....आणि कोल्हापुरात क्रिकेट बॉलचा टप्पा पडू लागला
लष्करी छावणी, कोहट, पंजाब ( पाकिस्तान ) येथे १८६२ मध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्यात सुरु असलेला क्रिकेट सामना. हे भारतातील क्रिकेट सामन्याचे पहिले छायाचित्र आहे. १९८३ चं अंधुक, पण २०११ चं मात्र अगदी ठळक आठवतंय. नगारखान्यासमोरच्या चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळयाला हार घालायला गटागटांची नुसती झुंबड उडालेली. वर्ल्डकप जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्याची ही कोल्हापुरातली पद्धत ! ही अशीच पद्धत का ?, क्रिकेट आणि कोल्हापूरातला शिवाजी महाराजांचा पुतळा यांचा काय संबंध ? असे प्रश्न फक्त कोल्हापूर बाहेरच्याच लोकांना पडतील. अनोळख्या व्यक्तीला उन्माद वाटावा असा हा जल्लोष आणि आगळी तऱ्हा फक्त कोल्हापुरातच. या जल्लोषामागे देशभक्ती तर आहेच पण काकणभर चढ आहे ते क्रिकेटवरचं प्रेम ! तसं बघायला गेलं तर फुटबॉलसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कोल्हापुरात अशा जल्लोषाचं भाग्य खुद्द फुटबॉलला कमीच किंवा नाहीच. फुटबॉलचा जल्लोष हा आजकाल फक्त पेठांच्या मर्यादेतच अडकलेला दिसतो. मुल उभा रहायला शिकल्यावर पावलं टाकण्याआधी फुटबॉलला किक मारायला शिकतं अशा कोल्हापुरात क्रिकेट कधी रुजलं, वाढलं याचा शोध मी घ्यायला सुरुवात केली ...