कोल्हापुरला जोडणारे रस्तेही ऐतिहासिकच !!!
कोल्हापूरचा इतिहास फक्त पंचगंगेच्या अलीकडेच नाही तर पलीकडेही आहे. ज्या रस्त्यांनी आज कोल्हापूर गाठता येतं ते रस्तेही कोल्हापूरच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. अर्थात, काळाच्या ओघात या रस्त्यांचं स्वरूप नक्कीच बदललं आहे. या रस्त्यांचं मुळचं स्वरूप किंवा हे रस्ते बनवण्यामागची काही विशिष्ट कारणं आज विस्मृतीत गेली असली तरीही त्या काळाच्या काही पाऊलखुणा या रस्त्यांवर आजही आहेत. त्या शोधण्यासाठी फक्त उघडे डोळे आणि उत्सुकतेची गरज आहे. शिवाजी पुल हा त्यापैकीच एक उत्तम उदाहरण. पण शिवाजी पुला पेक्षाही जुने, आणि बदलत्या कोल्हापूरचे काही अपरिचित साक्षीदार अजूनही अस्तित्वात आहेत आणि कदाचित शेवटची घटका मोजत आहेत. आज या रस्त्यांवरूनच आपण त्यांचा भूतकाळ आणि त्या रस्त्यांवरच्या काही वास्तु शोधत फिरुया !! कॅप्टन जेम्स वेल्शचा नकाशा : कोल्हापूर आणि आसपासच्या रस्त्यांची अगदी सुरुवातीची माहिती मिळते ती कॅप्टन जेम्स वेल्शच्या, १८२७ च्या म्हणजे जवळपास दोनशे वर्षांपूर्वीच्या नकाशात. उत्तरेकडे बावडा, शिरोली, पूर्वेकडे वळीवडे आणि दक्षिणेकडे पाचगाव ही गावे स्पष्ट दिसणाऱ्या या नकाशात, कोल्हापुरात पन्हाळ...