सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...
कोल्हापूर ट्रंक रोड आणि कोल्हापूर मेल रोड ही रस्त्यांची नावं, आजच्या काळात तशी डोक्यावरून जाणारीच ! पण, हे दोन रस्ते म्हणजे कोल्हापूरचा भूतकाळ जिवंत करणारे राजमार्गच आहेत. यातला कोल्हापूर मेल रोड म्हणजे आजचा पुणे बंगलोर हायवे. याच्यावरचा ऐतिहासिक पूल काल-परवाच आपण इतिहासात जमा करून टाकला. (ऐतिहासिक का ? कारण हा कोल्हापूर संस्थानातला सर्वात पहिला पूल.) पण हे असं दुर्दैव कधीही कोल्हापूर ट्रंक रोडवर येणार नाही याची खात्री बाळगा. कारण या ट्रंक रोडवर पावला पावलावर कोल्हापूरच्या भूतकाळात शिरायचे दरवाजे अजूनही शाबूत आहेत. या ट्रंक रोडमुळेच कोल्हापूरला स्वतःचा एक वारसा निर्माण करता आलाय. आणि याच कोल्हापूर ट्रंक रोडवर जवळपास दीडशे वर्षे उभा आहे “Palace of Sinclair” सिंक्लेअरचा बंगला ! होय, बंगलाच !. याच्याबद्दल माझ्याकडे तशी ओझरती माहिती होती पण नक्की ठिकाण काही गवसले नव्हते. नव्याने काही गोष्टी वाचण्यात आल्या आणि जागेची निश्चिती झाली. प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन वाचलेल्या गोष्टींचा पडताळा घेतला. आणि समोर आला धडधाकट, एकही चिरासुद्धा न हललेला सिंक्लेअरचा बंगला ! मला तर प्रत्यक्ष सिंक्लेअरलाच कोल्हापुरात भेटल्याचा आनंद झाला..
डॉ.जॉर्ज सिंक्लेअर ! तुमच्या माझ्यासारखाच या कोल्हापूरचा नागरिक. पण जन्माने ब्रिटिश आणि वृत्तीने मात्र कुठल्याही ब्रिटिश नागरिकपेक्षाही जास्त कोल्हापूरी. डॉ. सिंक्लेअर तसे थेट ब्रिटिश रेसिडेन्सीच्या सेवेत नव्हते. ते होते कोल्हापूरचे दरबार सर्जन (State Physician). सव्वाशे-दीडशे वर्षापूर्वीच्या कोल्हापुरात जे काही ब्रिटिश नागरिक सामाजिक जीवनात सक्रिय असायचे त्यामध्ये प्रामुख्याने होते राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपल चार्ल्स कॅन्डी, कोल्हापूर दरबारचे स्टेट इंजिनिअर आर जे शॅनॉन आणि डॉ. सिंक्लेअर. ब्रिटिश रेसिडेन्सीतले नोकरशहा, अधिकारीसुद्धा ठराविक काळानंतर बदलून जात, पण हे तिघे मात्र कोल्हापुरात अगदी घट्ट रुतलेले होते. पण या सर्वात, कोल्हापुरवर प्रभाव होता तो मात्र डॉ.जॉर्ज सिंक्लेअर यांचाच. तब्बल चाळीस वर्षे कोल्हापुरात घालवलेला हा माणूस. कोल्हापूरच्या जडणघडणीच्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार. कोल्हापुरात रुजवलेली पाश्चात्य पद्धतीची उपचारपद्धती आणि आरोग्य व्यवस्थेत केलेले अमूलाग्र बदल हीच त्यांच्या आयुष्याची ओळख सांगता येईल. त्यांच्या आयुष्यभराचं कर्तृत्व म्हणजेच अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल किंवा कोल्हापूरकरांचा थोरला दवाखाना ! (CPR). संपूर्ण कोल्हापूर संस्थानात १८५१ पासून अडखळत सुरु असलेला फक्त एकच युरोपियन पद्धतीचा लहान दवाखाना होता. हा दवाखाना Surgeon General of Bombay Presidency च्या अंतर्गत चालवला जात होता. कालांतराने तो कोल्हापूर रेसिडेन्सी च्या अखत्यारीत आला. अनेक वर्षे या दवाखान्याचे प्रमुख म्हणून Assistant Surgeon डॉ. ख्रिश्चन अँडींग काम बघत होते. पण १८६९ साली त्यांचा मृत्यूनंतर डॉ. सिंक्लेअर, कोल्हापुरात आले. आणि बघता बघता त्यांनी कोल्हापूरला युरोपिअन उपचार पद्धतीची महती पटवली. रूग्णांची संख्या इतकी वाढली की एका मोठ्या दवाखान्याची गरज भासू लागली. यातूनच उभारला गेला थोरला दवाखाना म्हणजेच आजचं CPR. (CPR कसं उभ राहिलं, तिथेच का उभं केलं, त्यावेळेला काय अडचणी आल्या, प्रत्यक्ष बांधकाम सुरु असताना कोल्हापूर शहरात काय काय ऐतिहासिक घटना घडल्या, या इमारतीमध्ये कोणकोणती वेगळी वैशिष्ट्ये आहेत, यावर दोन एक प्रकरणं सहज खपून जातील. पण, तो आजचा विषय नाही. त्यावर मी नक्कीच कधीतरी सविस्तर लिहिन.) या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगीचे त्यांचे भाषण म्हणजे मध्ययुगातलं कोल्हापूर आधुनिक काळाकडे आता कसं निघालंय याची झलक दाखवणारं होतं. या दवाखान्यात महिला वॉर्ड सुरु करण्याची कल्पना ही डॉ. सिंक्लेअर यांचीच. यानंतरचा त्यांचा ध्यास म्हणजे खुद्द कोल्हापूर शहरात महिलांसाठी वैद्यकीय शिक्षण मिळण्यासाठीचे प्रयत्न. ते १८८५ साल होतं. थेट Medical School of Philadelphia इथं पत्रव्यवहार करून एक लेडी डॉक्टर,कोल्हापुरात मुलींना वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी पाठवावी म्हणून डॉ. सिंक्लेअरनी विनंती केली होती. हे मेडिकल कॉलेज, थोरल्या दवाखान्याशेजारीच जितीच्या ओढ्याजवळ उभे करण्यासाठी दरबारची सर्व प्रकारची मंजूरीसुद्धा डॉ. सिंक्लेअर यांनी घेतलेली होती. पण हा प्रयत्न पुढे गेलेला दिसत नाही. पुढे थोरल्या दवाखान्यात नर्सिंगचे शिक्षण देण्याचा घाट सुद्धा डॉ. सिंक्लेअर यांनी घातला आणि पुरा केला. आपल्या वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे सिंक्लेअर कोल्हापुरातल्या सामाजिक क्षेत्रातही पुढे असायचे. रेसिडेन्सीतल्या लष्करी अधिकाऱ्यां बरोबर असणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यात कोल्हापूर शहर संघाकडून नेहमीचा खेळाडू म्हणजे डॉ. सिंक्लेअर. त्यांच्या चाळीस वर्षांच्या कोल्हापुरातल्या वास्तव्यात कोल्हापुरातली प्रत्येक महत्वाची इमारत, पूल, बागा त्यांच्या समोरच उभे राहिले. तटबंदी त्यांच्यासमोरच पाडली गेली. कळंबा पाणी पुरवठा, रेल्वेची सुरुवात, शाहू महाराजांचा राज्याभिषेक आणि कित्येक घटना त्यांच्या पुढ्यातल्याच. टाऊन हॉल मधली एकही सभा त्यांच्याशिवाय पार पडली नाही. चौथ्या शिवाजी महाराजांच्या आजारपणात मेडिकल बुलेटिनही डॉ. सिंक्लेअरच जारी करायचे. सांगायचा मुद्दा असा की डॉ. सिंक्लेअर, कोल्हापूरच्या समाजजीवनात खोलवर मिसळलेले होते.
डॉ. सिंक्लेअर यांचा एवढा दीर्घ उल्लेख एवढ्याचसाठी की आजचं कोल्हापूर आपल्या ओट्यात टाकणारी जी काही अज्ञात लोकं आहेत, त्यापैकीच एक म्हणजे डॉ. सिंक्लेअर. त्यांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेवटपर्यंत कोल्हापूरशी कनेक्टेड राहिले. त्यामुळेच त्यांचा बंगला हा दूर रेसिडेन्सीत नव्हता, तर मुद्दाम कोल्हापूर शहराजवळ बांधला होता. बंगल्याचं नाव, “Sunnyside”. बंगला कसला ? एखादा राजवाडाच ! रेसिडेन्सीतल्या ब्रिटीशानी दिलेलं नाव “Palace of Sinclair “ अखेरपर्यंत सिंक्लेअर याच बंगल्यात राहिले. या बंगल्यात कोल्हापूरच्या असंख्य आठवणी आहेत. १८८८ मध्ये त्यांच्या मुलीचं लग्न रेसिडेन्सीतल्या डग्लस मेमोरियल चर्च मध्ये (सध्याचं PWD ऑफिसमोरचं All Saints Church) झालं त्यावेळी जंगी शामियाना या बंगल्याच्या आवारात घालण्यात आला होता.हे लग्न म्हणजे कोल्हापूरातल्या लोकांनी बघितलेलं पहिलं युरोपियन पद्धतीचं ख्रिश्चन लग्न. कोल्हापुरातल्या आणि रेसिडेन्सीतल्या प्रतिष्ठित लोकांची या लग्नातली लगबग, लग्नात पेटीच्या कॅमेऱ्यांनी काढलेल्या फोटोंचे उडणारे फ्लॅश, कोल्हापूरच्या नागरिकांनी दिलेले आहेर, हे सारं याच बंगल्याच्या आवारात. लग्नानंतर मधुचंद्र साजरा करण्यासाठी हे जोडपं उघडपणे याच बंगल्यातून महाबळेश्वरला रवाना झालं. हे बघून नक्कीच कोल्हापुरातल्या लोकांना गुदगुल्या झाल्या असतील. डॉ.सिंक्लेअर यांच्या आयुष्यातल्या दुःखद घटना सुद्धा याच बंगल्यात घडल्या. त्यांची दुसरी मुलगी आणि स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आर जे शॅनॉन यांची पत्नी, हीचा मृत्यू देखील याच बंगल्यातला. सन १९०० मध्ये खुद्द डॉ. सिंक्लेअर यांच्या पत्नीचा लिव्हरच्या आजाराने उतारवयात मृत्यू झाल्यावर याच बंगल्यातून तिची शवपेटी, गावाबाहेर असणाऱ्या रेसिडेन्सीसाठीच्या कबरस्तानात (एकेकाळाचे संगम टॉकीज च्या मागे आणि आत्ताच्या सयाजी हॉटेल समोर) जाण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा डॉ.सिंक्लेअरनी वयाची ८० ओलांडलेली होती आणि विशेष म्हणजे ते त्यावेळीसुद्धा अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या सेवेत होते. आयुष्याच्या या टप्प्यावर आलेलं एकाकीपण त्यांनी याच बंगल्यात भोगलं. उतार वय आणि ऋतुमानाची पर्वा न करता, डॉ. सिंक्लेअर, न चुकता रेसिडेन्सी आणि कोल्हापूर ट्रंक रोडवर तीन-चार मैलांची पायपीट दररोज करायचे. त्यांच्या या ब्रिटिश शिस्तीचा साक्षीदार ही हाच बंगला. पुढे दोन चार वर्षात काचबिंदूमुळे काही प्रमाणात अंधत्व आल्यावर मात्र डॉ.सिंक्लेअर वयाच्या ८४ या वर्षी अल्बर्ट हॉस्पिटलच्या सेवेतून स्वतःहून बाजूला झाले. त्यानंतर याच बंगल्याच्या मागच्या पोर्चमध्ये कोल्हापूर ट्रंक रोडकडे निवांत बघत बसलेले डॉ. सिंक्लेअर अनेकदा दिसत. कोल्हापुरात आलेले अनेक परदेशी पाहुणे आदराने या Oldest Living European ला भेटण्यासाठी या Sunnyside बंगल्यावर हटकून येऊन जात. गोंधळ आणि दाटीवाटीने बसलेले तटबंदीचे शहर ते सुंदर गॉथिक शैलीच्या इमारतीनी नटलेले, शिक्षणाचे माहेरघर आणि दक्षिण मराठी संस्थानाची राजधानी असा हा कोल्हापूर शहराच्या या प्रचंड काल प्रवासाचे साक्षीदार असणारे डॉ. सिंक्लेअर अंदाजे १९१० च्या आसपास ख्रिस्तवासी झाले असावेत. रेसिडेन्सीच्या कबरस्तानात एखाद्या सुंदर कोरीव दगडी कबरीखाली विश्रांती घेणारे डॉ.सिंक्लेअर शोधले तर नक्कीच सापडतील.......
कोल्हापूर ट्रंक रोडवरचा डॉ. सिंक्लेअर यांचा हा बंगला नक्की होता तरी कसा ? तीन बाजूला जितीचा ओढा आणि एका बाजूला कोल्हापूर शहर अशा दोन एकर जमिनीच्या पट्ट्यावर हा डॉ. सिंक्लेअर यांचा अगदी typical ब्रिटिश पद्धतीचा बंगला होता. पूर्वेकडे तोंड करून असलेला हा बंगला, ( म्हणून नावही Sunnyside.) रेसिडेन्सीपेक्षा कोल्हापूर शहरालाच जास्त जवळचा होता. पूर्वेकडे बंगल्यासमोर काही अंतरावरचा जितीचा ओढ्याच्या पलीकडची चढण असलेली शेतवड पार केली की लगेच कोल्हापूचं स्टेशन ! याच शेतवडीत आणि आजूबाजूला नंतर शाहूपुरी विस्तारली. तर मावळतीला कोल्हापूर ट्रंक रोड. त्याच्याही पलीकडून जितीचा ओढा वळणं वळणं घेत थेट पंचगंगेत सामावलेला. नीट लक्ष दिलं तर ब्रह्मपुरीच्या टेकाडाबाजूचा आईसाहेबांचा घाटही बंगल्याच्या मागच्या पोर्चमधून दिसायचा. उत्तरेकडे पुन्हा जितीचा ओढा ओलांडून नागाळ्याच्या माळाची मागची हद्द पार केली की थेट रेसिडेन्सी. दक्षिणेला हाताच्या अंतरावरच बसलेलं कोल्हापूर शहर ! एखाद्या ब्रिटिश काउंटीमधल्या विस्तीर्ण जमिनीवर एकाकीपणे वसलेला दिसायचा हा बंगला. बंगल्याच्या हद्दीला घडीव उंच दगडी खांबांचं कंपाऊंड. (असे खांब अजूनही टाऊन हॉल, ऑल सेंटस चर्च आणि मुंबई फोर्ट मधील सेंट थॉमस कॅथेड्रल इथे बघायला मिळतात.) बंगल्याभोवती डॉ. सिंक्लेअरनी मन लावून जोपासलेली फुलबाग आणि निरनिराळी झाडं. एकप्रकारचं जंगलच ते ! अगदी टाऊन हॉल समोरच्या बागेची स्पर्धा करणारं. २४ तास वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजाने गजबजलेलं ! बंगल्याला चारही बाजूने व्हरांडा. वरती जुन्या पद्धतीची कौलं ! पुढे मागे विस्तीर्ण पोर्च. पोर्चच्या दोन्ही बाजूला टिपिकल ख्रिश्चन पद्धतीची लाकडाच्या पट्टीच्या जाळ्यांच्या भिंती. पोर्च मधून आत गेलं की ऐसपैस पसरलेला हॉल. हॉलमध्ये ब्रिटिश पद्धतीच्या कमानी. दोन्ही बाजूला मोठाल्या बेडरूम. कळंबा पाणी पुरवठा योजनेचा एक नळ एक मुद्दामच या बंगल्याजवळ आणलेला. आधीच शहरापेक्षा खड्ड्यात बसलेला हा परिसर. त्यामुळे पाण्याचा तसा सुकाळच होता. पुढच्या काळात कोल्हापूरात वीज पुरवठा सुरू झाला तेव्हा याही बंगल्याला वीज पुरवठा केला गेला. एकंदरीत रेसिडेन्सीतलं ब्रिटिश राहणीमान कसे असते याची झलक याच बंगल्यामुळे समस्त कोल्हापूरकरांना मिळत होती. नाही म्हणायला असाच एक बंगला खाराळा बागेतही होता, पण तो तसा गावापासून लांबचा. पुढे काळ बदलला. खुद्द डॉ. सिंक्लेअर काळाच्या उदरात गेले. इकडे गाव टप्प्याटप्प्याने बदललं, वाढलं. तटाच्या आतलं कोल्हापूर तटाची भिंत फोडून खंदकापलीकडच्या पेठांमध्ये, दुधात साखर मिसळावी तसे एकरूप होऊन गेलं. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नव्या वसाहती उभ्या राहिल्या. एकेकाळची गावाबाहेरच्या पडजमीनी, शेतवडी, आडव्या तिडव्या इमारतीनी भरून गेल्या. मुद्दाम कोल्हापूरपासून फटकून राहण्यासाठी लांब उभारलेल्या रेसिडेन्सीचा तोरा सुद्धा कधीच उतरून गेला आणि रेसिडेन्सी नाव तर फक्त आता क्लबवर लावण्यासाठीच राहिलंय. याला सिंक्लेअरचा बंगला तरी कसा अपवाद राहील ? बघता बघता तोही शहराच्या मुख्य वस्तीत आला. नुसताच आला नाही तर शहरात गुडूप होऊन गेला. टाऊन हॉलची बाग अजूनही आहे पण सिंक्लेअरनी उभा केलेली दोन एकर बाग कुठल्या कुठे माणसांच्या आणि सिमेंटच्या जंगलात नाहीशी झाली. पण सिंक्लेअरचा बंगला मात्र अजून टिकून राहिलाय. त्याचा एकही चिरा अजून ढळला नाही. आजही त्यामुळे मूळ रूपात बघता येतो.
| टाऊन हॉल आणि सिंक्लेअर बंगला , १८७८ पूर्वीच्या नकाशात |
| टाऊन हॉल आणि सिंक्लेअर बंगला, २०२४ ची स्थिती |
संपूर्ण बंगला मनसोक्त बघून झाल्यावर बाहेर निघताना, पोर्चमध्ये आराम खुर्चीवर बसलेल्या डॉ.सिंक्लेअर यांचा भास माझ्या डोळ्यांना झाला. कदाचित डोक्यात हाच विषय भिनल्यामुळे असं झालं असावं. एकेकाळी चौफाळ्याच्या माळा शेजारी असणाऱ्या या दोन एकर जमिनीवरच्या या बंगल्याचं आवार आता काळाच्या ओघात आकसून गेलंय. शहर असं आडवं उभं वाढतानाही ही वास्तु मात्र जुन्या काळाचा एक मुक साक्षीदार बनून शांत आणि निश्चलपणे उभी आहे. पण आता मात्र अनोळखीपणाचं मळभ तिच्यावरही दाटलयं. कधी जर या कोल्हापूर ट्रंक रोडवर जाणं झालं तर मुद्दाम कंपाऊंड पलीकडे बघाच. कदाचित पोर्चमध्ये बसलेले डॉ. सिंक्लेअर तुम्हालाही दिसतील आणि शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचं ब्रिटिश कोल्हापूर तुमच्यासमोर खुलं करतील.
९८२२४४९८५६




Comments
Post a Comment