लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...


कोल्हापूरच्या अनेक पिढ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि तीर्थक्षेत्रांचा वारसा सांगत घडून गेल्या. पण कोल्हापूर हे फक्त इतिहासाच्याच परिघात मावणारे शहर नाही. कोल्हापूरच्या मोठेपणाला माणुसकीचीही एक सुंदर किनार आहे. त्यामुळेच, देश सोडून परागंदा झालेला "एक जर्मन डॉक्टर" आणि "त्याच्याच देशाने छळलेले काही लोक" यांच्या नियतीची गाठ जेंव्हा कोल्हापुरात पडली, तेव्हा कोल्हापूरच्या इतिहासात एक आगळावेगळा अध्याय लिहिला गेला. आणि या अध्यायाचा साक्षीदार बनली अशी एक वास्तू, जिचे संपूर्ण कोल्हापूरवर आधीपासूनच न फिटणारे ऋण आहे.

ही गोष्ट आहे जर्मन ज्यू डॉक्टर डॉ. एडमंड रोझेनबाम आणि राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या "लक्ष्मी विलास पॅलेस" यांची आणि त्याचबरोबर, त्यांच्या सहवासात घडलेल्या मानवतेच्या एका अपरिचित अध्यायाची!

याची सुरुवात जुलै १९४३ मध्ये झाली. वळीवड्याच्या माळावर कॅम्प आकाराला आला आणि पोलंडचे नागरीक टप्प्याटप्प्याने त्यात वस्तीला आले. शक्य तितक्या नागरी सुविधा कोल्हापूरकरानी पुरवलेल्या होत्याच. पण दवाखाना मात्र अजून बांधून पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी, चौफाळ्याच्या माळावरचा "थोरला दवाखाना" किंवा कावळ्याच्या नाक्यावरचा "डनिंगबाईंचा वानलेस अमेरिकन दवाखाना" एवढे दोनच पर्याय होते. पण इथेही प्राधान्यक्रमाच्या प्रशासकीय अडचणींमुळे पोलिश रुग्णांच्या उपचारावर मर्यादा येऊ लागल्या. यांची जाणीव कोल्हापूर नगरपालिका आणि कोल्हापूर दरबार यांना झाल्यावर एक निर्णय घेण्यात आला. वळीवड्यातला दवाखाना बांधून होईपर्यंत बावड्यातल्या, कागलवाडीतला "लक्ष्मी विलास" पॅलेस, दवाखाना म्हणुन पूर्णवेळ पोलिश लोकांसाठी वापरायचा ठरला.

"लक्ष्मी विलास".. राजर्षि शाहू महाराजांचं जन्मस्थळ! ज्या वास्तूने त्यांचा पहिला श्वास अनुभवला, ती आता शेकडो युद्धपीडित, आपलं गाव, देश सोडून कोल्हापुरात आलेल्या लोकांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम करणार होती. शाहुंच्या मानवतावादी दृष्टिकोनाला पुढे नेणाराच हा निर्णय होता. शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या लक्ष्मी विलासमध्ये प्रशस्त इमारत, नळाचे पाणी, वीज, पंख्यांची सुविधा, कर्मचारी निवासाची व्यवस्था आणि सभोवतालचा हिरवागार परिसर होता. त्यामुळे ते रुग्णालयाम्हणुन ते एक आदर्श ठिकाण ठरले. आंबा, डाळिंब आणि विविध फुलझाडांनी नटलेल्या विस्तीर्ण बागांमुळे येथे एक प्रकारची शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळत असे. युद्धाच्या जखमा घेऊन आलेल्या पोलिश निर्वासितांसाठी हे वातावरण औषधांइतकेच महत्त्वाचे होते. या "लक्ष्मी विलास" दवाखान्याचे प्रमुख म्हणुन नेमणूक झाली डॉ. एडमंड रोझेनबाम यांची.

रोझेनबाम, एक जर्मन ज्यू वंशाचे डॉक्टर. वंशवादाच्या अत्याचाराना बळी पडून जर्मनी, इटली, पॅलेस्टाईन असे दर दर भटकत हा तीस पस्तीशीचा तरुण जर्मन डॉक्टर कुटुंबासह शेवटी युद्धकैदी म्हणुन तेंव्हाच्या भारतात, लाहोर येथे ब्रिटिशांच्या आश्रयाला आला. पुढे पोलिश निर्वासितांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न निर्माण झाल्यावर, स्वेच्छेने त्यानी कोल्हापुरात वैद्यकीय सेवेची जबाबदारी पत्करली. रोझेनबाम यांच्यासमोरची सर्वात मोठी अडचण वैद्यकीय नव्हती; ती मानवी होती. ज्या राष्ट्राने पोलंडवर आक्रमण केले होते, त्याच राष्ट्रातून आलेल्या एका डॉक्टरवर पोलिश निर्वासित विश्वास ठेवतील का? हा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता. त्यात भर म्हणजे रोझेनबाम यांना पोलिश भाषा येत नव्हती. त्यामुळे जर्मन आणि इंग्रजी जाणणाऱ्या पोलिश परिचारिकांची (नर्स) मदत घेण्यात आली. प्रत्येक पाळीत एक दुभाषी परिचारिका असण्याचा नियम करण्यात आला. भाषेची अडचण, मर्यादित साधनसामग्री आणि युद्धकाळातील अडचणी असूनही डॉ. रोझेनबाम यांनी पोलिश परिचारिका आणि भारतीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने उत्कृष्ट आरोग्यसेवा उभारली. 

जानेवारी १९४४ मध्ये वळीवडे कॅम्पमध्ये घटसर्पाच्या साथीचा संशय निर्माण झाल्यावर लक्ष्मी विलास मध्ये विलगीकरण विभाग सुरू करण्यात आला. सर्व पोलीश मुलांचे लसीकरण करण्यात आले. मानसिक तणाव, कुपोषण, संसर्गजन्य आजार आणि युद्धजन्य आघात अशा विविध समस्यांशी सामना करताना डॉ. रोझेनबाम, जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणाऱ्या व दवाखान्याची प्रयोगशाळा सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी झेंटा रोझेनबाम, इतर पोलिश परिचारिका आणि कोल्हापूरातील कर्मचारी अथकपणे कार्यरत होते. विशेष म्हणजे हे सर्व लक्ष्मी विलास मध्येच रहात होते. त्यांच्या कार्यामुळे पोलिश निर्वासितांचा त्यांच्यावर अपार विश्वास बसला. ख्रिसमस आणि इस्टरच्या सणांमध्ये लक्ष्मी विलास मध्ये धार्मिक कार्यक्रम होत, पोलिश पारंपरिक भोजन दिले जाई आणि रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेता येत असे. लक्ष्मी विलास मध्ये एकाच वेळी इंग्रजी, पोलिश, जर्मन आणि मराठी भाषेची आवर्तने घडत होती. त्यामुळे लक्ष्मी विलास हे केवळ उपचारांचे केंद्र नसून पोलिश संस्कृती आणि सामाजिक जीवनाचेही एक महत्त्वाचे केंद्र बनले होते. लक्ष्मी विलास मधील डॉक्टरांच्या कार्याचे विश्लेषण शासकीय पातळीवरही केले जात होते. रोझेनबाम यांनी रुग्णांचा सरासरी मुक्कामाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करून दाखवला. भाषेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भिंती गळून पडल्या. लक्ष्मी विलासमध्ये निर्माण झालेला डॉ. एडमंड रोझेनबाम यांच्याबद्दलचा विश्वासच त्या दवाखान्याचा सर्वात मोठा उपचार ठरला.

त्यांची मदतनीस असणाऱ्या पोलीश परिचारिका "विएस्तावा क्लेपका " यांनी तेंव्हाच्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

" वळीवडे कॅम्पपासून लक्ष्मी विलास दवाखान्यापर्यंतचा रस्ता हा नितांत सुंदर होता. तो कोल्हापूर शहराबाहेरून, हिरव्यागार शेतांमधून जायचा. दोन्ही बाजूला पेंडगुळाची झाडे (Jungle Flame) रांगेत लावलेली होती. ही झाडे फुलोऱ्याला आल्यावर अक्षरक्ष: पेटल्यासारखी दिसत असत. लक्ष्मी विलासच्या आवारात प्रवेश करताच ते ठिकाण हिरवाईने नटलेल्या शांत नंदनवनासारखे वाटत असे. तिथल्या उद्यानात फिकट हिरव्या मोहोरानी बहरलेली जुनी आंब्याची झाडे, फुलोऱ्यात अत्यंत सुंदर दिसणारी डाळिंबाची झाडे, विविध झुडपे आणि सुगंधी निशिगंधाचे वाफे होते. त्याचा घमघमाट इतका असायचा की तो सहन न झाल्यामुळे आम्हाला डोकेदुखी सुरू व्हायची. रात्रीच्या ड्युटीवेळी, सभोवतालच्या शांततेत बाहेरील ऊसाच्या शेतांचा आवाज समुद्राच्या लाटांसारखा वाटत असे. "

त्यांनी लिहिलेलं हे वर्णन आजच्या तावडे हॉटेल, कावळा नाका, सिंचन भवन, ताराबाई पार्क ते कसबा बावडा या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यांचे आहे. हरवलेल्या कोल्हापूरचे आहे. विशेष म्हणजे त्यांना स्थानिक महिला कर्मचाऱ्यांच्या साडीचे ही कुतूहल होते. आज डॉ. एडमंड रोझेनबाम यांचे कुठलेही छायाचित्र अधिकृतपणे उपलब्ध नाही, पण "विएस्तावा क्लेपका" यांचे मात्र खुद्द लक्ष्मी विलास मधील छायाचित्र उपलब्ध आहे. राजाराम महाराजांचा आवडता घोडा शाहनवाज यांचे स्मृतिस्थळ लक्ष्मी विलासच्या प्रांगणात आहे . तिथे काढलेले हे छायाचित्र म्हणजे या माणुसकीच्या उदाहरणाचे एकमेव दृश्य साक्षीदार आहे.

यथावकाश वळीवडे छावणीतील दवाखान्याचे काम पूर्ण झाले आणि लक्ष्मी विलास मधला हा वैद्यकीय विभाग सुरू ठेवण्याचे कुठलेही प्रयोजन उरले नाही. तिथला सर्व कार्यभार हा वळीवडे येथे स्थलांतरीत करण्यात आला.

आज लक्ष्मी विलासकडे पाहताना बहुतांश कोल्हापूरकरांच्या डोळ्यांसमोर राजर्षि शाहू महाराजांचे जन्मस्थळ उभे राहते. किंवा छत्रपती शिवरायांच्या वाघनख्याशी संबंधीत एक ठिकाण म्हणुन ते सध्या परिचित आहे. ते स्वाभाविकही आहे. पण या वास्तूच्या भिंतींनी एक वेगळा इतिहास अनुभवला आहे. त्यांनी युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे अश्रू पाहिले आहेत, परदेशातून आलेल्या निर्वासितांच्या वेदना ऐकल्या आहेत आणि एका जर्मन-ज्यू डॉक्टरने राष्ट्र, भाषा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांच्या पलीकडे जाऊन केलेली सेवा अनुभवली आहे.

कदाचित म्हणूनच लक्ष्मी विलास हा केवळ एक राजवाडा नाही. तो कोल्हापूरच्या माणुसकीचा एक जिवंत दस्तऐवज आहे. इतिहासाच्या पुस्तकांत हा प्रसंग कदाचित काही ओळींचा असेल; पण कोल्हापूरच्या माणुसकीच्या परंपरेत तो एक संपूर्ण अध्याय आहे. आणि म्हणूनच डॉ. एडमंड रोझेनबाम, त्यांचे सहकारी आणि लक्ष्मी विलास यांची ही कहाणी केवळ पोलिश निर्वासितांची किंवा एका दवाखान्याची कथा राहत नाही. ती अशा कोल्हापूरची कथा बनते, ज्याने संकटात सापडलेल्या अनोळखी माणसांनाही आपले मानले.



विएस्तावा क्लेपका यांचे लक्ष्मी विलासच्या प्रांगणात शाहनवाज घोड्याच्या स्मृतिस्थळाजवळ काढलेले छायाचित्र. मूळ छायाचित्र Black and White असून आजच्या काळाशी सुसंगत वाटावे म्हणुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यात रंग भरलेले आहेत.  

✍ 

© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर

Comments

  1. जबरदस्त

    ReplyDelete
  2. अविस्मरणीय आठवणी.धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!