Bridge To India....

 

Bridge to India


 जाड अशा लोखंडी तारांनी तोललेला जगातला पहिला पुल इटलीत अर्नो नदीवर बनवला गेला, १९७८ साली. आता हा पुल नक्की कसा असतो ? यासाठी मुंबईतला बांद्रा वरळी सी लिंक ब्रीज डोळ्यासमोर आणला तरी पुरेसं आहे. या अशा पहिल्या पुलाचा आणि कोल्हापूरचां संबंध आहे. अगदी दुरून असला तरी आहे. मुळात या इटलीतील पुलाचा इटालियन भाषेतील नावाचा अर्थच आहे भारताला जोडणारा पुल, आणि यासाठी कारणीभूत ठरतं ते कोल्हापूर ! तसं हे कारण म्हणजे एक शोकांतिकाच आहे. या पुलाजवळ कोल्हापूरचे नाव, संस्कृती आणि इतिहास गेली दीडशे वर्षे उभा आहे. इथंच, अर्नो नदीच्या काठावर आहे करवीरकर छत्रपती राजाराम यांची समाधी !!! आणि या समाधीच्या सानिध्यात बनवलेला हा पुल एक प्रकारे फ्लॉरेन्स शहराला कोल्हापुरशी जोडतो म्हणून नाव ही समर्पक दिलंय Bridge To India.

आजच्या पिढीला या राजाराम महाराजांची थोडी फार ओळख असू शकेल. कारण त्यांनी पायाभरणी केलेल्या मेन राजाराम हायस्कूल बद्दलचा वाद सध्या गाजत आहे. असो. त्यावेळचे पॉलिटिकल रेसिडेंट अँडरसन यांनी राजाराम महाराजांच्या आग्रहावरून शाळेची जागा अगदी नगारखान्यालगतचं निश्चित केली. त्यासाठी त्या जागेवर असलेल्या घरानां योग्य तो मोबदला देऊन त्यांचे स्थलांतर करण्यात आले. हायस्कूलची इमारत नगारखान्याला साजेशी उभारायचं ठरलं आणि कामगिरी सोपवली गेली चार्ल्स मँट या अद्वितीय कल्पकाकडे. नाव ठरलं कोल्हापूर हायस्कूल. यथावकाश पायाभरणी करून राजाराम महाराज युरोप दौऱ्यावर रवाना झाले. विशेष उल्लेखाची बाब म्हणजे हायस्कूलच्या पायाचा जो पहिला दगड बसवला गेला त्याला मुद्दाम केलेल्या खोबणीत तेंव्हाच्या चलनातील नाणी, त्यादिवशीची कोल्हापुरात प्रकाशित झालेली वृत्तपत्रे आणि हजर असणाऱ्या प्रतिष्ठित लोकांच्या सह्या असलेला कागद ठेवला गेला होता. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे महाराजांचा युरोप दौरा सुरू झाला. समुद्र पार करून भारतातून इंग्लंडला जाणारे पाहिले हिंदू सत्ताधीश ठरले राजाराम महाराज. समुद्र उल्लंघन बंदीच्या धार्मिक समजुतीनां छेद देत एक प्रकारे पुरोगामी पणाची पताकाच महाराजांनी विलायतेत रोवली. इंग्लंड मध्ये पार्लमेंट चे कामकाज बघून महाराज प्रभावित झाले. लंडन मध्ये असताना महाराज एका मोठ्या जागतिक घटनेचे साक्षीदार ठरले. लंडन ते अमेरिका आणि लंडन ते भारत अशी समुद्रातून टाकलेल्या केबलद्वारे पहिली तार राजाराम महाराजांच्या उपस्थितीतचं पाठवली गेली. लंडनहून इंग्लंडच्या राजपुत्राने पाठवलेल्या तारेला कलकत्याहून व्हॉईसरॉयचे पाच मिनिटात आलेलं उत्तर बघून महाराज फारच प्रभावित झाले. आयर्लंड मध्ये महाराजांनी स्वतः चे काही फोटोही काढून घेतले. पुढे जर्मनी (तेंव्हाचा प्रशिया) मध्ये एकंदरीत युरोपातील इमारतींचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी असाच एक भव्य राजवाडा कोल्हापुरात असावा अशी इच्छा सोबतच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. आणि त्याबर हुकूम कोल्हापूरात एक भव्य राजवाडा उभारायचं तिथंच निश्चित झालं. हे काम ही मेजर चार्ल्स मँट यांच्याकडेच सोपवायच निश्चित झालं. दौरा आटोपल्या नंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार होती. हाच आजचा न्यू पॅलेस. पण हे काम पुढे सरकायला काही काळ जावा लागला. आजच्या न्यू पॅलेस चे खरे जनक राजाराम महाराज आहेत हे फारच थोडया लोकांना माहीत असेल.

युरोप दौऱ्याच्या पुढच्या भागात महाराजांचे इटलीत आगमन झाले. पण त्याचवेळी तब्येत बिघडायला सुरुवात झाली. अखेर फ्लॉरेन्स शहरात ३० नोव्हेंबर १८७० रोजी त्यांनी कोल्हापूरपासून दूर अनोळखी भागात जगाचा निरोप घेतला. वय होते अवघे वीस ! अवघा युरोप या घटनेमुळे हळहळला. त्यावेळच्या इटालियन, जर्मन, इंग्लिश तसेच अमेरिकन वृत्तपत्रांतून महाराजांच्या दौऱ्याबद्दल आणि त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल बरीचशी माहिती छापून आलेली आहे. त्यात त्यांच्याबद्दलच कुतूहलचं जास्त दिसतं. त्यांच्या कायम फेटा बांधून वावरण्याच्या पद्धतीबद्दल लोकांना विशेष आकर्षण वाटायचं. त्यांनी जेवणासाठी बरोबर आणलेला तांदूळ, मसाले, पीठ, मीठ हे विशेष चर्चेचा विषय बनले होते. काटे आणि चमचे न वापरता जेवण्याच्या त्यांच्या भारतीय पद्धतीबद्दल आणि जेवणानंतर खसखसून हात धुण्याबद्दलसुद्धा बरेच छापून आलेले आहे. त्यांचा मनमोकळेपणा , अगदी हाताखालच्या लोकांना सुद्धा मान देऊन वागवण्याच्या पद्धतीमुळे राजाराम महाराज तेथील जनतेचे आवडते बनले होते. त्यामुळेच त्यांच्या निर्वाणानंतर जेंव्हा दहनविधी बद्दल जेंव्हा काही कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या तेंव्हा स्थानिक नियम डावलून दहनाची परवानगी देण्यात आली. युरोप मध्ये हिंदू पद्धतीने झालेला हा पहिलाच अंत्यसंस्कार विधी होता. तो ही एका सार्वभौम राजाचा ! त्यामुळे या अंत्यसंस्कार विधीची अगदी तपशीलवार माहिती Burning of a Hindu Rajah या मथळ्याखाली तेथील वृत्तपत्रांनी छापली. यात महाराजांचे कलेवर हिंदू पद्धतीप्रमाणे मांडी घातलेल्या अवस्थेत होते इथपर्यंत बारीकसारीक तपशील उत्सुकतेपोटी घातलेला आहे.

१ डिसेंबर १८७० रोजी रात्री एक वाजता हे अंत्यसंस्कार पार पाडले गेले. उत्तररात्री ही अंत्ययात्रा अर्णो नदीच्या तीरावर आली. स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून फ्लॉरेन्स नगरपालिकेचे पदाधिकारी आणि पोलीस प्रमुख हजर होते. परदेशात असूनही असंख्य लोक या कार्यक्रमासाठी जमले होते. विधिवत अग्नी दिला गेला. रात्रभर चिता पेटल्यावर सकाळी रक्षा विसर्जनाचा विधी पार पाडला गेला. या रक्षा विसर्जनाच्या विधीचेही अगदी तपशीलवार वर्णन उपलब्ध आहे. इकडं तारेने ही बातमी कोल्हापुरात आली साऱ्या कोल्हापुरवर दुःखाची छाया पसरली. त्यानंतर राजाराम महाराजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक श्रद्धांजलीपर कार्यक्रम पार पाडले. यातली उल्लेखनीय घटना म्हणजे ज्या कोल्हापूर हायस्कूलची पाया भरणी करून महाराज युरोप दौऱ्यावर गेले होते, त्याच नाव बदलून राजाराम हायस्कूल ठेवण्यात आले.

महाराजांच्या अतिशय मनमिळाऊ स्वभावामुळे ब्रिटिश सरकारने फ्लॉरेन्स शहरात ज्या ठिकाणी त्यांचे अंत्यसस्कार झाले तिथे एक मेघडंबरी, त्यांचे स्मृती स्थळ उभारायचे ठरवले. ब्रिटिश सरकार आणि कोल्हापूर दरबार यांनी संयुक्तपणे याचा खर्च केला. अतिशय कलात्मक अशी ही मेघडंबरी उभारण्याची कामगिरी सोपवली पुन्हा चार्ल्स मँट यांच्याकडेच. मँट हे राजाराम महाराजांचे मित्रच होते. १७ जून १८७४ रोजी ही मेघडंबरी अधिकृतपणे खुली केली गेली. चार कलात्मक खांबावर तोललेल्या एका कोरीव छत्री मध्ये राजाराम महाराजांचा पुतळा बसवला गेला. ब्रिटिश शिल्पकार चार्ल्स फुलर याने बनवलेला हा अर्धपुतळा कोल्हापुरातल्या राजाराम हायस्कूल मध्ये असणाऱ्या राजाराम महाराजांच्या अर्धपुतळयावरच आधारित आहे. मेघडंबरीच्या मोरपंखी छत्रीवर सुंदर कोरीव काम केलेले मोर या छत्रीची शोभा अजूनच खुलवतात. बाजूलाच कोरलेला कोल्हापूर दरबाराचा मोर्चेल लक्ष वेधून घेतो. पुतळ्याच्या चौथऱ्यावर मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इटालियन भाषेत त्यांचा मित्र आणि या मेघडंबरीचा शिल्पकार चार्ल्स मँट याच्या नावाने महाराजांच्यावर मृत्यूलेख कोरलेला आहे.

ज्या काळात ही मेघडंबरी उभारली गेली त्याचवेळेला तिच्या समोरच एक कॅफे उभा राहिला. त्याची इमारत ही अशीच देखणी. पण नाव होतं Indian Palace. शहरातले अभिजन राजाराम महाराजांचा पुतळा न्याहाळत, अर्नो नदीकडे पहात कॉफीचे घुटके घेत असत. कालांतराने कॅफे बंद पडला पण indian palace मात्र अजूनही राजाराम महाराजांची साथ करत उभा आहे.



राजाराम महाराजांसारखा एखादा माणूस, राजेपणाची झुल बाजूला सारून जेंव्हा सामान्य माणसात मिसळतो तेंव्हा त्याच्या मोठेपणाला जात, भाषा, देश यांची बंधने रोखू शकत नाहीत. राजाराम महाराजांचा हा आठव फ्लॉरेन्स शहराने काळाच्या पलीकडे जाऊन जपलेला आहे. इथं कोल्हापुरात मात्र त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न होत आहे यासारखा दैवदुर्विलास कोणताही नाही. कोल्हापूरला शैक्षणिकदृष्ट्या सर्वोच्च पातळीवर नेण्याची स्वप्नं बघणारा हा राजा जेंव्हा फ्लॉरेन्सच्या भूमीवर कायमचा विसावला तेंव्हा कोल्हापुरला फक्त फ्लॉरेन्सचं नव्हेतर जगाशी सांधण्याच मोठं कार्य त्यांच्याकडून घडलं गेलं आणि राजाराम महाराजांची समाधी आणि त्याच्या शेजारचा पुल हेच अधरेखित करतात.

चार्ल्स मँट याने घडवलेली मेघडंबरी


 

© भारत पांडुरंग महारुगडे

९८२२४४९८५६

#आठवणीतलं_कोल्हापूर




Comments

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!