कोल्हापुरला जोडणारे रस्तेही ऐतिहासिकच !!!
कोल्हापूरचा इतिहास फक्त पंचगंगेच्या अलीकडेच नाही तर पलीकडेही आहे. ज्या रस्त्यांनी आज कोल्हापूर गाठता येतं ते रस्तेही कोल्हापूरच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत. अर्थात, काळाच्या ओघात या रस्त्यांचं स्वरूप नक्कीच बदललं आहे. या रस्त्यांचं मुळचं स्वरूप किंवा हे रस्ते बनवण्यामागची काही विशिष्ट कारणं आज विस्मृतीत गेली असली तरीही त्या काळाच्या काही पाऊलखुणा या रस्त्यांवर आजही आहेत. त्या शोधण्यासाठी फक्त उघडे डोळे आणि उत्सुकतेची गरज आहे. शिवाजी पुल हा त्यापैकीच एक उत्तम उदाहरण. पण शिवाजी पुला पेक्षाही जुने, आणि बदलत्या कोल्हापूरचे काही अपरिचित साक्षीदार अजूनही अस्तित्वात आहेत आणि कदाचित शेवटची घटका मोजत आहेत. आज या रस्त्यांवरूनच आपण त्यांचा भूतकाळ आणि त्या रस्त्यांवरच्या काही वास्तु शोधत फिरुया !!
- कॅप्टन जेम्स वेल्शचा नकाशा :
कोल्हापूर आणि आसपासच्या रस्त्यांची अगदी सुरुवातीची माहिती मिळते ती कॅप्टन जेम्स वेल्शच्या, १८२७ च्या म्हणजे जवळपास दोनशे वर्षांपूर्वीच्या नकाशात. उत्तरेकडे बावडा, शिरोली, पूर्वेकडे वळीवडे आणि दक्षिणेकडे पाचगाव ही गावे स्पष्ट दिसणाऱ्या या नकाशात,
कोल्हापुरात पन्हाळ्यावरून येणारे चक्क दोन रस्ते दिसतात. सध्याच्याच मूळ रस्त्याचे हे दोन फाटे आहेत.
आजचा कसबा बावडा आणि ब्रम्हपुरी टेकडी जवळ हे रस्ते पंचगंगा पार करत. अर्थात त्यावेळी नदीवर कोणताही पुल नव्हता !
पूर्वेकडे टेंबलाईला वळसा घालून कृष्णा नदीकडे म्हणजे मिरजेकडे जाणारा एक रस्ता.
बेळगावला जाणारे दोन रस्ते, एक कात्यायनी मार्गे पुढे जाऊन पूर्वेकडे वळणारा आणि दुसरा आजच्या उजळाईवाडी मार्गे कागलहून बेळगाव गाठणारा.
अर्थात हे सर्व, तो २०० वर्षे जुना नकाशा आजच्या भौगोलिक स्थितिशी जुळवल्यावरच लक्षात येतंय. बस्स, इतकेच रस्ते कोल्हापूरला जगाशी जोडत. म्हणजे आजचा पुणे बंगलोर हायवे हा निदान त्यावेळी १८२७ साली तरी कोल्हापूरच्या आसपास अस्तित्वात नव्हता. त्यावेळी हे रस्ते म्हणजे फक्त मोठ्या मळलेल्या पायवाटाच होत्या, ज्यावरून ओझ्याची जनावरे, सैन्याची वाहतूक चालायची. कुठलाही बांधिवपणा बसलेले, कुठेही नदी पार करायची सोय नसलेले मातीचे हे रस्ते! पावसाळ्यात तर पंचगंगा पार करायची झाली तर काहीली शिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण १८४४ च्या गडकरी बंडानंतर मात्र या रस्त्यांचं रूप पालटंलं.
- ब्रिटिश अंमल आल्यावर रस्त्यांची स्थिती :
१८४४ ला ब्रिटिश अमंल बसल्यावर या रस्त्यांची अवस्था काहीशी सुधारली. काही नवे रस्ते वाहिवाटीत आणले गेले. कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा थोडया रुंदावल्या.
फोंडा घाटाची अवघड पायवाट फोडून ओझ्याची जनावरे उतरतील असा रस्ता ही याचं काळात, ब्रिटिशांनी कोल्हापूरवर नेमलेले कारभारी दाजी पंडितांनी बांधून घेतला. घाटाच्या वरचं पहिलं गाव, म्हणून त्यांच्या नावावरून गावाचं नाव दाजीपूर ! (राधानगरी धरणाचे इंजिनीअर दाजीराव विचारे यांच्या नावावरून दाजीपूर नाव आलं असं मानण्याचा प्रघात सध्या आहे. पण १८८३ च्या काही ब्रिटिश कागदपत्रांमध्ये, जे शाहू महारांजाच्या दत्तविधानाच्याहीआधी छापले गेलेत त्यात दाजीपूर या नावानेच या गावाचा उल्लेख आहे.)
पुढच्या दहा बारा वर्षात म्हणजे १८५४ ते १८५७ पर्यंत जवळपास लाख रुपये (तेंव्हाचे!!) खर्चून तीनशे मैलाचे रस्ते ब्रिटिश सरकारने मुंबई इलाख्यात बांधून काढले, खुले केले. आणि त्यातच तयार झाला आजचा आजचा पुणे बंगलोर हायवे. तेंव्हाच नाव पुणे बेळगाव डाक रोड (Mail Road). या रस्त्यांमागचा ब्रिटिशांचा मुळचा हेतू म्हणजे सैन्याचे दळणवळण आणि टपाल व्यवस्था सुधारणे हाच होता. पुढे १८५७ च्या बंडापर्यंत कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात येण्या जाण्यासाठी हा बेळगावचा डाक रोड शिवाय इतर तीन प्रमुख रस्ते खुले झाले. आंबा घाट मार्गे रत्नागिरी, फोंडा घाट मार्गे राजापूर आणि निपाणी संकेश्वर मार्गे आंबोली घाटातून वेंगुर्ला. हे ही रस्ते मातीचेच होते आणि मोठ्या प्रमाणात रहदारी किंवा मालवाहतूक करण्याची या रस्त्यांचीही क्षमता नव्हती. या रस्त्यामध्ये एक प्रमुख दोष होता. या रस्त्यांवर कुठेही पुल, मोऱ्या नव्हते. पावसाळ्यात हे रस्ते वापरण्यापलिकडे खराब होत. शिवाय हे रस्ते अरुंद आणि धुळीने भरलेले असत. आणि याचा फटका १८५७ च्या बंडात ब्रिटिश सरकारला बसला. ऐन पावसाळ्यात कोल्हापुरात झालेले बंड मोडण्यासाठी सातारहून निघालेला लेफ्टनंट केर याने या रस्त्यांचं पावसाळ्यातलं वर्णन केलंय. अशीच बिकट अवस्था मुंबईहून त्यावेळी सैन्य घेऊन येणाऱ्या कर्नल जेकबची झाली. काही काळातच कंपनीचं राज्य जाऊन राणीचं राज्य आलं आणि कोल्हापूरचा कारभार ब्रिटिश नोकरशाहीच्या हातात आला. कोल्हापूर हे दक्षिण मराठा संस्थानाची राजधानी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि सुरू झाली ती कोल्हापूर आणि परिसरातील रस्ते सुधारण्याची, नवे रस्ते आणि पुल बांधण्याची मालिका !!
आता ब्रिटिश सरकारचं PWD खातं कंबर कसून कामाला लागलं. धुळीचे रस्ते आता रूप पालटून खडीचा, मुरुमाचा बांधीव आकार घ्यायला लागले. कोल्हापूरातून देशावर जाणाऱ्या रस्त्यांवर मुरूमाची खडी तर कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर चिरा फोडून त्याची खडी घातलेली दिसायला लागली. पावसाळ्यात पाणी वाहणारी ठिकाणे पक्क्या मोऱ्या बांधून बंदिस्त केली गेली. १८८३ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातली सर्व प्रमुख गावे, बाजारपेठा आता अशा खडीच्या रस्त्याने जोडली गेली होती. खूप सुंदर शब्दांत कोल्हापुरातल्या या रस्त्यांचं वर्णन केलं गेलंय.
Properly Metalled and Drained Roads!!
म्हणजे पक्के खडीचे आणि पाणी वाहून जायची सोय असलेले रस्ते. मोटारगाडी रस्त्यावर धावायच्या आधीचा हा काळ. आता या रस्त्यांवरून बग्गी, सामान वाहणारे बैलगाड्यांचे तांडे सुखाने प्रवास करू लागले. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यात अंतर्गत भागात जे रस्ते बघतोय ते सगळे याचं काळातले.
या काळातलं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे वाघबीळ ते चार दरवाजा हा रस्ता घोडगाडी वाहतुकीयोग्य बनवला गेला. मुळात १८४४ साली गडकरी बंडानंतर चार दरवाजा तोडून ब्रिटिशांनी गडावर जाण्यासाठी रस्ता बनवला होताच. पण या रस्त्याचा चढ इतका होता की तो बग्गी, चार चाकी घोडागाड्या यांना झेपायचा नाही. पाच फूट लांबीत एक फूट उंच असा अवघड चढ होता तो. १८८८ पर्यंत हा चढ फोडून सुखकर रस्ता पन्हाळ्यावर जायला उपलब्ध झाला. याचा उल्लेख करणारा एक दगड आजही चार दरवाजा परिसरात आहे.
शहराच्या आसपासचं बोलायचं झालं तर आजचा तावडे हॉटेल ते शाहू नाका हा बायपास रस्ता तेंव्हा नव्हता. मिरजेला जाण्यासाठी टेंबलाई, उंचगावं मार्गे जुना रस्ता खूप आधीपासुनच होताच पण आज दिसणारा हेरले, रुकडी मार्गे नवा रस्ताही याचं काळात बनला. या काळातल्या काही सुंदर आठवणी रॉबिन्सनच्या Road Making in Western India या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. आंबा घाट या काळात रुंद करताना डोंगर अनेक ठिकाणी फोडायला लागला. घाटात घोडागाड्या सहज वळाव्यात म्हणून रस्त्यांची वळणे साठ फुटांपेक्षा कमी त्रिज्येची असू नयेत म्हणून मुख्य इंजिनीयर वॉल्टर मार्डन डकेट ला काय आटापीटा करावा लागला होता आणि शिवाजी पुलाची उंची ठरवताना त्याला पंचगंगेच्या पुराची माहिती कशी उपयोगी पडली होती याची रंजक माहिती रॉबिन्सनने त्यात सांगितली आहे.
![]() |
| पन्हाळ्यावर चढ फोडून बनवलेला चार दरवाजा परिसरातील रस्ता . १८९४ सालच्या या फोटोवरून त्याकाळातले पक्के खडीचे रस्ते कसे होते याची कल्पना येते. |
![]() |
| या चार दरवाजा परिसरातील रस्त्यावरचा दगड .. |
- डाक बंगले आणि टोल (दस्तुरी ) :
या रस्त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आता विस्मृतीत गेलेले डाक बंगले. कोल्हापुरात असे एकूण सहा डाक बंगले होते. पुणे बेळगाव डाक रस्त्यावर किणी, कोल्हापूर आणि कागल इथे एकूण तीन तर बाकीचे तीन दाजीपूर, आंबा आणि पन्हाळा या ठिकाणी. पैकी कोल्हापुरातला डाक बंगला कसा , कुठे होता याचा उल्लेख मी पुढे करेनच. अशा तऱ्हेने १८५७ ते १८८३ पर्यंत रस्त्यांचा दर्जा सुधारला. याच काळातली महत्वाची निर्मिती म्हणजे वेगवेगळे पुल. कोल्हापूर शहरापुरते बोलायचं झालं तर बावड्यातून सी पी आर कडे जाताना लागणारा जयंती नाल्यावरचा ( जितीचा ओढा ) जुना पुल, रविवार पेठेतून टेंबलाई ला जाताना लागणारा आदितवार पुल आणि आपला जिव्हाळ्याचा शिवाजी पुलही याचं काळात उभारले गेले. या रस्त्यांचा खर्च मुख्यकरून मुंबई इलाखा सरकार (Bombay Presidency) आणि स्थानिक ब्रिटिश प्रशासन यांच्याकडून केला जायचा. तो वसूल करायला टोल नाके ही बसवलेले होते. त्याकाळात टोल या इंग्रजी शब्दाऐवजी दस्तुरी असा शब्द प्रचलित होता. कोल्हापूर संस्थानात घोडागाडी जाऊ शकणाऱ्या आणि पायवाटेने उतरता येणाऱ्या सर्व घाट वाटांवर हे टोल नाके होते. चारचाकी घोडागाडी, दोन चाकी घोडागाडी, एकल घोडा, बैल, रेडे यांच्यावर निरनिराळे टोल दर होते. शहरापुरतं बोलायचं झालं तर उजळाईवाडी इथं पुणे बेळगाव डाक रस्त्याचा टोल वसूल केला जायचा. आज युनिव्हर्सिटी समोरून जाणारा जुना हायवे जिथं बायपास हायवेला मिळतो तिथं. तर मिरजेच्या जुन्या रस्त्यावर उंचगावला हा टोल भरायला लागायचा. मिरजेच्या नव्या रस्त्यावर हेरले गाव टोल भरायला निवडलं होतं. टोल साठी आंदोलने करणाऱ्या कोल्हापूरकराना त्यांच्या पूर्वजांनी असा टोल भरलाय हे वाचून नक्कीच दुःख होईल.
- पुणे बेळगाव डाक रस्ता (Mail Road ) :
एकंदरीत हा काळ रस्त्यांच्या दृष्टीने उत्क्रांतीचा काळ होता. त्या रस्त्यांचं मूळ स्वरूप बदलूनही आता शतकापेक्षा जास्त काळ लोटलाय. डांबरीकरण आणि वाहतुक क्षेत्रात झालेले बदल आणि प्रगती यामुळे हे रस्ते ओळखण्या पलीकडे बदललेत. पण काही पाऊलखुणा या रस्त्यांवर आजही आहेत. आपण कोल्हापुरातून जाणाऱ्या पुणे बंगलोर रस्त्याचंच उदाहरण घेऊ.
मुळात हा रस्ता १८५४ ते १८५७ च्या दरम्यान तयार झाला. त्यात प्रमुख बदल मात्र १८५७ च्या बंडानंतर झाले. हा डाक रोड असल्याने कोल्हापूर रेसिडेन्सी मध्ये जाणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी उत्तरेकडून येताना हा रस्ता शिये गावाजवळच पंचगंगा पार करायला हवा होता. पण असे घडलेलं दिसत नाही. याचं कारण ब्रिटिशांनी रेसिडेन्सीच्या संरक्षणाच्या दृष्टीने केलेली उपाय योजना. जर हा रस्ता तसाच शिये, बावडा मार्गे लगेच रेसिडेन्सीत आला असता तर कमी अंतराचा ठरला असता पण आणीबाणीच्या प्रसंगी रेसिडेन्सीला संरक्षण करायला कमी वेळ मिळाला असता. त्यामुळे हा रस्ता अजून सरळ दक्षिणेकडे शिरोली मार्गे ओढण्यात आला. रेसिडेन्सी आणि हा रस्ता यांच्या मध्ये पंचगंगा एक नैसर्गिक संरक्षक म्हणून उभी राहिली. त्यामुळे शिये गावापेक्षा शिरोली जवळ पंचगंगेचे पात्र मोठे असूनही त्या मार्गे हा रस्ता नेण्यात आला. शिवाय या संपूर्ण पाच सहा किलोमीटरच्या पट्ट्यावर नदीपलीकडून लक्ष ठेवणे ही सोपं होतं. नदी पार केल्यावर हा रस्ता उजवीकडे वळून कोल्हापूरच्या दिशेने निघायचा. हा आजचा तावडे हॉटेल परिसर. तिथून काही अंतरावर त्याला दोन फाटे फुटत होते. उजवीकडे एक फाटा रेसिडेन्सी कडे जाण्यासाठी होता आणि इथेच होत्या ब्रिटिशांच्या सैनिक पलटणी. म्हणजे असा लांबून रस्ता काढल्यामुळे संरक्षण करायला वेळ ही मिळायचा आणि त्या रस्त्यावर सैनिक पलटणी असल्यामुळे संरक्षण ही व्हायचं. तर डावीकडचा फाटा हा डाक रोडचाच भाग म्हणून तसाच बेळगावला निघायचा. हा सर्व भाग म्हणजे आजचा कावळा नाका परिसर. इथे अजूनही उजवीकडे आपण बावड्यात जाण्यासाठी वळतो. तिथेच पुढे सदर बाजार परिसरात एकेकाळी ब्रिटिश पलटणी होत्या. तर डावीकडे आपण युनिव्हर्सिटी मार्गे बेळगावला जातो. त्या काळात कावळा नाक्यावरून सरळ पुढे जाणारा रस्ताच अस्तित्वात नव्हता. तिथून पुढे जयंती नाल्यापर्यंत शेतीचा भाग होता. पुढे रेल्वे स्टेशन झाल्यानंतर इथं वस्ती वाढली. याच कावळा नाका परिसरात होता कोल्हापूरचा डाक बंगला ! फादर कॉव्हले, ज्यांच्या नावावरून कावळा नाका नाव पडले हे नंतरच्या काळात याचं बंगल्याच्या परिसरात वास्तव्यास होते. उल्लेख आहेत की या डाक बंगल्यात सहा लोकांची राहायची सोय होती, शाकाहारी मांसाहारी हवा तो जिन्नस मिळायचा आणि दिवसाला एक रुपया भाडे घेतले जायचे. जरी मूळचा डाक रस्ताच आपण आजही कोल्हापुरात येण्यासाठी वापरत असलो तरीही या डाक रस्त्ता नक्की कसा होता, किती रुंद होता याचा मात्र शोध सहज लागत नाही. त्यासाठी थोडी शोधक नजर असणे गरजेचे आहे. या डाक रोडचे दोन अवशेष अजूनही कोल्हापूरच्या बाहेर अस्तित्वात आहेत. कसे ते बघू.
- Westwood and Baillie कंपनीने बांधलेला शिरोली पूल (१८७४) :
आज पंचगंगेवर शिरोली कडे जाताना जे तीन पुल आहेत त्यापैकी सध्या वापरात नसणारा डावीकडचा लोखंडी पुल हा त्या डाक रोडचा एक भाग आहे. मूळ डाक रस्त्याला कुठेही पुल नव्हते. पण बांधकाम क्षेत्रात झालेली प्रगती आणि गतिमान दळण वळणाची गरज यामुळे ब्रिटिश सरकारने १८७० नंतर अखात्यारीतील सर्व रस्त्यावर पुल बांधण्याचा धडाका उडवून दिला. विशेष बजेट मंजूर झाले आणि त्यातून या डाक रस्त्यावर एकाच वेळेला शिरवळ येथील नीरा नदीवर, कराड जवळ कोयना नदीवर आणि किणीच्या पुढे वारणा नदीवर पुलाची कामे सुरू झाली. उदगाव जवळ मिरजेला जाताना लागणारा कृष्णेवरचा पुल ही याचं दरम्यानचा! या सर्व पुलांचे बांधकाम (Stone Masonary Arch) या पद्धतीचे दगडातले आहे. पण कोल्हापूरचा हा पुल मात्र अगदी शेवटच्या क्षणी डिजाइन बदलून लोखंडी बनवला गेला. याचं कारण ही तितकच मनोरंजक आहे. जेंव्हा पुलाच्या पिलर्स साठी खोदकाम सुरू झाले तेंव्हा लक्षात आले की उत्तरेकडील पिलरसाठी दगडी पाया मिळणार नाही. त्याबाजुला भुसभुशीत जमीन आहे. दगडी कमानीच्या पद्धतीचा पुल तिथं उभारणे अभियांत्रिकी दृष्ट्या योग्य नाही. यातून ब्रिटिश इंजिनीअर्सनी मार्ग काढला आणि पुलाचे डिजाईन बदलून टाकले. आता पुल वजनाला हलका बांधायला लागणार होता. आणि मदतीला आली त्यावेळची जहाज आणि रेल्वे पुल बांधणी या क्षेत्रातली जगातली सर्वोत्तम कंपनी M/S. Westwood and Baillie.... नुकतेच भारतात रेल्वेचे जाळे स्थिरावायला सुरुवात झाली होती. रेल्वेमार्गावर जे लोखंडी गर्डर्सचे हलके परंतु मजबूत पुल बांधले जात, त्यात या कंपनीचा हातखंडा होता. लंडनच्या थेम्स नदीपासून सिंधू नदीपर्यंत सर्व नद्यांवर पूल बांधायचा अनुभव या कंपनीला होता .या पुलाचे सर्व डिजाइन लंडनला बनवले गेले. त्याबर हुकूम लोखंडी गर्डर्स Poplar या लंडन जवळच्या उपनगरात ओतवले गेले आणि तिथं त्यांची प्राथमिक जोडणी करून सुट्ट्या भागाच्या रुपात हे गर्डर्स समुद्रमार्गे भारतात आणले गेले. आणि पंचगंगेच्या काठावर यांची फेर जोडणी केली गेली. सहज चित्र मनात उभे रहाते. केवढा पसारा मांडला गेला असेल. लाकडी पायाडे रचली गेली असतील, पुलाचे जोडकाम करायला रीबेट्स गरम करण्यासाठी भट्ट्या उभारल्या असतील. त्या रीबेट्सच्या ठोकण्याचा आवाज आसपास शिरोली, उंचगाव इथ दणाणला असेल. आजही या पुलाचे लोखंडी गर्डर्स तितकेच मजबूत वाटतात. हा पुल १८७४ साली बांधून तयार झाला, म्हणजे शिवाजी पुल जेंव्हा फक्त कागदावर होता तेंव्हा हा पुल पंचगंगा पार करायचा कामाला रुजू देखील झाला होता आणि तेंव्हाचे २५००० पाउंड म्हणजे जवळपास अडीच लाख रुपये खर्ची पडले होते. हा खर्च शिवाजी पुलाच्या खर्चापेक्षाही जास्त आहे. शिरोलीचा हा पुल हा पंचगंगेवरचा सर्वात पहिला पुल म्हणता येईल. मी मुद्दाम त्याचा उत्तरेकडील दगडी पिलर बघायला वाट वाकडी करून नदी पात्रात उतरलो होतो. तेंव्हा ऐकीव, वाचलेली माहिती प्रत्यक्षात खरी होती याची खात्री मला झाली. भुसभशीत पायावर, वजन पेलण्यासाठी हाच खांब मोठा आणि वेगळा बांधला आहे. एकंदरीत ६० फूट रुंदीच्या मजबूत अशा सात ते आठ खांबांवर हा पुल तोलला आहे. सध्या या पुलाची दुरवस्था बघण्यापलिकडे आहे. जवळपास एकशे पंचवीस पेक्षा जास्त काळ सेवा करून हा कोल्हापुरातला सर्वात पहिला पुल आता उपेक्षेचे निवृत्त जीणं एखाद्या अडगळीत जगताना दिसतोय. एक मजेची बाब म्हणजे कागदपत्रात या पुलाचा उल्लेख उंचगाव जवळचा पंचगंगेवरचा पुल असा उल्लेख आहे. शिरोली गावाला पुलाची हे प्रत्यय चिकटण्यामागे ही हाच पुल !!
१८७४ साली तयार झालेला पंचगंगेवरचा लोखंडी पूल . हा कोल्हापूरातला सर्वात पहिला पूल ! आजही पुणे बंगलोर हायवेवर हा पूल बघायला मिळतो. याचा उत्तरेकडील पिलर हा वेगळा आणि भक्कम आहे . पुलावर Westwood and Baillie, या लंडन मधील निर्मात्या कंपनीची पाटी आजही आहे .
कोल्हापुरात एक गोष्ट सांगितली जाते की शिवाजी पुलाला १०० वर्षे झाल्यावर लंडनवरून त्या कंपनीचे "वॉरंटी संपली" म्हणून पत्र आलेले होते. अर्थात असं काही घडलं नसणार कारण शिवाजी पुल हा कुठल्या कंपनीने नाही, तर सरकारने बांधला होता. पण हा शिरोलीचा पुल मात्र खाजगी कंपनीने बांधल्यामुळे त्याच्या बाबतीत असं पत्र मात्र येऊ शकलं असतं. आता या पुलाला इथेच सोडून आपण तावडे हॉटेल परिसरातून कमानी खालून कोल्हापूरकडे जायला निघुया. कारण इथेच आहे जुन्या डाक रस्त्याचा अजून एक साक्षीदार !!
कमानी खालून शंभर एक मीटर कोल्हापूर कडे गेल्यावर उजव्या बाजूला वापरात नसणारा एक लहानसा पुल दिसतो. मुळात हा पुल नदीवर नसून पंचगंगेचे पाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला निचरा होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. अगदी दहा वर्षापूर्वी पर्यंत यावरून वाहतूक सुरू होती. IRB च्या प्रोजेक्ट नंतर हा पुल आता अडगळीत गेलाय. कोल्हापूरला देखणं बनवणारा ब्रिटिश अभियंता वॉल्टर मार्डन डकेट याचं एक इंजिीअरिंग स्केच उपलब्ध आहे. साल आहे १८७४. त्यावर स्पष्टपणे उल्लेख आहे तो डाक रस्त्यावर कोल्हापूर आणि पंचगंगा पुल यांच्यामध्ये एका ठिकाणी पाणी ड्रेन होण्यासाठीच्या सिस्टीमचा. हे स्केच त्याचं पुलाचं आहे यात शंका नाही.
कोल्हापूर बाहेर या दोन अवशेषांव्यतिरिक्त इतर अवशेष मात्र सहज लक्षात येत नाहीत. अगदी शहरापुरतं बोलायचं झालं तर आदीतवार पुलाच्या नावाचा दगड त्या काळातल्या रस्त्याची साक्ष देत उभा आहे.
हे रस्ते बदलत्या कोल्हापूरचे फक्त साक्षीदारचं नाहीत तर कोल्हापूरच्या बदलात मोठे वाटेकरी आहेत. कोल्हापूरची गेल्या दीडशे वर्षात जी काही भौतिक प्रगती झाली ती याचं रस्त्यांवरून कोल्हापुरात आली. याच रस्त्यांवरून कोल्हापुरची कीर्ती बाहेर पसरली. तसं बघायला गेलं तर रस्ते हा काही वारसा म्हणून ओळखला जाणारा विषय नाही. पण कोल्हापूरातले घाट, पुल आणि जिव्हाळ्याचा पुणे बेंगलोर हायवे हे ज्या पद्धतीने उत्क्रांत होत गेले ते पहाता ते निदान रस्त्यांना सुद्धा इतिहास असतो हे नक्की पटतंय. याच रस्त्यांचा वापर करून भूतकाळात जाण्याचा हा एक प्रयत्न !!!
- भारत महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर..
विशेष आभार:
१. Lee Warner Collection
२. British Gazetters
३. Road Making in Western India.
४. Military Engineers
५. Military Reminiscences
६. वैदेही लावंड
.jpeg)
.jpg)




स्वातंत्रपुर्व काळातिल कोल्हापुरच्या रस्ता बांधणिची अभ्यासपुर्ण माहिती वाचताना त्यावेळच्या इंग्रज सरकारने किती दुरद्रुष्टीने विचारकेला होता याची जाणिव होते.आमचे पुर्वज त्याकाळी सुध्दा टोल भरत होते हे या लेखातुन समजले. डाकबंगल्यांचीही माहिती झाली.
ReplyDeleteएकंदरित माहितीपुर्ण लेख,ईतिहासाच्या पाउलखुना जपणारा.
भारत, तुमची शोधक वृत्ती, सामान्य लोकांच्या दृष्टीला सहज न दिसणार्या गोष्टी अचूक टिपते. रस्त्यांना देखील इतिहास असतो, ही बाब जाणवली. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDeleteखूपच सुंदर व अभ्यासपूर्ण लेख👌. या लेखामुळे रस्त्यांच्या पाऊलखुणा व त्यांचा ईतिहास समजला.
ReplyDeleteधन्यवाद भारत.,🙏 तुझ्यामुळे कोल्हापूरातील रस्ते व पूल कसे तयार झाले ते समजले. ईतके दिवस अनभिज्ञ असलेल्यांंना बऱ्याच गोष्टी माहिती होतील या लेखामुळे. आपले पूर्वजही त्याकाळी टोल भरत होते हे मात्र आत्ता कळले.
अशीच नवीन नवीन माहिती तुझ्याकडून नेहमीच वाचायला मिळते.असाच लिहीत रहा. नेहमी कोल्हापूरविषयी माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. 👍
खुप सुंदर माहिती भारत दादा
ReplyDeleteFantastic 😍
ReplyDeletev.good studied- info., Thank u. GOD bless you and all.!!!
ReplyDeleteखूप सविस्तर माहिती. सुंदर लेख. बरीच नवीन माहिती कळली.पुलाची शिरोली नावाचा इतिहास अत्यंत रंजक. पूर्वी सुद्धा टोल होता, हे वाचून गंमत वाटली.अशीच कोल्हापूरबद्दल नवनवीन माहिती देत जावी,ही विनंती.🙏🙏
ReplyDeleteखूपच अभ्यासपूर्ण लेख ..खूपच आवडला
ReplyDeleteTumche lekh mi aawrjun wachto.. tumcha detailed study aani sahaj lekhani, hyamule khup changlya prakare loka paryant aitihasik goshti samjtat.. tumhi aankhi lihit rahave ..
ReplyDelete