कोल्हापुरात, ताराबाई रोडवर पाहुणा म्हणून आला आणि जीवाला मुकला...
२० डिसेंबर १९५२ ची थंडीतली सकाळ....
नुकताच दहा बारा वर्षांपूर्वी ताराबाई रोड बांधून खुला झाला होता. त्यामुळं अंबाबाईकडून रंकाळ्याकडं जाणारी वर्दळ आता ताराबाई रोड वरूनच वाहती असायची. सकाळची वेळ असल्याने काही पेठेतली मंडळी रंकाळ्यावर फिरायला तर कोणी अंबाबाईच्या देवळाकडे दर्शनाला निघाली होती.
आणि ......अचानक बाबू जमाल दर्ग्याजवळ तो दिसला. तसा रात्रभर प्रवास करून आल्यामुळं दर्ग्याजवळ एक आडोसा धरून तो निवांत बसला होता.
पण डिसेंबर च्या थंडीत पण त्याला बघून कोल्हापूरकरांना घाम सुटला. पावलं क्षणभर थबकली, आणि डोळ्यांना जे दिसतंय त्याची खातरजमा झाल्यावर हीच पावलं घाबरून वाट दिसेल तिकडं पळायला लागली. आणि कोल्हापुरात एकच गलका उडाला...
"अंबाबाईच्या देवळाजवळ व्हाग आलाय व्हाग. बाबू जमालच्या दर्ग्याबशी हाय आत्ता."
पण प्रत्यक्षात रस्त्यावर ढाण्या व्हाग बघायचं कोल्हापूर करांच्या नशिबात त्यादिवशी तरी नव्हतं. कारण तो वाघ नव्हता. तो होता बिबट्या किंवा आपल्या भाषेतला बिबळ्या...पूर्ण वाढलेला शेपटीसकट सहा फूट आणि उंचीला तीन फूट..लोकांच्या गलक्यानं बावरून हे वाघरु तसंच नव्या बुधवारात घुसलं. धीर चेपल्यावर पोरं टोरं, बायका माणसं स्वता:चा जीव सांभाळून त्याला बघायला आडोसा पकडून रस्त्यावर यायला लागली. पोलिस पण आले.
आजच्या काळात गवे कोल्हापुरात आल्यावर जसा गोंधळ उडतो तसाच धुमडा त्यावेळी कोल्हापूरकरांनी उडवला. शेवटी आपलीच आधीची पीढी ती !!!
तर, पुढे पद्धतशीरपणे त्या बिबट्याला एका वाड्यातल्या खोलीत जेरबंद करून पोलिसांनी गोळ्या घातल्या आणि वर पोचवला.. आता सुरू झाल्या होत्या चर्चा.. नक्की आला कुठंनं ? "गंगणबावड्यातनं" आला अशी पण चर्चा सुरू झाली. पण एकंदरीत बिबट्यांचा वावर बघता तो जोतिबा पन्हाळ्याकडूनच आला असणार हे नक्की.
या जवळपास ७० वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल मी माझ्या मावशी कडून कधीतरी ऐकलं होतं. तिचंच वय आत्ता ८४... पण या घटनेला उजाळा मिळायला कारण, मुंबईतल्या काही जुन्या नियतकालिकांच्या archives मध्ये काही शोधकाम करताना मला याची बातमी मिळाली आणि त्यावेळचे मी ऐकलेले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले.
शेवटी काळ कोणताही असो, पोटार्थी वन्यप्राणी मानवी वस्तीत आला की जीवाला मुकतोच...
याबद्दल काही आठवणी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की टाका...
भारत महारुगडे
#आठवणीतलं_कोल्हापूर
९८२२४४९८५६
Comments
Post a Comment