अशीच एक प्रथा, ग्रॅहॅमच्याच शब्दांत !!!

 कोल्हापूर पहिल्यांदा कागदावर लिखित रुपात मांडलं गेलं ते करवीर महात्म्यात. पण त्यात कोल्हापूरचं फक्त अध्यात्मिक स्वरूप आणि ते ही भौगोलिक जोड देऊन रंगवलय. पण खऱ्या अर्थाने कोल्हापूर उभं आडवं कागदावर उभं करायचं श्रेय जातयं ते मेजर डग्लस सी. ग्रॅहॅम यालाच. कोल्हापूरवर इंग्रजी सत्ता आल्यावर ती राबवणारा हा पहिला अधिकारी. कोल्हापूरचं स्वतःचं चलन रद्द करून ईस्ट इंडिया कंपनीचा रुपया चलनात आणणाराही हाच मेजर ग्रॅहॅम. त्याने लिहिलेला ग्रॅहॅम रिपोर्ट म्हणजे १८५४ सालच्या कोल्हापूरचां आरसाच आहे. पुढच्या काळात येणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांना कोल्हापूर समजावं यासाठी ग्रॅहॅमने हा रिपोर्ट लिहिला. 

या रिपोर्टचा आवाका बघता त्याला ग्रंथराज म्हणणे जास्त योग्य ठरेल. या रिपोर्ट मध्ये काय आहे हे शोधण्यापेक्षा काय नाही हे शोधणे आजही अवघड आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन मधील डायरेक्टर बोर्डाच्या आदेशानुसार ब्रिटिश अखत्यारीतील मुलुखाची सर्वांगीण माहिती संख्याशास्त्राच्या आधारे गोळा करायचं काम कोल्हापूरसाठी ग्रॅहॅमने पार पाडलं. १८४६ ते १८५४ या आठ नऊ वर्षात कोल्हापुरातली जमीन, हवामान, पाणी, तळी, बंधारे, लोकसंख्या, उत्पन्न, उद्योगधंदे, गुन्हे, वाहतूक, कर व्यवस्था, लोककला, भाषा, शिक्षण आणि गणती करता येणार नाही इतक्या विषयांचा आढावा ग्रॅहॅम ने घेतला. त्यातून अनेक धक्कादायक गोष्टींची माहिती होते. उदाहरणार्थ १८५४ च्या आधीही कोल्हापूर भागात कॉफीचं उत्पादन घेतलं जातं होत ही नोंद आपली उत्सुकता वाढवते. ग्रॅहॅम असाच कोड्यात पाडतो तो त्यावेळच्या काही प्रथांबद्दल. आज एकविसाव्या शतकात या प्रथा कालबाह्य होऊन बंद पडल्या आहेत. त्या चांगल्या की वाईट याचं विवेचन करण्यापेक्षा फक्त इतिहासातील या गोष्टींकडे निर्विकार पणे पाहणे जास्त श्रेयस्कर. कोल्हापुरातील अशीच एक प्रथा रेड्याच्या बळीची, ग्रॅहॅमच्याच शब्दांत !!!

कोल्हापुरात आषाढ महिन्यात रेडा बळी दिला जात असे. पण १८५४ च्या आसपास हा बळी माघ किंवा फाल्गुन महिन्यात ही दिला जाऊ लागला होता. मंगळवार धरून टेंबलाबाई शेजारच्या मरगाबाईला हा सोडलेला धर्ष्ट पुष्ट रेडा बळी दिला जायचा. सकाळी तेल लाऊन अंघोळ घालून शेंदूर, चंदन फासून हा रेडा तयार केला जायचा. दुपारी तीन च्या सुमाराला उजव्या मांडीवर वार करून जखम केली जायची. आणि मग निघायची ती त्याची मिरवणूक. वाजत गाजत आंबील घुगऱ्या, लिंबू आणि नारळ उधळत ही मिरवणूक सुर्यास्ता पर्यंत कोल्हापूरला फेरी मारून टेंबलाबाईच्या टेकडीवर परत यायची. संपूर्ण मार्गावर रेड्याच्या जखमेतल्या रक्ताचं शिंपण झालेलं असायचं. मरगाबाईसमोर हा रेडा बळी दिला जात असे. सलग दोन दिवस असा कार्यक्रम चालायचा. बळी आणि पुढच्या अंगावर काटा आणणाऱ्या विधीच अगदी इत्यंभूत वर्णन ग्रॅहॅम ने केलंय. याच कार्यक्रमातला अजून एक भाग म्हणजे लक्षुमी आणि जुगळोबाची पूजा. दोघांच्या मूर्तींची दोनेक दिवसांसाठी मरगाबाई शेजारीच स्थापना करून कुंभार समाजाकडून पूजा केली जात असे. तिसऱ्या दिवशी गावाबाहेर त्या मूर्ती विसर्जित केल्या जात. या संपूर्ण प्रथेचा हेतू गावाची शीव बांधून कोल्हापूरवर येणारी संकटं टळावीत हाच असे.

आज अशा प्रथा बंद झाल्या आहेत. एकविसाव्या शतकातला चष्मा लावून एकोणिसाव्या शतकातल्या प्रथा योग्य की अयोग्य याचा निवाडा करणे अप्रस्तुतचं आहे. जे जे काळाशी विसंगत ते ते निसर्गनियमाने अस्तंगत होत जाते. पण ग्रॅहॅम च्या कृपेने एकेकाळी असंही कोल्हापूर होत याची नोंद मात्र घेतली जाते.


© भारत पांडुरंग महारुगडे

९८२२४४९८५६

#आठवणीतलं_कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!