्तारला तेव्हा मुख्य मार्गावर स्थानही नसलेल्या या कोल्हापूर शहराबद्दल ब्रिटिश जनतेला किती हा अंधविश्वास म्हणायचा ? अर्थातच हा भ्रमाचा भोपळा फुटला. न्यू दिल्ली रेल्वे म्युझियमचे डायरेक्टर Tyesely भेटीसाठी आले असताना, त्यांनी कोल्हापूर शहराबद्दलची वस्तुस्थिती समजावून सांगितली. |
| अडीच वर्षांच्या अज्ञातवास संपून re-commissioning झाल्यावर .. |
|
१९८१ पर्यंत KOLHAPUR हेरिटेज रन्स, स्टीम रन्स या मध्ये स्थिरावले होते. पण प्रत्येक गोष्टीचा कालावधी ठरलेला असतो. त्यात KOLHAPUR म्हणजे एक लोखंडी सांगाडाच. या आधीचे जीम केंट ने केलेले overhaul होऊन १३ वर्षे झाली होती. बॉयलर इन्स्पेक्शन आणि इतर तांत्रिक परीक्षणातून आता एका मोठ्या नव्या overhaul ची गरज KOLHAPUR ला असल्याचे स्पष्ट झाले. १९८२ मध्ये KOLHAPUR ला पुन्हा de-rail केले गेले. या वेळचा overhaul मात्र क्रिटीकल असणार होता. अनेक पार्ट्सची झीज झाली होती. नव्या तंत्रज्ञानाशी मेळ घालणारे सुटे भाग मिळत नव्हते. पण या अडचणीही तितक्याच ताकदीने सोडवल्या गेल्या. नवे पार्ट्स Cast, Forged आणि Machined केले गेले आणि अडीच वर्षात KOLHAPUR पुन्हा उभे राहिले. या Prized, Privileged Locomotive ला पुन्हा रुळावर आणण्यासाठी निमित्त सुद्धा खासच होते. इंग्लंडमध्ये ( किंवा जगात म्हणा हवंतर) रेल्वे, रुळावर धावायला लागून १५० वर्ष झाली होती. त्यासाठी जो विशेष प्रदर्शनीय कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्यात ड्यूक ऑफ ग्लुसेस्टरशायरला घेऊन एक विशेष एक्सप्रेस सहभागी होणार होती आणि तिचं सारथ्य करणार होतं अर्थातच KOLHAPUR. त्याआधी KOLHAPUR चा re-commissioning सोहळा सुद्धा मोठ्या थाटात पार पडला होता. यात एक वेगळी बाब म्हणजे KOLHAPUR चा Jubilee Class विशेष असा लाल रंग काढून घेऊन त्याला हिरव्या रंगात नटवले गेले होते. पण लोकांनी मागणी केल्यामुळे पुन्हा लाल रंग त्याला दिला गेला. पुढच्या वर्षी KOLHAPUR ला प्रतिष्ठेच्या शेक्सपियर एक्सप्रेसचं सारथ्य करण्याचाही मान मिळून गेला. Birmingham आणि Stratford-On-Avon दरम्यान धावणाऱ्या शेक्सपियस एक्सप्रेसला KOLHAPUR 5593 आणि CLUN CASTLE 7029 दोघेही उपलब्धतेनुसार सारथ्य करायचे. याच काळात KOLHAPUR 5593 आणि CLUN CASTLE 7029 दोघांनी ही एक विक्रम केला. पन्नास वर्षापेक्षा जास्त कार्यरत राहणारी ही दोन वाफेची इंजिनं ठरली आणि उत्सवप्रिय ब्रिटिश जनतेनेही ही घटना साजरी केली. Tyesely Depot मध्ये विशेष Champagne Buffet आयोजित करण्यात आले. जोडीला दिवसभर Jazz Band ही ठेवला होता. आता KOLHAPUR ची प्रदर्शनं वारंवार व्हायला लागली होती त्यामुळे देखभालीचा खर्चही वाढला होता. त्याबद्दल नाराजी व्यक्त होऊ लागली. तेव्हा तात्काळ खुलासा केला गेला की KOLHAPUR ची देखभाल करण्यासाठी ब्रिटिश करदात्यांचा एकही पाउंड वापरला जात नाही. KOLHAPUR च्या प्रदर्शनीय उत्पन्नातून आणि दिलेल्या देणग्यांमधून त्यासाठीचा खर्च केला जातो. या संदर्भात KOLHAPUR च्या एका चाहत्याने सार्थ उद्गार काढले आहेत,
“We spend our money, not only for preserving a part of our heritage but at the same time trying to foster a belief in our country's history, ability to learn from our past mistakes and belief in a real future for our country.”
 |
| KOLHAPUR च्या Steam Runs च्या जाहिराती... |
 |
KOLHAPUR च्या Steam Runs च्या जाहिराती... |
१९८७ ते १९९७ पर्यंत न थकता KOLHAPUR काही विशेष स्टीम रन्स आणि प्रदर्शनी रन्स करतच होते. यादरम्यान फक्त एकदाच म्हणजे १९८८ साली एका प्रवासाच्या फेरी दरम्यान त्याच्यात बिघाड झालेला आढळला. अशा वेळी एका दुसऱ्या इंजिनाची मदत घेऊन ही फेरी पूर्ण करण्यात आली होती. १९९७ पर्यंत निरनिराळ्या डेपोंना, स्टेशन्सना Loan Basis वर देऊन इंग्लंडमधील जनतेला वाफेच्या युगात घेऊन जाण्याचे काम KOLHAPUR ने इमाने इतबारे पार पाडले. याच काळात आधुनिक Management systems नी Clun Castle Pvt. Ltd. मध्ये प्रवेश केला. त्यांच्या मार्गदर्शक मंडळांनी आपल्या business चे सरळ दोन भाग पाडले. जुन्या वाफेच्या इंजिनाची देखभाल करणारा विभाग Tyesely Locomotive Works या नावाने आणि वाफेच्या इंजिनाच्या प्रवासी फेऱ्या आयोजित करणारा विभाग Vintage Trains या नावाने. अशा थेट दोन कंपन्याच स्थापन करण्यात आल्या. KOLHAPUR ची देखभाल आता Tyesely Locomotive Works करणार होते. १९९७ मध्ये KOLHAPUR च्या बॉयलरची एक्सपायरी डेट आली. आता मात्र दोनच पर्याय Tyesely Locomotive Works पुढे होते. एक तर पुन्हा ओव्हरऑल करून नवीन बॉयलर बसवा किंवा यार्डात फक्त निष्क्रिय अवस्थेत कोल्हापूरला प्रदर्शनीय नमुना म्हणून ठेवा. शेवटी सबसे बडा रुपय्या ! KOLHAPUR 5593 ची धडधड १९९७ सालापासून कायमची थांबलेली आहे. पण ब्रिटिश जनतेचे प्रेम मात्र अजूनही अबाधित आहे. या लोखंडी सांगाड्यावर ब्रिटिश जनतेने इतके प्रेम केले की KOLHAPUR ही एक आख्यायिका बनली. फोटोग्राफी स्पर्धा, चित्र स्पर्धा, हेरिटेज डिस्प्ले या माध्यमातून अजूनही KOLHAPUR 5593 अजूनही जीतं जागतं आहे. The Golden Jubilee, The Story of LMS Jubilee Class Locomotive, Kolhapur 5593 हे पुस्तक ही KOLHAPUR वर अँड्र्यू मालकम यांनी लिहिले आहे.
 |
| KOLHAPUR वर प्रकाशित झालेले पुस्तक... |
पण KOLHAPUR ची ही सुप्तावस्था तब्बल २५ वर्षे टिकली. २०२२ च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने KOLHAPUR चा वापर एक event म्हणून खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी येईल का याची चाचपणी सुरू झाली. रुळावर आणायचा खर्च मोठा होता. पण Tyesely Locomotive Works चे डायरेक्टर, यांनी संस्थेच्या मदतीबरोबरच लोक वर्गणीतून पैसा उभा करण्याचा घाट घातला. Crowd Funding साठी The Kolhapur Club स्थापन करण्यात आला. मदतीचा ओघही सुरू झाला. पण KOLHAPUR च्या नशिबात मात्र रुळावर येणं नव्हतं त्यामुळे कॉमनवेल्थ गेम साठी केलेला प्लॅन अस्तित्वात येऊ शकला नाही. आता २०२४ मध्ये KOLHAPUR च्या overhaul चा अंदाजे खर्च जवळपास ७५०००० पौंडांवर पोचलाय. अर्थातच हा खर्च आता आवाक्याबाहेर गेलाय त्यामुळे KOLHAPUR पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आता मावळली असं आपण समजू शकतो. नुकत्याच झालेल्या घडामोडीनुसार यावर्षी KOLHAPUR चे ओव्हरऑल न करता त्याची विक्री करण्याचा निर्णय Tyesely Locomotive Works ने घेतलाय. विशेष म्हणजे खरेदीदार लगेच मिळून गेला. जानेवारी २०२४ मध्ये वेस्ट कोस्ट रेल्वेच्या David Smith यांनी KOLHAPUR ची रीतसर खरेदी केली. अर्थातच मालक बदलला म्हणून KOLHAPUR ची प्रतिष्ठा आणि ब्रिटिश जनतेचे त्याच्यावरचे प्रेम कमी होणार नाही. गेल्या ९० वर्षातल्या घडामोडीही हेच दाखवतात. १९३४ पासून आजपर्यंत अनेक चढउतार पाहिलेलं KOLHAPUR 5593 हे इंजिन यापुढेही ब्रिटिश जनतेला इतिहासातील सफरी घडवून आणेल हे नक्की. असं वेगळं नशीब घेऊनच ते जन्माला आलंय.
आता या KOLHAPUR ला इंग्लंडमध्येच सोडून आपण आपल्या कोल्हापुरात परत येऊ. तसं बघायला गेलं तर या KOLHAPUR मध्ये आणि आपल्या कोल्हापूर मध्ये कुठलाच संबंध नाही. तरीही मला या KOLHAPUR वर का लिहावंसं वाटलं आणि वाचकांना सुद्धा हा थोडा कंटाळवाणा वाटणारा लेख इथपर्यंत का वाचावासा वाटला ? खरंतर याच उत्तर आहे. “ कोल्हापूर ” हे नाव! कोल्हापूर हे फक्त पंचगंगेच्या दक्षिण तीरावर वसलेलं नसून निरनिराळ्या प्रकारे कोल्हापूरचा वारसा जगभर पसरलेला आहे. कोल्हापूर बाहेर कोल्हापूर अनेक ठिकाणी सापडतं. अगदी काही उदाहरणच द्यायची झालीच तर,
१८५७ च्या बंडात कोल्हापुरातून अंदमानात धाडलेले कैदी
१८७० मध्ये लंडन ते अमेरिका आणि लंडन ते भारत अशी जगातली पहिली समुद्राखालून पाठवलेली तार प्रक्षेपित करताना असलेली कोल्हापूर छत्रपतींची लंडनमधील उपस्थिती
दुसऱ्या महायुद्धात जर्मन सेनानी रोमेलच्या आफ्रिका कॉर्पसच्या विरुद्ध लढलेले शहाजी छत्रपती महाराज आणि कोल्हापूरचे सैनिक.
मराठवाडा मुक्ती संग्रामात निझामाच्या विरुद्ध केलेल्या पोलीस कारवाईत सहभागी झालेले राजाराम रायफल्स चे कोल्हापुरी सैनिक
फ्लोरेन्स मध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी आणि त्यांच्या आठवणींना समर्पित केलेला Bridge To India हा पूल.
या सर्व मालिकेत KOLHAPUR इंजिन अगदी चपखल बसतंय….
 |
| KOLHAPUR 5593.... |
KOLHAPUR चे काही विडिओ..
- २०२२ च्या Commonwealth Games साठी KOLHAPUR साठी मदतीचे आवाहन करताना Tyesely Depot चे डायरेक्टर.
- Tyesely Depot मधली KOLHAPUR ची एक झलक.
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
( या विषयावर मराठीमध्ये लिहिलेला हा पहिला लेख आहे, हे मी नम्रपणे आणि खात्रीने नमूद करतोय.)
जय हो कोल्हापूर 5593
ReplyDelete