जीवनाचा पाया रचणारे दौलु मास्तर...

जीवनाचा पाया रचणारे दौलु मास्तर...

तेंव्हा तर पेठेला शिवाजी पेठ नावही नव्हतं. नवा बुधवार पेठच म्हणायचे सगळे. तटाच्या बाहेर कोल्हापूर वाढलं तेंव्हा चंद्रेश्वर वाडीचाचं एक भाग नवा बुधवार म्हणून कोल्हापुरला चिकटला. तटातल्या कोल्हापूरपासून थोडा लांब असल्याने, सोयीसुविधा पण तशा कमीच. सगळी पेठ पोटासाठी शेतीवर, म्हशींवर आणि रंकाळ्यावर अवलंबून. ग्रामीण बाज ठासून भरलेला. रहाणीमान आणि पैशाची पडती बाजू. त्यामुळे नक्षीदार राजाराम हायस्कूलचं शिक्षण तसं पेठेतल्या पोरांच्या झेपेबाहेरच होतं. त्यामुळे पेठेतली पोरं शाळेऐवजी म्हसरांच्या मागेच रंकाळ्यावरच असायचीत. पण ही परिस्थिती बदलायचं एकाने ठरवलं.

साडेपाच पावणेसहा फूट उंची, गव्हाळ रंग, कपाळावर भुवयांच्या मध्ये गुलालाची रेघ, पांढरा लांब अंगरखा, धोतर, डोक्यावर चक्री फेटा आणि त्यातून डोकावणारे लहानसे आवळ. अशा अवतारात तो माणूस घरोघरी फिरून शिक्षणाचे महत्व पटवून देत होता. स्वतः काढलेल्या शाळेत पोरांना घरोघरी फिरून खांद्यावरून आणत होता. आणि पदरमोड करून शिकवत होता. दीडशे वर्षांपूर्वीच्या कोल्हापुरात ही कल्पनाच थरारक होती. हा माणूस होता दौलतराव कृष्णाजी भोसले उर्फ शिवाजी पेठेतले दौलू मास्तर.!!!

दौलु मास्तरांच्या अंगी शिक्षण प्रसारचे बीज रुजले ते त्यांचे वडील कृष्णा मास्तरांमुळे. राजवाड्यावर चौथ्या शिवाजी महाराजांना सुरुवातीच्या काळात अक्षर ओळख शिकवण्याचे काम ते करत. कडक शिस्त आणि उत्तम शिक्षण हेच समीकरण धरून  दौलू मास्तरांनी शाळा सुरू केली. त्यामुळे जे विद्यार्थी गैरहजर असत त्यांच्या घरी मास्तर जात आणि पोरांना अक्षरशः खांद्यावर टाकून आणत. पेठेत इन्फंट आणि बिगरी अशा यत्ता मधून मास्तरांच्या पोरांचा पाढे आणि कवितांचा आवाज घुमायला लागला. शाळेची कीर्ती वाढली आणि मंगळवार, शुक्रवार आणि रविवार पेठेतून सुद्धा शाळेत मुलांची आवक सुरू झाली. पेठेतले इरसाल लोक शाळेला दौलुचं कॉलेज म्हणून चिडवायचे. नागपंचमीला दौलु मास्तर शाळेचा पाटी पूजनाचा जंगी कार्यक्रम ठेवत. मोठी मुले गाणे, परवचा म्हणत स्वच्छ कपड्यात मिरवणुकीने पंचगंगेेवर जात. तर लहान मुले बैलगाड्यातून हजेरी लावत. बँड, ताशा आणि सनईच्या सुरात घाटावर जाणारी मुलांची ही मिरवणूक बघायला सारं कोल्हापूर जमा व्हायचं.

तसा १८६५ पासूनच दौलू मास्तरांचा विद्यादान यज्ञ सुरू झाला तरी अधिकृतपणे शाळेची स्थापना मात्र १८७८ साली झाली. शाळेचे ते ठिकाण नेमकेपणाने सांगता येत नसले तरी वरुणतीर्थ तलावाच्या जवळ एका धर्मशाळेत ही शाळा सुरुवातीच्या काळात होती याच्या नोंदी आहेत. योगायोगाने काही वर्षांनी शाळेला आताची पक्की इमारत ही याचं जागेत मिळाली. या संदर्भात १९०० सालची एक घटना प्रसिद्ध आहे. शाहू महाराज उभ्या मारुती जवळून जाणर होते. शाळेसाठी जागेची समस्या महाराजांच्या कानावर घालण्यासाठी दौलु मास्तर आणि त्यांचे सहकारी शिराळकर मास्तर, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुलांना घेऊन उभे राहिले. "शाळेला जागा द्या" या घोषणेेत मुलांनी महाराजांचा खडखडा अडवला. कोणतीही सबब न सांगता महाराजांनी  रविवार पेठेतली पागेची जागा म्हणजे आजचे कॉमर्स कॉलेज आहे, ती जागा शाळेच्या हवाली केली.  पण शाळेचे नष्टचर्य काही संपले नाही. या जागेतून मर्दानी खेळाच्या आखाडया जवळची थट्टी, तिथून बावडेकारांच्या वाड्यातली पागा, त्यानंतर महाकाली जवळ करंबे यांचे घर अशा जागा बदलत शाळा शेवटी आजच्या पक्क्या इमारतीत आली. "स्पेशल सरकारी मदतीची शाळा" हे नाव बदलून दौलतराव भोसले विद्यालय असं हक्काचं नावही नंतरच्या काळात मिळालं.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया याच शाळेत दौलू मास्तरांनी घातला. याचं शाळेत आयुष्याची सुरुवात करणारे पुढच्या पीढीतील विद्यार्थी पुढे महाराष्ट्राचे मंत्री, वृत्तपत्रांचे संपादक, कोल्हापूरचे नगराध्यक्ष, प्रसिध्द वकील, उद्योगपती बनले. ज्या काळात कोल्हापूर स्वतःची ओळख निर्माण करत होतं त्या काळात बहुजन समाजाची नवी पीढी साक्षर करण्याचे हे व्रत घेतलेले दौलू मास्तर, सामाजिक सुधारणेच्या फुले, रानडे आणि आगरकर प्रभूतींच्या मालिकेतले कोल्हापुरातले अपरिचित शिलेदार म्हणता येतील.

© भारत पांडुरंग महारुगडे 

९८२२४४९८५६
 
#आठवणीतलं_कोल्हापूर

 

Comments

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!