विम्बल्डन आणि कोल्हापूरचं अनोखं नातं, " कोल्हापूर कप "
" इंग्लंडने कॅनडाला हरवून विम्ब्लडन येथे पहिला कोल्हापूर कप जिंकला." जुलै १८७१... " इंग्लंडने १०० व्या वेळेला अतिशय मानाचा असा कोल्हापूर कप जिंकला." जुलै २०२३... विश्वास बसणार नाही अशा या बातम्या आहेत. पण तब्बल १५२ वर्षांपासून, प्रत्येक जुलै महिन्यात, इंग्लंड आणि जिथं जिथं राणीचं राज्य रुजलं अशा गोऱ्या वसाहतींमधल्या वर्तमानपत्रात कुठलाही खंड न पडता त्या प्रसारित होत आहेत. फक्त विजेत्या आणि उपविजेत्या संघाचं नाव त्यांच्या कामगिरीनुसार दरवर्षी बदलेलं असतं. दीडशे वर्षांहून अधिक काळ राणीच्या देशात, कोल्हापूरच्या नावाची एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा अखंडितपणे सुरू आहे याची कल्पना खुद्द कोल्हापूरकरांनाही नसेल, नव्हे नाहीच ! सामान्यपणे आम्हा कोल्हापूरकरांची " जग " ही संकल्पना, दक्षिणेला कात्यायनीच्या डोंगरापासून सुरू होऊन, रंकाळ्याच्या काठाकाठाने, पेठेतील गल्ल्या ओलांडून, अंबाबाईला नमस्कार करत करत, गूळ, मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा यांच्याभोवतीच गोल गोल फिरत, उत्तरेला पंचगंगेच्या काठी येऊन थांबते. त्यामुळे पंचगंगेच्या पलीकडेही असलेल्या जगात कोल्हापूरकरानी जे अफाट ...