वाहत्या बदलाचा बिंदू चौक
![]() |
| कोल्हापूर नगरपालिकेला १०० वर्षे पूर्ण झाल्यावर , बिंदू चौकाचा परिसर दाखवणारा १९५४ सालचा दुर्मिळ फोटो |
बदलत्या कोल्हापूरचा आढावा घ्यायचा म्हटला तर सुरुवात कोल्हापुरातले लोक कमरेला तलवार आणि फिरायला घोडा वापरायचे तेंव्हा पासून करायला लागते . हा बदल जाणवतो आठवणीं मधून. कधी ऐकलेल्या, कधी बघितलेल्या, कधी वाचलेल्या तर कधी मुद्दाम हुडकून काढलेल्या. आठवणी जरी जुन्या असल्या तरी, जसं गाव बदललं तसं त्या आठवणीत रमायला पण भारी वाटायला लागतं.
आता बिंदू चौकाचंच बघा की.. नुसतं नावच नव्हे तर रुपडं पण बदलत गेलंय. आदीतवार वेस, रविवार बुरुज, रविवारातला पार, रविवार चौक अशी वेगवेगळ्या नावानं ओळख बदलत आज शेवटी बिंदू चौक हे नाव रुजू होऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षे झालीत. या सर्व बदलाचा माग काढत आता बिंदू चौकातूनच फिरून येऊ.
मुळात उगवतीला असणारी वेस आणि तटबंदी म्हणून या भागाचं नावच सूर्यावरून ठेवलेलं. आदितवार (रविवार) वेस. नंतरच्या काळात रविवारचा बाजार ही या वेशीबाहेरच भरायला लागला. त्यामुळे या भागात तटाबाहेर जी पेठ वसली ती पण याच रविवार वेशीचं नाव घेऊन. या वेशीतुन गावाबाहेर जायला ज्या पुलावरून जितीचा ओढा पार करायचा तो पुल पण मग आदितवार वेशीच नाव सांगायला लागला.
बिंदू चौकात आज जिथं पार्किंग चं out गेट आहे तिथंच, वैदिक शाळेजवळ एक मोठा पार होता त्यामुळे चौकाचा उल्लेख जास्त करून रविवार पाराजवळ असाच केला जायचा. आजचं व्यासपीठ आहे त्याच्या मागे एक मळकट शेड असलेली इमारत होती. सगळे तिला धर्मशाळा म्हणून ओळखत असले तरी भिकारी लोकांचाच जास्त भरणा असायचा. विशेष म्हणजे त्यात बाया आणि बापे माणसांची सोय अलग अलग होती.
जरा समोर आल्यावर म्हणजे आजच्या ट्रॅफिक आयलँड च्या जागेवर एक पेट्रोलपंप बरोबर मोक्याची जागा धरून होता. लाईट म्हणजे सोन्यापरीस महाग आणि दुर्मिळ असण्याचे ते दिवस. त्यामुळे हातानं पंप फिरवून पेट्रोल सोडलं जायचं. पंप इथं तर त्याच ऑफिस पाराजवळ.. पंपाला लोखंडी रेलिंग केलेलं होतं आणि रेलिंगला लागून रस्त्यावरचं भाजी विकायला लोक बसायचे. जवळच साधू बाशा नावाचा म्हातारा पतंग विकायचा.तिथंच बनवलेले हे पतंग घ्यायला पोराटोरांची झुंबड असायची.
भुसारी वाड्याकडून दत्त भिक्षालिंग, एकविरेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यात दोन तीन टांगेवाले गिऱ्हाईक हुडकत उन्हातच थांबलेले असायचे. इथल्या रविवारच्या बाजारात निपाणी संकेश्वर भागातली मिरची विकायला यायची. त्यामुळं जर, सभा रविवारी किंवा सोमवारी असली की श्रोते मंडळींच्या सामुदायिक खोकायच्या कार्यक्रमामुळे वक्त्याकडे दुर्लक्ष व्हायचं.
त्यामुळे एक नाव खोकल्याचा चौक असंही गमतीने पडलं होतं.
पण खरा हा भाग चर्चेत आला तो बिंदू नारायण कुलकर्णीच्या हौतात्म्यामुळे...पण त्यानंतर तीनच वर्षांनी हा चौक पुन्हा गाजला तो एका अपरिचित पलायन नाट्यामुळे.
रविवार गेट जेल म्हणजे आताच्या सबजेल मधुन डॉ.लक्षण मेंडके, मल्लु हणबर आणि अण्णू बेरड हे तीन क्रांतिकारक बुरुजावरुन उड्या टाकून पळाले. अतिशय गुप्त पद्धतीने नियोजन केलं गेलं. मुद्दाम रविवारच्या बाजारच्या दिवशी संध्याकाळी हे तिघे, एक स्ट्रेचर दोरी बांधून बुरुजावरुन खाली सोडून निसटून गेले. बघता बघता तिघे पण जितीच्या ओढ्याकडे पळून तिथल्या झाडीच्या गचपणात नाहीसे झाले. यातले डॉ.मेंडके हे अतिशय धोकादायक कैदी म्हणून इंग्रज सरकारने मुद्दाम खास देखरेखीखाली ठेवले होते. त्यामुळे कोल्हापुरात या रोमांचक पलायन नाट्यामुळे पुन्हा बिंदू चौक चर्चेत आला.
आता या जुन्या आठवणींच्या कुठल्याही खुणा बिंदू चौकात राहिल्या नाहीत. एकेकाळी आपल्याच शिरस्त्यात गुडूप असणारा बिंदू चौक आता ट्रॅफिकमुळे आजूबाजूला बघायची उसंतपण घेऊ देत नाही. आज कोल्हापूरातला कुठलाही विचार बिंदू चौकातून सुरू होतो म्हणतात पण खुद्द बिंदू चौकाचचं म्हणणं मात्र ऐकून घ्यायला, तिथल्या उरलेल्या तटाबुरुजाकडे निरखून बघायला कुणालाही वेळ नाही..
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
.jpeg)
Comments
Post a Comment