सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...
सिंक्लेअर बंगला कोल्हापूर ट्रंक रोड आणि कोल्हापूर मेल रोड ही रस्त्यांची नावं, आजच्या काळात तशी डोक्यावरून जाणारीच ! पण, हे दोन रस्ते म्हणजे कोल्हापूरचा भूतकाळ जिवंत करणारे राजमार्गच आहेत. यातला कोल्हापूर मेल रोड म्हणजे आजचा पुणे बंगलोर हायवे. याच्यावरचा ऐतिहासिक पूल काल-परवाच आपण इतिहासात जमा करून टाकला. (ऐतिहासिक का ? कारण हा कोल्हापूर संस्थानातला सर्वात पहिला पूल.) पण हे असं दुर्दैव कधीही कोल्हापूर ट्रंक रोडवर येणार नाही याची खात्री बाळगा. कारण या ट्रंक रोडवर पावला पावलावर कोल्हापूरच्या भूतकाळात शिरायचे दरवाजे अजूनही शाबूत आहेत. या ट्रंक रोडमुळेच कोल्हापूरला स्वतःचा एक वारसा निर्माण करता आलाय. आणि याच कोल्हापूर ट्रंक रोडवर जवळपास दीडशे वर्षे उभा आहे “ Palace of Sinclair ” सिंक्लेअरचा बंगला ! होय, बंगलाच !. याच्याबद्दल माझ्याकडे तशी ओझरती माहिती होती पण नक्की ठिकाण काही गवसले नव्हते. नव्याने काही गोष्टी वाचण्यात आल्या आणि जागेची निश्चिती झाली. प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन वाचलेल्या गोष्टींचा पडताळा घेतला. आणि समोर आला धडधाकट, एकही चिरासुद्धा न हललेला सिंक्लेअरचा बंगला ! मला त...