एकेकाळच्या कोल्हापूरातले सरकारी सण आणि पद्धती...
कोल्हापूर हे मन लावून प्रथा पाळणारं आणि त्यापेक्षाही त्या प्रथा अभिमानानं मिरवणारं गाव आहे. टेंबलाबाईची जत्रा असो किंवा फुलाच्या दुकाना बाहेर रात्री टांगलेला हार असो. या अशा "पाडलेल्या पद्धती" कोल्हापूरकर कित्येक पीढ्या पाळत आहेत. विशेष म्हणजे यातल्या काही प्रथा राष्ट्रीय आहेत. राष्ट्रीय प्रथा म्हणजे नक्की काय असा प्रश्न फक्त कोल्हापूर बाहेरच्या माणसालाच पडेल. कारण पण या प्रश्नाचं उत्तर कोल्हापुरातल्या प्रत्येक घरात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला आणलेली गोड गोड जिलेबीच देईल. या प्रथांच मूळ शोधायला गेलं तर सापडतंच असं नाही, मात्र या प्रथा किती जुन्या आहेत हे मात्र उकलता येतं. आता या आपल्या राष्ट्रीय सणांच उदाहरण घ्या. सहज वाटेल की या दिवशीच्या कोल्हापुरातल्या पद्धती १९४७ पासून सुरू झाल्या असाव्यात. पण या बद्दल जरा खोलात गेलं की काही मजेदार माहिती मिळते आणि काही प्रश्नाचं उत्तर ही मिळतं.. त्याबद्दल थोडसं...
स्वातंत्र्यपूर्व काळात, म्हणजे अगदी शाहू महाराजांच्याही आधी कोल्हापुरात दोन राष्ट्रीय किंवा सार्वजनिक सण अगदी सरकारी इतमामात आणि अगदी लोकांच्यात जाऊन साजरे केले जात. व्हिक्टोरिया राणीचा वाढदिवस (Queen s Birthday ) आणि भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनी कडून राणीने ताब्यात घेऊन जाहीरनामा प्रसिध्द केला तो दिवस (Proclamation Day)...
मुळात कोल्हापूर ही दक्षिण मराठा संस्थानाची राजधानी असल्याने हे कार्यक्रम कोल्हापुरातच व्हायचे. १८७६ साली हा जाहीरनामा दिन कोल्हापूर शहरात कसा कसा साजरा केला त्याचं हे मजेशीर आणि गोड गोड वर्णन... (यावेळी नवा राजवाडा बांधला गेला नसल्याने ,यातील वर्णन हे जुन्या राजवाड्याला उद्देशून आहे.)
" १ नोव्हेंबर १८७६ चा दिवस.. दुपारचे दोन वाजले असावेत. राजवाड्याच्या प्रांगणात दरबाराच्या हत्ती आणि घोड्यांचा लवाजमा जमायला लागला. आठवडाभर आधीपासुनच आसपासच्या परिसराची सफाई केली गेली होती. लोकं जागा मिळेल तिथं दाटीवाटीने उभे होते. आसपासचे वाडे आणि अगदी राजवाड्यावर सुद्धा लोक चढून बसले होते. चारच्या सुमाराला करवीर दरबाराचे वतनदार आणि मानकरी आपापला लवाजमा घेऊन यायला सुरुवात झाली. मुख्य कार्यक्रम दरबार हॉल मध्ये व्हायचा होता. आपापल्या मानाप्रमाने मानकरी स्थानापन्न झाले. हॉलच्या मध्यभागी करवीरकर छत्रपती आणि ब्रिटिश पॉलिटिकल एजंट यांची बैठक व्यवस्था होती. त्याचवेळी बावड्यात रेसिडेन्सी मध्ये पोल्टिकल एजंट साहेबाला ब्रिटिश सैनिकांची मानवंदना दिली जात होती. विशेष कामगिरी केलेल्या सैनिकांना मेडल वाटण्यात आली. पावणे पाच वाजता छत्रपती विशेष दरबारी पोशाखात राजवाड्यातील दरबार हॉल मध्ये हजर झाले. त्याच वेळी पॉलिटिकल एजंटच ही आगमन झालं. बिगुल आणि ट्रंपेट च्या आवाजात खडी ताजीम देऊन दोघांचं स्वागत केलं गेलं. पॉलिटिकल एजंट यांचं भाषण इंग्रजीतून सुरू झालं. त्या दिवसाचं महत्व काय, राणीचा कारभार कसा लाभदायक आहे यावर त्यांनी विचार मांडले. त्याचवेळी चांगल्या वर्तणुकी बद्दल काही कैद्यांची शिक्षा कमी केल्याची घोषणा करण्यात आली. भाषण संपताच बाहेर बंदुका झाडून आणि १०१ तोफांची सलामी देण्यात आली. त्या आवाजाने एक हत्ती बिथरला. पण सुरक्षा व्यवस्था इतकी चोख होती की कुठेही गोंधळ माजला नाही. उपस्थितांना निरोपाचे विडे पान देऊन दरबार बरखास्त झाला.
थंडीचे दिवस होते त्यामुळे लवकरच अंधार पडला. आणि त्या अंधारात विशेष रोषणाई केलेले अंबाबाई मंदिर, नगारखाना, राजाराम कॉलेज आणि टाऊन हॉल झळाळून निघाले. आता रस्त्यावर गर्दी वाढली. रेसिडेन्सी पासून नगारखान्या पर्यंत रस्त्यावर चिनी पद्धतीचे दिवे लावून झगमगाट केला होता. लोकांची पावलं वळली ती वेशीबाहेरच्या माळावर. सरकार तर्फे आतिषबाजीचं प्रयोजन होतं. वेगवेगळ्या आकारात फुटणारे तारनळे , कारंजे आणि अग्निबाण यामुळे रात्री सुद्धा दिवस उजडल्याचा भास कोल्हापुरात झाला. आकाशात गेल्यावर विशिष्ट अक्षरे उमटवणारी आतिषबाजी लोकं आश्चर्याने बघत होती. शेवटच्या सत्रात चिनी पद्धतीचे हवेत तरंगणारे आकाश दिवे सोडण्यात आले. कोल्हापूरात तारकामंडळ खाली उतरल्याचा आभास निर्माण झाला होता. तिकडे छत्रपातींतर्फे रेसिडेन्सीतल्या ब्रिटिश अधिकारी वर्गासाठी टाऊन हॉल मध्ये विशेष इंग्रजी पद्धतीचा बडा खाना दिला गेला आणि राणीला दीर्घायुष्य चिंतण्यात आले."
आजच्या स्वातंत्र्योत्तर काळात हे वर्णन वाचून त्यावेळच्या कोल्हापूर बद्दलचं कुतूहल अजून वाढतं. आजच्या काही प्रथांचे मूळ कुठेतरी अशा कार्यक्रमात कदाचित कसं असू शकेल याचं एक उदाहरण सांगतो.
वर सांगितलेल्या Proclamation Day च्या दिवशी कोल्हापुरात मुख्य चौकातून सरकार तर्फे सर्व नागरिकांना मिठाई वाटली जात होती आणि सर्व लोक उत्साहाने ती घेत होते .
आता दर १५ ऑगस्ट दिवशी हातात असलेली जिलेबी बघत तुम्हीच ठरवा आपण आणि आपल्या आधीच्या पीढ्या कधीपासून सरकारी सणादिवशी मिठाई खात असू...
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
Comments
Post a Comment