ताराबाई रोड, जे. पी. नाईकांच्या कष्टाचे फळ...
अंबाबाई मंदिर म्हणजे कोल्हापूरचा मानबिंदू. त्याच्या आसपास गाव वसलं आणि वाढलं. पण ही वाढ अनिर्बंध आणि कुठल्याही नियोजना शिवाय झालेली होती. एका बाजूला राजवाडा आणि इतर सरदारांचे वाडे तर दुसऱ्या बाजूला कपिलतीर्थ आणि खंबाळ्याच्या आसपास वाढलेली अस्ताव्यस्त नागरी वस्ती यांच्यामुळे देवळाचा श्वास गुदमरला होता. इतका की अंबाबाई पासून रंकाळा गाठायचा झाला तर दाट वस्तीमधून तुटक तुटक पाच ते सहा अरुंद बोळ पार करून जावे लागे. या दरम्यान एकच मोठा आडवा रस्ता लागे तो म्हणजे तट पाडून तयार झालेला रस्ता. ही परिस्थिती अगदी १९४३ पर्यंतची. नाईकांनी त्यांच्या आराखड्यात देवळाच्या चारही मोठ्या दरवाजापासून थेट पुढे जाणारे रुंद रस्ते आखले. त्यापैकी दक्षिण दरवाजा आणि पश्चिम दरवाजा समोरचं काम त्यांच्या कारकीर्दीत पूर्ण झालं. दक्षिण दरवाजासमोरचा रस्ता, जुन्या राजवाड्याचा काही भाग, एक मोठी कमान पाडून रुंद केला गेला. या कामात त्यांनी सामान्य नागरिकाप्रमाणे दरबारने ही त्यागाची तयारी ठेवली पाहिजे असा आग्रह धरला होता आणि जुन्या राजवाड्याचा गरजेपुरता भाग आणि एक देखणी कमान पाडून तो पुरा ही केला. या कामात जी जागा उपलब्ध झाली त्यातला काही भाग दीक्षित गुरुजींच्या विद्यापीठ हायस्कूलला देण्यात आला. उत्तर आणि पूर्व दरवाजा समोरचं काम कागदावर सोपं असलं तरी प्रत्यक्षात मात्र अवघड होतं. त्यामुळं लक्ष केंद्रित झालं ते पश्चिम दरवाजा समोरून थेट रंकाळा गाठणाऱ्या रस्त्याच्या कामावर !!!
मूळ योजनेप्रमाणे महाद्वारापासून सरळ पश्चिमेला महाद्वार रोड पार करून रस्ता काढायचा होता जो सरळ संध्यामठाला भिडला असता. पण हा रस्ता गेला असता तो कपिलेश्वराच्या मंदिराजवळून, मुनीश्वरांची काही घरे ओलांडून, शिवाजी पेठेतील बऱ्याच गल्ल्या आणि घरे दुभागुन. एकंदरीत साठ सत्तर घरे आणि वीस पंचवीस जागांचा प्रश्न होता. इतकी मोठी संख्या बघता या सर्वच्या सर्व जागामालकांचे सहकार्य तर मिळालेच नसते आणि नुकसान भरपाईची बाबही खर्चिक झाली असती. नाईकांनी पुन्हा नकाशा तपासला आणि एक दुसरी योजना आखली. आता महाद्वार रोडवर थोडं उजवीकडे वळून, रंकाळा गाठायचा होता. हा रस्ता रंकाळा टॉवर आणि संध्यामठाच्या मध्ये निघाला असता. खंबाळा तलावाचा काही भाग आणि पाटणकरांच्या वाड्याच्या मागची रिकामी जागा यांचा मोठा लाभ रहिवासी वस्ती नसल्यामुळे या योजनेत मिळणार होता. शिवाय आधीच्या योजनेतील रस्त्यापेक्षा याची लांबी कमी असणार होती. फक्त प्रश्न होता तो १४ घरांचा !!! शिवाय लहान मोठ्या अशा पन्नास जागा संपादन कराव्या लागणार होत्या. या योजनेत एक प्रमुख त्रुटी अशी होती की रस्ता अगदी नाकासमोर सरळ होत नव्हता. मुळात महाद्वार चौकातून थोडं उजवीकडे वळताना आणि पुढे बाबुजमाल समोरून तटाचा रस्ता ओलांडताना हा रस्ता तिरका होत होता. पण हे सर्व अडथळे लक्षात घेऊन जे पी नाईकांनी ही जोखीम पेलली. आता ही जोखीम फक्त रस्ता तयार करण्याची नव्हती तर संबंधित जागा मालकांची समजूत घालणे, त्यांची नुकसान भरपाई बजेटमध्ये बसवणे या बाबी सुद्धा महत्वाच्या होत्याच.
ज्या पद्धतीने जे पी नीं या घरमालकांची समजूत घातली, खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या त्या म्हणजे शासनासाठी कायम आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरतील अशाच होत्या. सर्वात आधी जे पी नीं मिळकत मालकांची व्यक्तिगत माहिती गोळा केली. घरात मिळवती माणसे किती ? कुटुंबाचं उत्पन्न किती, कुटुंब किती मोठं? याची बारीक सारीक माहिती जमवली. अगदी त्या घरात लग्नाच्या मुली किती आणि त्याचा खर्च करायची घरातल्यांची ऐपत आहे काय? इथंपर्यंत जे.पी. पोचले. त्यावरून प्रत्येक घराशी वाटाघाटीची पद्धत त्यांनी ठरवली होती. अगदी सकाळी सकाळी जे. पी. संबंधित घराच्या दारात जात. आणि शहर सुधारणे साठी रस्ता आणि पर्यायाने घर पाडणे किती गरजेचे आहे हे पटवून देत. नोटीस काढून घर मालकाला कचेरीत बोलण्यापेक्षा ही पद्धत खूपच परिणामकारक ठरली. गोविंदराव सरदेसाई यांच्यासारखा दरबारात वजन असणारा माणूस फक्त जे पींच्या एका शब्दावर घर ताब्यात द्यायला तयार झाला. याचं कारण म्हणजे जे पींची विनम्रता आणि मधाळ बोलणं. पण इतकं करूनही त्यांच्या विरोधात कोल्हापूरचे मुख्य प्रशासकीय ब्रिटिश अधिकारी ई डब्ल्यू पेरी यांचेकडे तक्रार अर्ज दाखल व्हायचेच. (इरसाल कोल्हापूरकर यांना माघारी एकनाथ वामन पेरी म्हणून बोलवायचे.) पेरी सायकलवरूनचं गावात फिरत. एखादा अर्ज आला की नाईकांना घेऊन पेरी त्या घराच्या दारातच रुजवात घालायला हजर व्हायचे. त्यामुळे तक्रारदारच अडचणीत यायचा. हळूहळू सर्व मिळकती बिनविरोध ताब्यात आल्या.
आता द्यायची होती ती नुकसान भरपाई. ही प्रत्येकाला रोख रकमेच्या स्वरूपातच दिली जाईल असे नव्हते. तो सर्वात शेवटचा पर्याय होता. सर्वात आधी कोल्हापुरातच दुसरीकडे बदली घराचा पर्याय ही दिला गेला. त्यासाठी अशी घरे नाईकांनी हेरून ठेवली होती. ते न साधल्यास रिकामी जागा आणि घर बांधायला योग्य त्या प्रमाणात पैसे दिले गेले. आणि जर रोख रक्कम द्यायची वेळ आली तर ती ही भरभक्कम द्यायची तयारी नाईकांनी ठेवली. या शिवाय निर्वासितांच्या तात्पुरत्या व्यवस्थेसाठी सरकारकडून भाड्याने घरे घेतली गेली, इतकेच काय पण सामान हलवायला नगरपालिकेचे ट्रक आणि कामगार दिमतीला दिले गेले. पुनर्वसनाची ही पद्धत जगात आदर्श ठरेल अशीच होती.
सरते शेवटी घरे पाडण्याचा कार्यक्रम अगदी धडाक्यात समारंभपूर्वक १६ डिसेंबर १९४३ रोजी अगदी नारळ फोडून करण्यात आला. पाडापाडी च्या कार्यक्रमाचा असा शुभारंभ खचितच कुठे झाला असेल. हा कार्यक्रम उजळ माथ्याने पार पाडला याचं कारण घरे जाणाऱ्या लोकांची कोणतीच नाराजी राहिली नव्हती. सुमारे ५५ ते ६० फूट रुंदीचा हा रस्ता शेवटी तयार झाला. आसपासचा परिसर ओळखू येण्यापलीकडे बदलून गेला. जवळपास १०० च्या वर मिळकती आता या हमरस्त्यावर आल्या. जुन्या बोळा बोळाची दाटी असलेल्या घाणीच्या जागा नष्ट झाल्या. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रंकाळ्यावरून येणारा पश्चिमेचा वारा थेट भरवस्तीत खेळू लागला. रंकाळ्याला हा रस्ता जेंव्हा भिडला तेंव्हा नाईकांनी अजुन एक काम करून टाकलं. राजघाटावर लोकं सायकली घेऊन यायचे. त्यामुळे तिथं फिरायला येणाऱ्या लोकांना धूळ आणि वर्दळीचा त्रास होऊ लागला होता. नाईकांनी तिथं दोन आडवे कट्टे बांधून हा मार्गच वाहनांसाठी बंद करून टाकला. (रंकाळा कमान आणि बंदुकीने फुगे फोडले जातात त्या दुकानाशेजारी हे कट्टे शाबूत आहेत.) रस्ता बांधून तयार झाल्यावर नाईकांनी त्याचा खर्च वसूल करण्यासाठी नवीन शक्कल लढवली. ज्या ज्या मिळकती आता हमरस्त्यावर आलेल्या होत्या आणि ज्यांना आता या रस्त्याचा लाभ होणार होता त्यांच्याकडून विशेष कर वसूल करण्यात आला. बघता बघता त्या परिसराचं रूप पालटलं आणि गावभागातल्या आर्थिक उलाढालीत महाद्वार रोड नंतर ताराबाई रोड हाच महत्वाची भूमिका पार पाडायला लागला..
आता काळाची गती जवळपास पाऊण शतकानी पुढं सरकली आहे. इतक्या वर्षात या रस्त्यावरच्या रहिवाशीपणाच्या खुणाही आता पुसट होत चालल्यात आणि व्यापार उदिमाची सुबत्ता ठळक झाली आहे. त्यामुळे येणारा गोंगाट, अस्ताव्यस्त पसरलेली गर्दी, आणि प्रदूषण यात पूर्वीचा ताराबाई रोड आणि त्याच्या निर्मितीचा मूळ हेतूही हरवून गेलाय. या रस्त्याच्या निर्मितीसाठीचे जे.पी. नाईकांचे कष्ट आणि त्यांचं नाव ही काळाच्या उदरात गडप झाले आहे. पण साठीच्या पुढची पीढी मात्र एकेकाळी अनुभवलेल्या रंकाळ्यावरून येणाऱ्या वाऱ्याच्या आठवणीत ताराबाई रोडवरूनचं अंबाबाईला नमस्कार करताना दिसते.
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
Comments
Post a Comment