" इंग्लंडने कॅनडाला हरवून विम्ब्लडन येथे पहिला कोल्हापूर कप जिंकला." जुलै १८७१...
" इंग्लंडने १०० व्या वेळेला अतिशय मानाचा असा कोल्हापूर कप जिंकला." जुलै २०२३...
विश्वास बसणार नाही अशा या बातम्या आहेत. पण तब्बल १५२ वर्षांपासून, प्रत्येक जुलै महिन्यात, इंग्लंड आणि जिथं जिथं राणीचं राज्य रुजलं अशा गोऱ्या वसाहतींमधल्या वर्तमानपत्रात कुठलाही खंड न पडता त्या प्रसारित होत आहेत. फक्त विजेत्या आणि उपविजेत्या संघाचं नाव त्यांच्या कामगिरीनुसार दरवर्षी बदलेलं असतं. दीडशे वर्षांहून अधिक काळ राणीच्या देशात, कोल्हापूरच्या नावाची एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा अखंडितपणे सुरू आहे याची कल्पना खुद्द कोल्हापूरकरांनाही नसेल, नव्हे नाहीच ! सामान्यपणे आम्हा कोल्हापूरकरांची " जग " ही संकल्पना, दक्षिणेला कात्यायनीच्या डोंगरापासून सुरू होऊन, रंकाळ्याच्या काठाकाठाने, पेठेतील गल्ल्या ओलांडून, अंबाबाईला नमस्कार करत करत, गूळ, मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा यांच्याभोवतीच गोल गोल फिरत, उत्तरेला पंचगंगेच्या काठी येऊन थांबते. त्यामुळे पंचगंगेच्या पलीकडेही असलेल्या जगात कोल्हापूरकरानी जे अफाट कर्तुत्व एकेकाळी गाजवलय त्याची महती आणि माहिती, माहित करून घेण्याची गरज कधी लागलीच नाही. जिथं वारसा ही सर्वात दुर्लक्षित करण्याची बाब समजली जाते, अशा कोल्हापुरात, इंग्लंड मध्ये दरवर्षी घेण्यात येणाऱ्या कोल्हापूर कप बद्दल माहिती असणे ही अवघड गोष्ट आहे. याचं खरं कारण, आपण कोल्हापूर फक्त कोल्हापुरातच बघतो, शोधतो. असो..आज कोल्हापूर कप विषयी....
 |
राजाराम छत्रपती, कोल्हापूर |
तसं बघायला गेलं तर या कोल्हापूर कपची सुरुवातच आपल्या राजाराम कॉलेजच्या देखण्या इमारतीपासून होते. अर्थात, हा संबंध आपल्या मानण्यावर आहे. याच इमारतीचा पाया रचून राजाराम छत्रपती (थोरल्या शाहू महाराजांचे आजोबा) १८७० साली समुद्र उल्लंघन करून साहेबाच्या राज्यात जाणारे पहिले हिंदू राजा ठरले. व्यवस्थित इंग्रजी बोलणाऱ्या या अतिशय हुशार आणि चिकित्सक वृत्तीच्या तरुण राजाची भुरळ कोल्हापूरचा पोलिटिकल एजंट कर्नल जी. एस. ए. अँडरसनपासून ते मुंबई प्रांताचा गव्हर्नर सर बार्टल फ्रियर पर्यंत सर्वांनाच पडली होती. कोल्हापूरच्या सुधारणेचं ध्येय डोक्यात घेतलेल्या या तरुण राजाची इच्छा, एक भव्य शाळा बांधून इंग्रज सरकारने पुरी करायचे ठरवले. आणि याचाच परिपाक म्हणजे आजची राजाराम कॉलेजची इमारत ! जगाबरोबर चालणारा कोल्हापूरचा हा पहिला राजा. कोल्हापुरात राहून कोल्हापूरबाहेरच्या जगाबद्दल कायम कुतूहल असलेल्या महाराजांच्या मनात, त्याकाळी पुढारलेल्या युरोपमधील बातम्या ऐकून आपणही इंग्लंड दौरा करावा अशी इच्छा घोळू लागली. यथावकाश आपले खाजगी कर्मचारी आणि इंग्रज अधिकारी यांना बरोबर घेऊन महाराज इंग्लंडला पावते झाले. हा दौरा अनेक अर्थानीं आणि विविध घटनांनी गाजला. राणी विक्टोरियाची सदिच्छा भेट, ब्रिटिश पार्लमेंटचा अभ्यास दौरा, तिथले पहिले भारतीय खासदार दादाभाई नौरोजी तसेच भारतातून निवृत्त होऊन इंग्लंडला परत गेलेल्या पण कोल्हापुरशी संबंधित असलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी तर झाल्याच, पण एका विशेष घटनेचा, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा, साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या या करवीर छत्रपतींना लाभलं.
" Trance Oceanic Telegram Service " म्हणजेच समुद्रखालुन केबल्स टाकून, इंग्लंडहून अमेरिका आणि भारतात तार पाठविण्याची सुरुवात राजाराम छत्रपतींच्या उपस्थितीतच झाली. ब्रिटिश राजपुत्राने लंडनहून पाठवलेल्या तारेला अवघ्या पाच मिनिटात कलकत्याहून व्हाइसरॉयने धाडलेलं उत्तर बघून महाराजांना इंग्रजांच्या प्रगतीचा आवाका लक्षात आला. याच दौऱ्यादरम्यान युरोप मधील सुंदर इमारती बघून कोल्हापुरात देखील अशीच एक सुंदर इमारत बांधायची इच्छा त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. त्यांची हीच इच्छा आज कोल्हापुरात न्यू पॅलेसच्या रूपात ऊभी आहे. पुढे दहा वर्षांनी जरी न्यू पॅलेसची प्रत्यक्ष उभारणी सुरू झाली, तरी शिलान्यास मात्र महाराजांच्या मनात इंग्लंड दौऱ्यामध्येच झाला होता. मनमिळावू स्वभावामुळे राजाराम महाराज तिथल्या अधिकारी वर्गाचे आणि नागरिकांचे ही कुतूहलाचा विषय बनले होते. त्यांच्या दिनक्रमाच्या बातम्या त्यावेळच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आजही वाचायला मिळतात. त्यांनी कुठल्या स्टुडिओत जाऊन फोटो काढून घेतले, इथपर्यंत त्यांच्याबद्दल वार्तांकन केले जात होते. इंग्लंड मध्ये अनेक लोकप्रिय ठिकाणाहून महाराजांना भेटीची आमंत्रण तर येत होतीच आणि महाराज देखील ती स्वीकारत होते. अशाच एका भेटीसाठी महाराज विम्बल्डन येथे गेले. ही भेटच पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेला कारण ठरणार होती. ही भेटच कोल्हापूर कपच्या रूपाने अजरामर होणार होती ! एकोणिसाव्या शतकातलं विम्बल्डन त्यावेळी टेनिस पेक्षाही गाजत होतं ते नेमबाजीच्या स्पर्धानी. National Rifles Association (NRA) च्या वार्षिक नेमबाजी स्पर्धा खूप आधीपासूनच, १८६० पासून विम्बल्डन येथे भरत होत्या. Imperial Meeting या नावाने त्या स्पर्धा ओळखल्या जात. खुद्द राणी व्हिक्टोरियाने रायफलने गोळी झाडून Imperial Meeting ची सुरुवात केलेली होती. NRA तर्फे घेतली जाणारी वार्षिक Imperial Meeting म्हणजे इंग्लंड मधील नेमबाजी मधील मानाचं पान.. ब्रिटिश लोकांना त्यांच्या लढवय्या वृत्तीची जाणीव व्हावी आणि त्यांच्यात नेमबाजीची आवड निर्माण व्हावी यासाठी हौशी नागरिक तसेच कसलेल्या सैनिकांच्या विविध पद्धतीच्या नेमबाजी स्पर्धा Imperial Meeting अंतर्गत, NRA तर्फे विम्बल्डन येथे भरवल्या जात. २० जुलै १८७० रोजी राजाराम महाराज अशाच एका Imperial Meeting साठी उपस्थित राहिले. लोखंडी रुळावरून हरणाचे लोखंडी चित्र अतिशय वेगाने सोडायचे आणि त्यावर रायफलने नेमबाजी करायची असा प्रकार होता तो. कोल्हापुरात असला प्रकार कधीही न पाहिलेले महाराज, या पद्धतीच्या स्पर्धेने अतिशय प्रभावित झाले. त्यांनी तिथेच NRA ला १०० पौंडाची देणगी देऊन टाकली. इतकंच नाही तर वार्षिक वर्गणी १० पौंड सुद्धा सुरू करून टाकली. त्यानंतर महाराज युरोप मधील इतर देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले.
 |
रुळावरून, पळत्या लोखंडी हरणावर नेमबाजी करण्याची स्पर्धा..
|
यानंतरचा काळ मात्र खुद्द राजाराम छत्रपति आणि कोल्हापूर दोघांसाठीही खडतर ठरला. युरोपचे थंड हवामान न मानवल्याने इटलीतील फ्लॉरेन्स येथे राजाराम महाराजांना अवघ्या विसाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू आला. आजही तिथल्या अर्नो नदीकाठी त्यांचं स्मृतिस्थळ आहे. ( त्या संदर्भातील घटनांवर एक वेगळा लेख मी याआधी लिहीलाय ). ही घटना एकंदरीत कोल्हापुरचं पुढलं राजकारण आणि समाजकारण यावर दूरगामी परिणाम करणारी ठरली. त्यांचा मृत्यू इंग्लंडमध्येही अनेकांना चटका लावून गेला. अतिशय शिष्ट समजला जाणारा ब्रिटिश समाजही हळहळला. या पार्श्वभूमीवर NRA ने एक निर्णय घेतला. वार्षिक Imperial Meeting मध्ये होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये, राजाराम महाराजांच्या स्मरणार्थ नेमबाजीची एक नवी स्पर्धा आयोजित करायचं ठरवलं आणि तिला नाव दिलं,
 |
१८७१ साली कोल्हापूर कप साठी बक्षीस म्हणून दिली जाणारी चांदीच्या कपांची जोडी...
|
The Raja of Kolapore's Imperial Challenge Cup.
बोलीभाषेत हीच स्पर्धा Kolapore Cup म्हणून ओळखली जाऊ लागली. NRA ने महाराजांनी दिलेल्या देणगीचा वापर करून चांदीच्या कपांची एक जोडी बक्षीस म्हणून देण्यासाठी करून घेतली. हाच कोल्हापूर कप. सुरुवातीचा काही काळ हा कप फिरत्या स्वरूपात ठेवला गेला होता. वसाहतींमधून आलेल्या एका राजाच्या नावाची ही स्पर्धा फक्त ब्रिटिश नागरिकांकरिताच न ठेवता जगभर पसरलेल्या ब्रिटिश वसाहतींमधील नागरिकांचाही यात सहभाग असावा असं मुद्दाम ठरवण्यात आलं. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळली जाणारी कोल्हापूर कप ही पहिली स्पर्धा होती. आजचे ऑलिंपिक सामने सुद्धा खूप नंतर म्हणजे १८९६ मध्ये सुरू झालेत. पहिल्या वर्षी तयारीला आणि नियम ठरवायला खूपच कमी वेळ होता. तरीही कॅनडाचा २० सदस्यीय संघ यात इंग्लंड विरुद्ध सहभागी झाला. अपेक्षेप्रमाणे Home Country इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली. पुढील वर्षापासून मात्र संघांची संख्या वाढली आणि स्पर्धेचा आवाकाही वाढला.
 |
१८७५ च्या कोल्हापूर कप साठी सुरु असलेली नेमबाजी. अतिशय दुर्मिळ फोटो. नियम असे ठरले. प्रत्येक संघ हा आठ जणांचा असेल. वसाहतींचे संघ हे त्या त्या देशातील उत्कृष्ट नेमबाज नागरिक आणि सैनिकांमधून निवडण्यात येतील. पण या स्पर्धेसाठीचा प्रवासखर्च त्या त्या संघाने मात्र स्वतःच करायचा होता कारण सहभागी देश त्यांच्या संघाचा खर्च करणार नव्हते. त्यामुळे सुरुवातीची अनेक वर्षे ही स्पर्धा हौशी स्पर्धकांसाठीच असल्यासारखी होती. मात्र नंतरच्या काळात स्पर्धेची प्रसिद्धी वाढल्यावर मात्र या संघांचा प्रवासखर्च हा त्या त्या देशांनी प्रायोजित करायला सुरुवात केली. प्रत्येकी २००,५०० आणि ६०० यार्डांवरून नेमबाजी केली जाईल असा नियम ठरला. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला तीन वेगवेगळ्या अंतरावरून नेम घेता येईल असे ठरले. प्रत्येक स्पर्धकाने प्रत्येक अंतरावरून सात वेळा लक्ष्यभेद करायचा होता. जो संघ जास्त गुण मिळवेल तो विजेता. आणि चंदेरी कपांची जोडी अर्थात कोल्हापूर कप हा त्या वर्षांकरिता विजेत्या संघाला मिळेल. फिरता चषकच म्हणा की. |
 |
१८८२ च्या कोल्हापूर कपचा गुणफलक.. |
पण इंग्लंडच्या संघाबद्दल मात्र थोडा वेगळा नियम लावायचा ठरला. त्यांचे एकापेक्षा जास्त संघ असतील असे ठरले. एक संघ इंग्लंडमधील सैनिक आणि नागरिकांचा. एक संघ इंग्लंडमध्ये रजेवर असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आणि एक संघ भारतात कर्तव्यावर असणारे ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय नागरिक यांचा. या अधिकाऱ्यांचा हा संघ म्हणजेच British India चा संघ. प्रत्यक्षात मात्र इंग्लंडमधील सैनिक आणि नागरिकांच्या संघाने कोल्हापूर कप मध्ये इंग्लंडचे जास्त प्रतिनिधीत्व केलेले आहे. British India चा संघ यात भाग घ्यायला पुढे खूप काळ जावा लागला. जर्सी, गर्न्सी अशी ब्रिटिश खाडीतील काही बेटे, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून Victoria आणि Queensland हे परगणे आधी निरनिराळे आणि नंतर एकत्रित ऑस्ट्रेलिया म्हणून असे राणीला मानणारे ब्रिटिश वंशाचे काही देश आणि ब्रिटिश वसाहती हिरीरीने यात भाग घेऊ लागल्या. पुढे १९०८ साल येई पर्यंत कोल्हापूर कपची ख्याती ऐकून वेस्ट इंडीजचा संघ ही यात समाविष्ट झाला. सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा संघ " Victoria आणि Queensland " अशा दोन संघात विभागून कोल्हापूर कप मध्ये भाग घ्यायचा. पण खुद्द इंग्लंड मधून दबाव वाढल्यावर १८८६ साली ऑस्ट्रेलिया एक देश म्हणून यात सहभागी झाला आणि कोल्हापूर कप ही Imperial Meeting मध्ये सर्वात जास्त लोकांनी बघितली जाणारी जागतिक पातळीची स्पर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली. Well Established Anglo Colonial Rifle Match.तोपर्यंत भारतात कोल्हापूर सारख्या काही संस्थानांमुळे नेमबाजीला राजाश्रय मिळून Western India Rifle Association सारख्या शिखर संघटनेने मूळ धरायला सुरुवात केली होती. कागलकर, जयसिंगराव आबासाहेब घाटगे (शाहू महाराजांचे जनक वडील) यांचा यात मोलाचा वाटा होता.
 |
भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जे एच रीव्हेट कॅरनाक
यांचं कौतुक करणारी The Graphic मधील बातमी. खुद्द भारताचा व्हॉईसरॉयच या संघटनेचा पॅट्रॉन होता. या संघटनेचा एक फायदा मात्र झाला. या संघटनेकडून कोल्हापूर कप साठी भारतातून संघ पाठवण्याचा दबाव वाढायला लागला. या स्पर्धेत पुढे भारताचं नाव गाजवल ते रेव्हरंड फर्ग्युसन डेव्ही यांनी. पंजाब लाईट हॉर्स या पलटणी चे धर्मगुरू असणाऱ्या डेव्ही यांचा नेम बघायला कोल्हापूर कप मध्ये गर्दी लोटली होती अशा नोंदी आहेत. त्यांच्या शिवाय उल्लेख करावा असे नाव म्हणजे जे एच रीव्हेट कॅरनाक यांचं. बंगाल सिव्हील सर्व्हिसेस मधला अतिशय वरिष्ठ पदावरचा अधिकारी. त्यानंही भारताकडून कोल्हापूर कप गाजवला. पण भारताकडून प्रत्यक्ष भारतीय वंशाच्या व्यक्तीनी इंग्लंड मध्ये जाऊन कोल्हापूर कप मध्ये सहभाग नोंदवल्याचे उल्लेख मात्र नाहीत. याच मुख्य कारण म्हणजे प्रवास खर्च आणि भारतीयांना मिळणारी दुय्यम दर्जाची वागणूक हेच असावं. पुढे कोल्हापूर कपची वाढती लोकप्रियता बघून नेमबाजीला इंग्लंडच्या बाहेरही वसाहतींमध्ये प्रोत्साहन मिळावे म्हणून, अशीच एखादी स्पर्धा इंगलडबाहेर भारतात किंवा इतरत्र ब्रिटिश अमलाखालील देशांत सुरू करण्याच्या सूचना यायला लागल्या. या सूचना करणारे होते लेफ्टनंट कर्नल नेव्हील चेंबरलेन. ( इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन, हे ते नव्हेत. ) त्याचाच परिणाम म्हणून १८८९ पासून Bombay Presidency Rifle Association च्या मार्फत नेमबाजीचा कोल्हापूर कप भारतात सुद्धा सुरू झाला. एका वर्षी पुण्यात भरलेल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण खुद्द राजर्षी शाहू महाराजांनी केल्याचे देखील उल्लेख आहेत. पण भारतातील कोल्हापूर कप मात्र पुढे अनेक वर्षे खेळला गेल्याचे उल्लेख मात्र नाहीत. |
 |
| Maple Leaf Team 🍁 in Kolapore Cup 1875 |
पण १८७१ ते आजतागायत, दोन्ही महायुद्धाचा काळ सोडल्यास इंग्लंडमधील कोल्हापूर कप मात्र दरवर्षी अजूनही खेळवला जातोय. आजपर्यंत या स्पर्धेत इंग्लंडने तब्बल १०० वेळा जेतेपद मिळवलय. पण प्रेक्षकांची खरी पसंती मात्र मिळायची कॅनडा संघाला. Maple Leaf Team 🍁 असं लाडाचं नाव असलेल्या या संघाने १८७५ च्या कोल्हापूर कप मध्ये धमाल केली होती. Home Country इंग्लंडचा संघ उशिरा आल्यामुळे कॅनडाला विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. पण खिलाडूवृत्तीने कॅनडाचा संघ प्रत्यक्ष स्पर्धा खेळायला तयार झाला. आणि चमत्कार घडला. १८७१ पासून १८७४ पर्यंत अपराजित राहीलेल्या इंग्लंडला धूळ चारून त्यांनी कोल्हापूर कप पहिल्यांदाच जिंकला. १८९० सालपासून मात्र कोल्हापूर कप विम्बल्डन ऐवजी बिज्ले (Bisley) येथे खेळवला जाऊ लागला. विम्बल्डन येथे वाढत्या नागरिकरणामुळे नेमबाजीची स्पर्धा घेणे धोक्याचे ठरू लागले. त्यामुळे NRA ने संपूर्ण Imperial Meeting बिज्ले येथे हलवली. आजही तिथेच या स्पर्धा घेतल्या जातात. विसावं शतक सुरू झाल्यावर ज्युनिअर कोल्हापूर कप देखील बिज्ले येथे खेळावला जाऊ लागला. काळ लोटला, स्पर्धा मुरली आणि नियम सुद्धा कडक बनत गेले. पुढे पुढे वैयक्तिक कामगिरीसाठी सुद्धा कोल्हापूर कप द्यायला सुरुवात झाली. १९०२ साली ऑस्ट्रेलियाने गाजवलेल्या कोल्हापूर कप मध्ये गाजलेला खेळाडू विलियम टॉड याला वैयक्तिक कामगिरीसाठी दिलेला कोल्हापूर कप ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स म्युजियमने जपून ठेवला आहे. आजही पीढ्यानपीढ्या कोल्हापूर कप मध्ये कर्तुत्व गाजवलेली घराणी इंग्लंड आणि कॅनडा मध्ये आहेत. बिज्ले मध्ये अजूनही Imperial Meeting दरवर्षी अनेक दिवस चालते. राजा, राणी आणि अनेक सरदार उमराव यांच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीच्या नेमबाजी स्पर्धा बिजले इथं Imperial Meeting मध्ये हरसाल भरतायत. १८७१ च्या कोल्हापूर कप नंतर Imperial Meeting मध्ये इतरही जागतिक स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. आत्ता बघायला गेलं तर त्यातलीच एक स्पर्धा म्हणजे कोल्हापूर कप. पुढे पुढे जगावरील इंग्रजी साम्राज्याचा भर ओसरल्यावर व ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ स्पर्धांच्या भव्यतेपुढे या स्पर्धेचा प्रसिद्धीच्या बाबतीत संकोच झालेला असला तरी Imperial Meeting मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी पहिली स्पर्धा हे कोल्हापूर कप चे वेगळेपण मात्र अजूनही अबाधित आहे. या अर्थाने कोल्हापूर कप ही इंग्रजी साम्राज्यांतर्गत घेतल्या जाणाऱ्या Commonwealth Games ची पूर्वसुरी स्पर्धा म्हणता येईल.
 |
कोल्हापूर कप विजेता कॅनडा संघ |
 |
कोल्हापूर कप विजेता ऑस्ट्रेलीया संघ |
यावर्षीच्या, २०२३ च्या कोल्हापूर कप साठी इंग्लंड संघाच्या खेळाडूंचे नामांकन पत्र...
नावात काय आहे ? असं
विचारणाऱ्याच्या देशाने मात्र कोल्हापूरचे नाव या नेमबाजी स्पर्धेच्या
रूपाने अगदी घट्ट धरून ठेवलय, आणि तेही दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ. ही
पुण्याई आहे राजाराम छत्रपतींची. राजेपणाचा बडेजाव बाजूला सारून, माणसं
जोडून निर्माण केलेलं नातं किती घट्ट असत, याचं उदाहरण म्हणजे कोल्हापूर कप.
कोल्हापूर
कप मध्ये भेदलेल्या प्रत्येक लक्ष्याचे तरंग कुठेतरी कोल्हापुरात देखील
नक्कीच उठले असणार आहेत. कारण याच शहराने गेल्या कित्येक वर्षात भारतातले
अव्वल नेमबाज तयार केलेले आहेत. जयसिंगराव कुसाळे यांच्या पासून तेजस्विनी
सावंत, राही सरनोबत यांच्यापर्यंत आणि भविष्यातही पुढेही नेमबाजांची परंपरा
कोल्हापुर जोपासणारच आहे. हीच या कोल्हापूर कपची खरी कमाई आहे. कोल्हापूर
बाहेरही कोल्हापूर आहेच फक्त आपण ते शोधलं पाहिजे. आणि यांचं उदाहरण म्हणजे
कोल्हापूर कप !!!
 |
१९०२ साली ऑस्ट्रेलियाच्या विलियम टॉड याला वैयक्तिक कामगिरीसाठी दिलेला कोल्हापूर कप . |
१९१९ साली पहिल्या महायुद्धानंतरचा कोल्हापूर कप
टीप : हा या विषयावर आतापर्यंत लिहिला गेलेला पहिला आणि एकमेव लेख आहे हे मी नम्रपणे आणि खात्रीने सांगू इच्छितो. सप्टेंबर २०२३.
The Bisley Boys: The Victorian Rifle Team and The Kolapore Cup 1897
The Saint James Budget 1901
The Pall Mall Budget 1885
The Diary of The Late Rajah of Kolhapur
Chhatrapaties of Kolhapur - Manohar Malgaonkar
करवीर रियासत - स. मा. गर्गे
Very interesting and detailed research article on a topic that should be brought to the forefront. I am surprised that this is not a public common knowledge in Kolhapur. Excellent piece of journalism !!!
ReplyDelete