एक साधा फुलांचा हार...
गंगावेशीवरच्या मागच्या लेखानंतर, लहानपणापासून ऐकलेल्या बघितलेल्या कोल्हापूरच्या आगळ्या वेगळ्या प्रथा डोळ्यासमोर यायला लागल्या. "जगात भारी आम्ही कोल्हापूरी" हे जेंव्हा समस्त कोल्हापूरकर अभिमानाने म्हणतात तेंव्हा त्याच्या पाठीमागे कोल्हापुरातल्या या आगळ्या वेगळ्या प्रथांचाही प्रमुख हात आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या प्रथाच कोल्हापूर आणि कोल्हापूरकरांना इतरांपेक्षा निराळं बनवतात. आज अशाच एका वेगळ्या प्रथेबद्दल......
अंबाबाईची शेजारती आटोपून जर कधी जोतिबा रोडवरच्या फुलांच्या दुकानावर नजर टाकलीत तर त्या बंद दुकानांबाहेर फुलांचा एक साधा हार अडकवलेला दिसेल. हा साधासा फुलांचा हारच कोल्हापूरला इतर सगळ्या गावांपेक्षा वेगळं ठरवतो. बंद दुकानाबाहेर हार ठेवण्याची ही प्रथा कधीपासून आहे ते नक्की माहीत नाही. पण आजही कोल्हापूरातले बरेच फुल आणि हारांचे दुकानदार रात्री दुकान बंद करून झाल्यावर एक हार दुकानाबाहेर अडकवून मगच घरी जातात.
असं म्हटलं जातं की जगावं कुठंही पण मरायला मात्र कोल्हापूरात यावं..या मागं आध्यत्मिक, धार्मिक कारण जे काही असेल ते असेलच, पण हा एक साधा फुलांचा हार सुदधा त्याच्यामागचं एक कारण आहे. आणि नीट समजून घेतल्यावर हेच कारण कुणाही माणसाला हट्टानं कोल्हापुरातच मरायला मजबूर करेल..
सहसा कोणाचाही मृत्यु झाल्यावर, गरज असेल तर सगळे नातेवाईक येण्याची वाट बघितली जाते. पण शेवटचा नातेवाईक यायला अगर इतर कुठल्याही कारणाने उशीर झाला तर फक्त रात्र आहे म्हणून कोल्हापुरात मृतदेह सकाळ होईपर्यंत ताटकळत ठेवायची पद्धत नव्हती आणि नाही. अशा सोज्वळ पद्धतीनी अजूनही कोल्हापुरात तरी शिरकाव केलेला नाही. सगळं आटोपल्यावर रात्री घड्याळ न बघता कितीही मध्यरात्र असली तरी नदीकडची वाट धरायची पद्धत कोल्हापुरात पूर्वीपासूनच आहे..
यामुळेच अंत्यविधीचं सामान देणारी दुकानं रात्री मध्यरात्री कधीही कडी वाजवली तरी सताड कवाडं उघडतात. अशा अवेळी दरवाजा वाजवल्यावर आतून विचारलं जातं ,"माणूस का बाई ?," माणूस असला तर लग्न झालेला का बिन लग्नाचा ? , बाई असली तर सवाष्ण का विधवा ? एवढं सांगितल्यावर ठरलेल् समान चोखपणानं काढून दिलं जातं. लाकूड आणि शेणीची सोय तर मायबाप महानगरपालिकेनं २४ तास करून ठेवलेली आहेच..
अशा वेळी मध्य रात्रीच्या पारी जाणकार मंडळी सगळं सामान घेऊन येताना पावलं वळवतात ती एखाद्या फुलवाल्या दुकानाकडे. आणि तिथं असतो तो दुकानदाराने बाहेर ठेवलेला हार..हक्काने तो हार घ्यायचा आणि मृत्यू झालेल्या घरी यायचं..इच्छा असली तर हाराचे पैसे तिथं ठेवायचे किंवा ते ही नाही..
कोणत्याही फूलवाल्याने पैशाच्या आशेने तो हार कधीच ठेवलेला नसतो. अडनिड वेळेला कुणाचीही शेवटची यात्रा फुलांच्या हाराशिवाय होऊ नये म्हणून एका पै चीही आशा न करता तो हार ठेवलेला असतो..
जुन्या लोकांकडे चौकशी केल्यावर अजून एक माहिती समजली की आधीच्या काळात किराणा मालाच्या दुकानाबाहेर मीठाची एक दोन पोती मुद्दाम बाहेर ठेवलेली असतं. ज्या समाजात दफन करायची पद्धत आहे अशांची सोय ही बघितली जायची. सहसा आता मात्र मीठची पोती रात्री दुकानाबाहेर बघायला मिळत नाहीत. पण हार मात्र आवर्जून दिसतो.
अशा पद्धती इतर सहसा इतर कुठल्याही ठिकाणी बघायला मिळत नाही..कोल्हापूरचा ठसठशीतपणा आहे तो इथंच..
फक्त तांबडा पांढरा रस्सा, रंकाळा, अंबाबाई ,आणि जोतिबाच कोल्हापूरला, कोल्हापूर बनवत नाहीत, तर तुमच्या आमच्या सारखे दिलखुलासपणे जगणारे, दुसऱ्यांची काळजी करणारे, आणि अनोळखी माणसाच्या अंत्ययात्रेची जबाबदारी पार पडणारे लोकंच कोल्हापूरला समृद्ध करतात.
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर

नविन माहिती . धन्यवाद
ReplyDeleteनविन माहिती . धन्यवाद
ReplyDelete