लोकराजाच्या कौतुकाची कमान
राजर्षि शाहू छत्रपतींच्या अंतरंगाचा ठसा कोल्हापूरातल्या कणा कणावर उमटला आहे. आज १०० वर्षांनंतर देखील त्यांच्या पाऊलखुणा कोल्हापूरात जागोजागी दिसतात. कोल्हापूरातली लहान मुलं देखील शाहू महाराजांच्या कर्तृत्वाची पुण्याई सांगणारी अनेक ठिकाणे सहज ओळखू शकतात. पण शहरात शाहू महारांजांशी संबंधित कित्येक जागा, वास्तू अशा आहेत ज्या फक्त लोकांच्या अज्ञानामुळे उपेक्षित आहेत. ही अशाच एका वास्तूवैभवाची चित्तरकथा !!!
नोव्हेंबर १९१३.. बऱ्याच काळानंतर मुंबईच्या गव्हर्नरची भेट कोल्हापूरात ठरली होती. लॉर्ड विलिंग्डन सगळा जामानिमा घेऊन कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. निमित्त होतं शाहू छत्रपतीनी ब्रिटिश राजघराण्यातील लोकांचे संगमरवरी पुतळे घडवून घेतले होते त्याचा ब्रिटिश सरकार तर्फे स्वीकार करण्याचे. शिवाय रिवाजाप्रमाणे कोल्हापूर दरबारतर्फे जे समाजोपयोगी उपक्रम चालत होते त्यांची पाहणीही करणे.
संस्थान काळात सरकारी पाहुणे येणार म्हटल्यावर कोल्हापूर नव्या नवरीगत नटायचं. आत्ताच्या भावसिंगजी रोडच्या आजूबाजूची घरे चुना आणि गेरूनं रंगवली जायची. पताका लावल्या जायच्या. अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल, टाऊन हॉल आणि राजाराम कॉलेज चकचकीत केले जायचे. सुदैवाने आजच्या सारखं स्वागतासाठी फ्लेक्स उभारायची पद्धत नव्हती. तर त्यावेळी रस्त्यारस्त्यावर कमानी उभारून पाहुण्यांचं स्वागत केलं जायचं. त्यावेळचा शब्द वेशी उभारल्या जायच्या.
बऱ्याच काळानंतर येणाऱ्या गव्हर्नरचं स्वागत कोल्हापूरच्या इतमामाला साजेसं करायचं ठरलं. हुकूम सुटले, मार्ग ठरले आणि कोल्हापूरचे प्रमुख रस्ते पताकांनी आणि वेगवेगळ्या वेशीनी सजले. पण यात उठून दिसत होती ती टाऊन हॉल जवळ उभी केलेली एक आकर्षक गोणपाटाची वेस. आकाराने मोठी होतीच ती, पण तिच्यावरचं रंगकाम, रेखीवपणा इतका सुरेख होता की दगडाची खरी वेसच वाटत होती. कोल्हापूरात अशी देखणी वेस आजपर्यंत उभारली गेली नव्हती. टाऊन हॉल समोर गव्हर्नरला बघण्यापेक्षा ही कमान बघायलाच गर्दी जमली होती. रस्त्यावरून जाणारी गव्हर्नर आणि शाहू महाराजांची बग्गी सुदधा या आकर्षक वेशीजवळ थबकली. खुद्द गव्हर्नरनी त्या कमानीवरच्या कलाकुसरीचं कौतुक केलं. शाहू महाराजांचं काळीज कोल्हापूरातल्या कलाकारांचं कौतुक ऐकून सुपाएवढं झालं. कोल्हापूरची कलाकीर्ती वाढवणाऱ्या त्या वेशीच्या निर्मात्या कलाकारांना त्यांनी तिथंच बोलावणं पाठवलं.
समोर आले ते विशी बावीशीतले दोन भाऊ. लहान वयात असलेली कलेची समज बघून महाराजांनी त्यांची पाठ थोपटली. आणि ही शाबासकी त्या दोघांच्या आयुष्यात फार मोठा बदल घडवून गेली. पुढच्या आयुष्यात प्रति विश्वकर्मा बनून दोघांनी कलेच्या सर्व क्षेत्रात अढळ पद प्राप्त केलं... बाबुराव आणि आनंदराव पेंटर !!!!
त्या कमानीची ख्याती कोल्हापूर आणि पंचक्रोशीत अशी काही पसरली की पुढचे दोनेक महिने ही कमान लोकांना बघायला तिथंच ठेवली गेली. शेवटी गोणपाटाचीच कमान ती !!!! तिचं आयुष्य ते किती ? पण कलेला राजाश्रय देणाऱ्या त्या लोकराजाने त्याच ठिकाणी, टाऊन हॉल शेजारी अगदी त्याच रंगरूपाची दगडी वेस उभा केली. आणि खुद्द गव्हर्नरने कौतुक केलेली लोकांची कला लोकांच्यातच चिरंतन स्मारक करून अजरामर करून ठेवली.
पुढे जवळपास अर्ध्या शतकापेक्षाही जास्त काळ ही वेस टाऊन हॉल जवळ बाबुराव पेंटर आणि शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाची साक्षीदार बनून उभी राहिली. आजही कोल्हापूरात भावसिंगजी रोडवर या कमानीखालून गेलेली पिढी या कमानीची आठवण सांगते.
पुढे द्वारकानाथ कपूर यांच्या काळात भावसिंगजी रोडच्या रुंदीकरणात या कमानीचा अडथळा आल्यावर ही कमान विस्थापित केली गेली ती केशवराव भोसले नाट्यगृहासमोर !!!
शाहू महाराजांची जिवंत स्मारके म्हणजे खासबाग मैदान आणि पॅलेस थेटर. त्यांच्या शेजारीच महाराजांचं हे अजून एक स्मारक शेवटी विराजमान झालं. कुस्तीकलेला किंवा नाट्यकलेला दाद द्यायला जेंव्हा तुम्ही या ठिकाणी जाल तेंव्हा लोकराजाने सामान्य कलाकाराला दिलेली अजरामर दाद तिथं या कमानीच्या रुपात उभी आहे याची जाणीव ठेवा !!!!
-- भारत पांडुरंग महारुगडे
Comments
Post a Comment