ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!

कुदळीचा घाव बसला आणि दगडी चौथऱ्याचं झाकण उघडून आतली गोलाकार पारदर्शक पेटी उचकटली गेली. जमिनीवर पडली. फुटली. आणि आतली धूळ, राखंच म्हणा की, सगळीकडे पसरून विरून गेली. दिवस होता २७ ऑक्टोबर १८७७. कोल्हापुरच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित दिवस. अंधाऱ्या रात्री आकाशात वीज चमकून एखादी दुर्मिळ वस्तू फक्त काही क्षण दिसावी आणि पुन्हा कधीच न सापडण्यासाठी अंधारात हरवून जावी असा प्रसंग कोल्हापूरसाठी या दिवशी घडला. कोल्हापुरच्या इतिहासात सर्वात जुनी, अगदी दोन अडीच हजार वर्षे पुरातन अशी एक मानवी निर्मिती अपघातानेच सापडली आणि पुढच्या काही काळात पुन्हा कधीच न दिसण्यासाठी हरवून गेली तो हा दिवस !!! 


खाराळा बाग ! कोल्हापूरच्या तटबंदीपासून पुर्वेकडे असणारा आणि आजच्या लक्ष्मीपुरीचा, आईसाहेब महाराज पुतळ्यापासून जयंती ओढ्यापर्यंत पसरलेला  थोडा उताराचा भाग. उत्तरेकडे हीच खाराळा बाग चौफाळ्याच्या माळापर्यंत म्हणजे आजच्या दसरा चौकापर्यंत विस्तारलेली. तसा त्याकाळच्या मानाने गावाबाहेरचाच परिसर. या बागेत एक दोन बंगले.  यातल्याचं एका बंगल्या सभोवती असणाऱ्या बागेचं काम निघालं होतं. भर घालून बागेची जमीन समान करायचं काम काढलं होतं. आणि यासाठी जुंपल होतं कारागृहातील कैद्यांना. म्हणजे नक्कीच हा एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा किंवा कोल्हापूर दरबारात मोठ्या पदावर असणाऱ्या असामीचा बंगला होता. बंगल्यापासूनच ओढ्याच्या काठावरच एक मातीचा ढिगारा होता. जवळपास आठ फूट उंच आणि ऐंशी फूट व्यासाचा ढिगारा होता तो. शेजारचं बाभळीचं झाड आणि ढिगाऱ्यावरचं माजलेलं गवत बघून कळतच होतं की संपूर्णपणे दुर्लक्षित आणि कुठलीही वहिवाट नसणारा हा भाग होता. बागेत भर घालण्यासाठी या ढिगाऱ्यातली माती घ्यायचं काम कैद्यांनी सुरू केलं. काही फूट खणल्यावर मातीच्या भाजक्या विटांच बांधकाम दिसायला लागलं. भाजक्या विटांचं बांधकाम त्याकाळात कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी खोदकामात आढळायचं त्यामुळे ही बाब कुणाला इतकी महत्वाची वाटली नाही. पण अजून उकरल्यावर एक दगडी चौथऱ्यासारखा भाग समोर आला. लाल जांभा दगड वापरून हा चौथरा बनवला होता. आजूबाजूची माती बाजूला केल्यावर त्याचं खरं स्वरूप नजरेला आलं. प्रत्यक्षात एक दगडी पेटीचं होती ती. दोन भागात बनवलेली. वरचा भाग म्हणजे अतिशय कौशल्याने बसवलेलं त्याचं झाकण होतं. या कामगारांनी जोर लावून ते झाकण उचकटायाचा प्रयत्न केला. आणि त्या धामधुमीत ते झाकण अचानक उघडून ही दगडी पेटी एका बाजूला कलली आणि त्या पेटीत असणारा अजून एक छोटा स्फटिकाचा पारदर्शक करंडा उडून खाली पडला आणि फुटला. आणि त्यात असणारी राख खाली पडून  नाहीशी झाली. आता कामगारांचं लक्ष गेलं ते दगडी झाकणावर. त्याच्या आतल्या बाजूला काही अक्षरं कोरलेली होती. कुणालाही त्याचा अर्थ समजत नव्हता. मात्र काहीतरी महत्वाचं सापडलंय याची नक्की खात्री झाली. कोल्हापूर दरबारचे कारभारी महादेव वासुदेव बर्वे जातीने तिथं आले. आणि त्यांनी आजूबाजूला अजून काळजीपूर्वक खोदकाम करायला लावलं. पण विशेष काही सापडलं नाही. त्यांनी फुटलेला करंडा आणि दगडी पेटी तिच्या झाकणासह ताब्यात घेतली. झाकणावर असलेल्या अक्षरांचा ठसा मुंबईला रॉयल एशियाटिक सोसायटीचे प्राच्यलिपी तज्ञ पंडित भगवानलाल यांचे कडे पाठवून दिला. आणि त्यातून बाहेर आला  धक्कादयक आणि कोल्हापूरचा गौरवशाली ईतिहास !!!

पंडित भगवानलाल यांनी ठामपणे सांगितलं की त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळलेले विटांचे बांधकाम म्हणजे एका बौद्ध स्तुपाचे अवशेष होते. त्याचबरोबर दगडी पेटीच्या झाकणावर कोरलेल्या अक्षरांचा त्यांनी खुलासा केला. ती लिपी मागधी होती आणि त्यावर कोरलं होतं, 

" ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं "

 त्या अनुषंगाने त्यांनी दिलेली माहिती अशी...

" गौतम बुद्धांचे महानिर्वाण झाल्यावर दहनानंतर त्यांच्या अस्थी आणि रक्षा चार ठिकाणी जतन करून ठेवण्यात आल्या. 

१. कपिलावस्तू, त्यांचं जन्म गाव.

२. गया, जिथं ज्ञान प्राप्ति झाली.

३. काशी, जिथं त्यांनी पहिलं प्रवचन दिलं.

४. कुशीनगर जिथं त्यांचं दहन झालं. 

त्या ठिकाणी विशाल स्तूप उभारून त्यांचे अवशेष जपले गेले. पुढे सम्राट अशोकाच्या काळात हे अवशेष या स्तूपांमधून काढून बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी हजारो बौद्ध भिख्खू स्वतः बरोबर भारतभर घेऊन गेले. आणि ठिकठिकाणी सोने, चांदी किंवा स्फटिकांच्या करंड्यांमधून हे अवशेष स्तूप बांधून स्थापित केले गेले. भारतात  मध्य प्रदेशातील सांची, पंजाब मधील मनिक्याल, बिहार मधील कियुल आणि अनेक ठिकाणी तर अफगाणिस्थान, श्रीलंकेत असे स्तूप आजही अस्तित्वात आहेत. त्याचं श्रेणीमधला एखादा स्तूप कोल्हापुरात नक्की होता असं परिस्थितीजन्य पुराव्यावरून दिसतयं. "

कारभारी बर्वे यांनी रेसिडेंट श्नायडर यांना लिहिलेलं या घटनेची माहिती देणारे पत्र...

कारभारी बर्वेनी ती दगडी पेटी, तिचं झाकण आणि फुटलेला करंडा ताब्यात घेतला. या घटनेचं महत्व त्यांच्या लक्षात आलं. शिस्तबद्ध ब्रिटिश नोकरशाहीचा तो काळ होता. रीतसर त्यांनी पत्र लिहून याची वर्दी कोल्हापूरचे पॉलिटिकल रेसिडेंट फ्रेडरिक श्नायडर यांना दिली. श्नायडर यांनी हा मुद्दा मुंबई इलाख्याच्या गव्हर्नर ऑफिसमध्ये कळवून रॉयल एशियटिक सोसायटीच्या योग्य त्या अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची विनंती केली. आजही हा पत्र व्यवहार उपलब्ध आहे. किंबहुना या पत्रव्यवहारामुळेच या घटनेची हकीकत अगदी इत्यंभूतपणे समजते. विशेष म्हणजे ही दगडी पेटी, तिच्यावरची कोरीव अक्षरं आणि स्फाटिकाचा करंडा यांचं रेखाचित्र बर्वेनी काढून घेऊन मुंबईला पाठवलं होतं.

कारभारी बर्वे यांनी तयार करवून घेतलेलं दगडी पेटी आणि त्यामधील स्फटिकाच्या करंड्याचे चित्र. यावर बर्वेंची सही  सुद्धा दिसत आहे. 

 

"ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं"  मागधी लिपीतील अक्षरे ..

या घटनेवर काही दिवसातच डॉ. रामकृष्ण भांडारकर यांनी एक शोधनिबंध वाचला. त्यांत अशी दगडी पेटी, स्फटीकाचा करंडा, राख हे भारतात अजून कुठे कुठे आढळतात याची यादीच दिली. कोल्हापुरात आढळलेले अवशेष म्हणजे ब्रम्ह नावाच्या व्यक्तीने दानरुपात दिलेला व धर्मगुप्ताकरवी बांधून घेतलेला एक बौद्ध स्तूप आहे हे सप्रमाण सिद्ध केले. या मातीच्या ढिगाऱ्याच्या आसपास अजून उत्खनन करावे अशी शिफारस त्यांनी केली. पुढच्या काळात दुर्दैवाने या घटनेला योग्य त्या प्रमाणात उजाळा मिळालेला दिसत नाही. कारण रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नल मध्ये या घटना आणि शोधनिबंध प्रकाशित झाल्यावर ब्रिटिश सरकार आणि कोल्हापूर दरबार यांनीही इतर कार्यव्यस्तत्तेमुळे या संदर्भात पुढाकार घेतलेला दिसत नाही. 

आता उत्सुकता उरते की ही नक्की जागा कोणती ? 

सुदैवाने ब्रिटिश पी डब्लू डी खात्याने १८६७ ते १८७१ दरम्यान सर्व्हे करून १८७७ साली प्रकाशित केलेला कोल्हापूर शहराचा एक नकाशा आहे. त्यात खाराळा बागेतला बंगला स्पष्ट दिसतो. आजच्या मापाने या बंगल्याची नेमकी जागा ही मुस्लिम बोर्डिंग आणि पोलीस लाईन यांच्या जवळपास येते. तर त्या मातीच्या ढिगाऱ्याचं ठिकाण हे नेमकेपणाने अजून पूर्वेकडे म्हणजे सरस्वती हॉस्पिटलची मागची बाजू आणि कोंडाओळ पुलाच्या मध्ये येते. ही लक्ष्मीपुरी बाजारपेठ ज्यावेळी विस्तारली, नवी बांधकामे झाली त्यावेळी ही तिथं नक्कीच खोदकाम झालं असणारचं आहे. पण काही पुरातन वस्तू सापडल्याचा उल्लेख त्यानंतर कुठेही आढळत नाही. 

१८७६चा कोल्हापूर शहराचा नकाशा. यात डाव्या बाजूला लाल चौकटीत टाऊन हॉल दिसतोय तर उजवीकडे पिवळ्या रंगात खाराळयातला बंगला आहे. 


आजची स्थिती ... लाल चौकट खाराळ्यातल्या बंगल्याची जागा तर निळी चौकट मातीच्या ढिगाऱ्याची जागा दाखवते. जयंती ओढा आणि इतर ओळखीची ठिकाणे यावरून बौद्ध स्तूपाच्या जागेचा अंदाज लावता येतो .


खाराळ्यातल्या या घटनेनंतर अगदी महिनाभरातच शिवाजी पुलाच्या कोल्हापूर बाजूच्या कमानीचे बांधकाम सुरू असतानाच बौद्ध पूजेतील काही वस्तू आणि सोन्याच्या दागिन्यांचे अवशेष मिळाले. म्हणजे खाराळ्यातल्या बौद्ध स्तूपासाठीचा हा एक प्रत्यंतर पुरावाच मिळाला. एकेकाळी कोल्हापुरात बौद्ध संस्कृती, हा स्तूप बांधणारा कुणीतरी ब्रम्ह आणि धर्मगुप्त यांच्या रूपाने नांदली आणि त्यांनी कोल्हापूरच्या इतिहासात सर्वात प्राचीन अशी मानवी निर्मिती केली. हे सर्वात प्राचीन साक्षीदार जसे अचानक सापडले तसे अचानक काळाच्या पडद्याआडही गेले. कोल्हापूर, एक गाव म्हणून घडताना ज्या काही मानवी खुणा इथं रुजल्या त्यापैकीच हे बौद्ध संस्कृतीचे अवशेष आज फक्त अस्तित्वातुनच नाही तर अगदी आठवणीतूनही गेलेले आहेत. आणि याला जबाबदार ही आपण कोल्हापूरकरच आहोत !!

या घटनेवर लिहिणारा मी काही पहिला नव्हे. कोल्हापुरात आजही अनेक अभ्यासू व्यक्तींना या घटनेबद्दल इत्यंभूत माहिती आहे. पण गेल्या १४५ वर्षात या संदर्भात पुढे काहीच घडले नाही. त्या दगडी चौथऱ्याचे, स्फटिकाच्या करंड्याचे पुढे काय झाले याबद्दल काहीच माहिती कळत नाही. मुंबईत रॉयल एशियाटिक सोसायटीत मी तरी जमेल तसा शोध सुरूच ठेवणार आहे.

© भारत महारुगडे

९८२२४४९८५६

#आठवणीतलं_कोल्हापूर..


विशेष आभार:

The Journal of The Asiatic Society of Bombay 1878

Comments

  1. Excellent....!

    ReplyDelete
  2. अप्रतिम माहिती.... दुर्दैवाने इतिहासातील हे दुर्मिळ दुवे आपल्या कोल्हापुरात जपले गेले नाहीत.

    ReplyDelete
  3. फारच छान काम करत आहात आपण

    ReplyDelete
  4. खूप मौल्यवान काळाचा मागोवा घेता आहात, आपल्या कार्याला सलाम!!!

    ReplyDelete
  5. Useful information 👍

    ReplyDelete
  6. Very interesting information which highlights ancient history of Kolhapur in Buddha era.Thanks a lot for your valuable information.

    ReplyDelete
  7. वा, भारत!! कुठून कुठली काय काय माहिती मिळवता!! कोल्हापूर परिसरात प्राचीन बुध्द संदर्भात काही पुरावे सापडले हे आश्चर्यकारक आहे!! हे पहिल्यांदा वाचले! धन्यवाद!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...