कृतिसमिती
२२ मार्च १८८५ ची संध्याकाळ. रविवारचा दिवस होता. शुक्रवार नसतानाही अंबाबाईच्या देवळात तुडुंब गर्दी जमली होती. कसलीशी सभा भरणार असं दिसत होतं. बघता बघता गावातले प्रतिष्ठित, उच्चभ्रू, मध्यम वर्गीय ते हातावर पोट असणारे असे साऱ्या थरातले लोक रामाच्या पाराजवळ जमले. लोकांची कुजबुज आणि बऱ्याच जणांचा कपड्याचा अवतार यावरून अगदी आयत्यावेळी अचानक सभा बोलावली होती असं दिसत होतं. जमदग्नी सावकारांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली... विषय होता पाण्याचा आणि निमित्त होतं, दक्षिणवृत्त नावाच्या वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीचा..
" कोल्हापूर नगरपालिका पाण्यावर कर बसवणार ".
रानडे वकिलांनी सभा सुरू केली. विषय असा होता.
आठ दहा वर्षांपूर्वी कात्यायनीच्या डोंगरातून कमानी घालून त्यावर पाट बांधून कोल्हापुर पाणी पुरवठा योजना सरकारने कार्यान्वित केली होती. (सध्याचा पाण्याचा खजिना). काही काळातच त्यात काही त्रुटी आढळल्याने कळंबा तलाव खोदून ही योजना सुधारली होती आणि पाण्याचा अखंड पुरवठा सुरू झाला होता. हा तलाव खोदण्यासाठी सरकारला बऱ्यापैकी खर्च आला होता. (सरकार म्हणजे कोल्हापूर दरबाराच्या वतीने कामकाज बघणारे बावडा रेसिडेन्सीतील ब्रिटिश प्रशासन) आणि सरकार त्या खर्चाचं व्याज कोल्हापूर नगरपालिकेकडून वसूल करू बघत होतं. त्या अनुषंगाने नगरपालिकेत चर्चा होऊन हे व्याज सरकारला देण्याचं कबूल करण्यात आलं आणि हा खर्च कोल्हापूरच्या नागरिकांवर कर बसवून वसूल करावा असा ठराव देखील पास करण्यात आला होता. आणि या पाणीपट्टीला विरोध करण्यासाठी ही सभा भरली होती.
राजाराम कॉलेजचे विद्यार्थी विष्णू गोविंद विजापूरकर यांनी लोकांची बाजू मांडायला सुरू केली. त्यांचं म्हणणं होत, " मुळात ही योजना नागरिकांच्या उरावर जबरदस्तीने बसवण्यात आली. शिवाय कळंबा खोदून ही योजना कार्यान्वित करायला सरकार सांगतंय तितका खर्च आलेला नसावा. शंभर वर्षांपूर्वी १७९७ साली पुण्याच्या बाबुराव केशव ठाकूर यांनी कोल्हापुरात खापराच्या नळातून सुरू केलेली पाणी योजना नीट आणि पुरेशी असताना नव्या योजनेची गरज नव्हती. (या ठाकूरांच नाव पाण्याच्या खजिन्यावर कोरलेलं आहे.) सरकार अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल, राजाराम कॉलेजची इमारत, अहिल्याबाई मुलींची शाळा, टाऊन हॉल अशा गोष्टींवर गरजेपेक्षा जास्त खर्च करत असून हा खर्च पाणीपट्टीच्या नावाखाली गोरगरिबांकडून वसूल करण्यात येणार आहे.
पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर कर बसवणे म्हणजे पाप आहे हे नगरपालिकेला समजावून दिले पाहिजे." पुढे फर्नांडिस, सोनटक्के अशा पुढारी लोकांची भाषणे झालीत आणि नगरपालिकेला जाब विचारण्यासाठी १०० लोकांची एक समिती नेमण्यात यावी असं ठरलं.
आता या घटनेला आजच्या काळाशी जोडून बघू . कोल्हापुरातली ही बहुधा पहिली कृतिसमिती म्हणता येईल. पाणीपट्टीच्या आधीही दहा वर्षापूर्वी घरफाळा सुरू झाल्यावर नगरपालिकेविरोधात लोकांनी असंतोष व्यक्त केला होताच पण संघठीतपणे आणि रीतसर विरोध मात्र यावेळेसच करण्यात आला. आजच्या काळात टोल म्हणा किंवा मटणाचे दर म्हणा अशा इतर कुठल्याही सामाजिक प्रश्नावर नागरिकांची कृती समिती बसवण्यात येते. तिची मुळे कुठेतरी अंबाबाईच्या देवळात अचानक घेतलेल्या या एकशे सदतीस वर्षांपूर्वीच्या सभेतच असावीत.
जाता जाता ... इतकं करून तेंव्हाही पाणीपट्टीचा निर्णय रद्द झाला नाहीच..
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
Comments
Post a Comment