लोकराजाच्या कौतुकाची कमान
राजर्षि शाहू छत्रपतींच्या अंतरंगाचा ठसा कोल्हापूरातल्या कणा कणावर उमटला आहे. आज १०० वर्षांनंतर देखील त्यांच्या पाऊलखुणा कोल्हापूरात जागोजागी दिसतात. कोल्हापूरातली लहान मुलं देखील शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची पुण्याई सांगणारी अनेक ठिकाणे सहज ओळखू शकतात. पण शहरात शाहू महारांजांशी संबंधित कित्येक जागा, वास्तू अशा आहेत ज्या फक्त लोकांच्या अज्ञानामुळे उपेक्षित आहेत. ही अशाच एका वास्तूवैभवाची चित्तरकथा !!! नोव्हेंबर १९१३.. बऱ्याच काळानंतर मुंबईच्या गव्हर्नरची भेट कोल्हापूरात ठरली होती. लॉर्ड विलिंग्डन सगळा जामानिमा घेऊन कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. निमित्त होतं शाहू छत्रपतीनी ब्रिटिश राजघराण्यातील लोकांचे संगमरवरी पुतळे घडवून घेतले होते त्याचा ब्रिटिश सरकार तर्फे स्वीकार करण्याचे. शिवाय रिवाजाप्रमाणे कोल्हापूर दरबारतर्फे जे समाजोपयोगी उपक्रम चालत होते त्यांची पाहणीही करणे. संस्थान काळात सरकारी पाहुणे येणार म्हटल्यावर कोल्हापूर नव्या नवरीगत नटायचं. आत्ताच्या भावसिंगजी रोडच्या आजूबाजूची घरे चुना आणि गेरूनं रंगवली जायची. पताका लावल्या जायच्या. अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल, ...