बडा साहेब कोल्हापुरात येतो तेंव्हा......

 

गव्हर्नर, सर फिलिप वुडहाऊस

पाहुण्याला डोक्यावर घ्यायची कोल्हापुरची परंपरा प्रसिद्धचं आहे. आजकाल तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी सारं कोल्हापूर फ्लेक्सनीं भरून जातंय. कोल्हापुरची हीच ओळख अगदी दीडशे वर्षांपूर्वी सुद्धा होती. दीडशे वर्षांपूर्वी एक बडा सरकारी पाहुणा कोल्हापुरात आला आणि कोल्हापुरी पाहुणचार घेऊन भारावून गेला. त्याचीच ही गोष्ट, पुढल्या एक दोन भागात आपण घेऊ !! त्यावेळी कोल्हापूर कसं नटलं, मुरडलं हे बघत बघत त्यावेळच्या कोल्हापुरातही फेरफटका मारून येऊ.. चला !!  

(सदर वर्णन हे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या कथनातून तत्कालीन घटनांशी आणि ठिकाणांशी सांगड घालून घेतले आहे.)

साल १८७५-१८७६. कोल्हापुरात थोरल्या दवाखाना उभारायचं ठरवूनच बाल छत्रपती आणि कारभारी मुंबईत इंग्लंडच्या राजपुत्राला भेटून कोल्हापुरात परतले होते. इंग्रज सरकारशी झालेल्या चर्चेमुळे प्रत्यक्ष इंग्लंडचा राजपुत्र आता कोल्हापुरला भेट द्यायला येणार अशी हवा गावभर झालेली होती. पण ही नुसतीच अफवा होती. पण काही दिवसांनी अचानकच गावाचा नुर पालटला आणि नीटनेटकेपणा व स्वच्छतेची जंगी मोहीम रस्त्यारस्त्यावर सुरू झाली. ज्या वेगाने कामं सुरू झाली ते बघता, कोणीतरी बडा साहेब कोल्हापुरात येणार याबद्दल लोकांची खात्री पटली. हा बडा साहेब होता मुंबई प्रांताचा गव्हर्नर सर फिलिप वुडहाऊस !! कोल्हापूरच्या लोकांसाठी साहेब म्हणजे पॉलिटिकल एजंट, कर्नल श्नायडर. हा श्नायडरसाहेब यांच गव्हर्नरच्या अखत्यारीत होता, त्यामुळे गव्हर्नर म्हणजे साहेबाचाही साहेब आता कोल्हापुरात येणार होता.

खरंतर रिवाजाप्रमाणे सरकारी पाहुण्याची सरबराई करायची जबाबदारी कोल्हापूर दरबारची होती, पण पाहुण्याचं "वजन" बघता कोल्हापूर नगरपालिका सुद्धा यात कंबर कसून सामील झाली. इतकंच नव्हे तर नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने या मोहिमेत भाग घेतला आणि घरानां चुन्याचा हात देऊन रंगरंगोटी सुरू केली. (जुना) राजवाडा आणि आसपासच्या परिसराचं रूप पूर्णपणे पालटलं. राजवाड्याच्या खिडक्या, दरवाजे, छत आकर्षक रंगात रंगवण्यात आले. अनेक वर्षांची धूळ आणि जळमटं झटकल्यामुळे कधीही नजरेत न आलेली लाकडी खांब आणि कमानींवरची नाजूक कलाकुसर उठून दिसायला लागली. राजवाड्याचे मनोरे भडक रंगानी सजले. नगारखाना दिवसातून दोन दोनदा धुवून चकचकीत केला गेला. राजवाड्याच्या परिसरात आणि अंबाबाईच्या देवळाबाहेर वर्षानुवर्षे अस्ताव्यस्त पडलेली दगडे, लाकडाचे ढीग, राडारोडा एका रात्रीत गायब झाला आणि जमीन पाणी मारून ठोकून सपाट केली गेली. PWD ने हा परिसर ओळखण्यापलिकडे बदलला. मुंबईच्या पद्धतीच्या तीन कमानी गावात उभारल्या गेल्या. उंच गुंबज, स्वागत फलक, रंगीत चित्रे, पताका आणि वाऱ्यावर हलणाऱ्या झालरी लावलेल्या या कमानी बघायला लोकांची गर्दी व्हायला लागली. गावात सणासुदीचा उत्साह पसरला. दरबाराचे विविध मानकरी, सरंजामदार आणि त्यांचे चाकर यांची उठबस गावात सुरू झाली. साहेबाच्या येण्याचा दिवस जवळ आला तशी गावात एकच धांदल उडाली.

साहेब तळकोकणातून कोल्हापुरात येणार होता. त्यामुळे दक्षिणेस कात्यायनीकडे जाणाऱ्या रस्त्याची विशेष सफाई केली गेली. विजापूर वेशीच्या (आजचा मिरजकर तिकटी परिसर) बाहेर दीडेक मैलावर एक तंबू स्वागतासाठी उभारला होता. ही जागा गावापासून लांब असली तरी कात्यायनीकडे जाणाऱ्या चढावर होती. या तंबुपासून एका नजरेत संपूर्ण कोल्हापूर दिसत होतं.  काळया दगडातली भक्कम तटबंदी आणि बुरुजानी वेढलेला कोट भाग आणि तटाबाहेरच्या पेठानी वसलेलं कोल्हापूर तिथून सहज बघता येत होतं. तटाच्या आत असलेले राजाराम हायस्कूल, नगारखाना आणि अंबाबाई मंदिराची शिखरे आणि मनोरे लांबूनच नजरेस येत होते. उजवीकडे असलेला पद्माळा, डावीकडे असणारे फिरंगाई तलाव आणि वरुणतीर्थ कोल्हापूरातला पाण्याचा सुकाळ दाखवत होता. पश्चिमेला रंकाळा उन्हात चकाकत होता. त्याच्या भोवती दगडी तटबंदीचे काम आत्ता आत्ता सुरू झालेलं होतं. त्याला लगटून असलेली नव्या बुधवार पेठेतली घरे दाट झाडीतून तुरळक दिसत होती. दूर उत्तरेला पन्हाळा आणि जोतिबाचे डोंगर आणि जोडीला असलेली सिद्धोबाची टेकडी शहराची उत्तरेकडील बाजू सांभाळत होते. छोटंसं पण टुमदार असं कोल्हापूर या तंबुपासुन दिसत होतं.

पण तंबू साठी हीच जागा निवडण्याचे अजून एक कारण होतं...

हा काळ कोल्हापूरच्या स्थित्यंतराचा काळ होता. १८७७ च्या महाभयंकर दुष्काळाचे पडघम कोल्हापुरातही वाजू लागले होते. आणि या दृष्टीने बरेच लोकोपयोगी प्रकल्प कोल्हापूर दरबार आणि ब्रिटिश सरकार कडून हाती घेतले होते. यातलाच एक प्रकल्प होता Kolhapur Water Works. कात्यायनीच्या डोंगरात जमा होणारे पाणी नैसर्गिक उताराचा फायदा घेऊन कोल्हापूर शहरात कमानींवर उभ्या केलेल्या पाटामधून आणण्याचे काम जोरात सुरू होते. पाण्याच्या या कमानींची जागा या तंबू लगतच होती. अनायसे बडा साहेब या तंबूत सत्कारासाठी थांबल्यावर पाण्याच्या या योजनेची प्रगती त्यांना दाखवता यावी हा ही या तंबूचा उद्देश्य होता.

बडा साहेब यायची वेळ सकाळी साडेसातची होती. पण सकाळी दिवस उजडायच्या आताच कोल्हापूरकर, विजापूर वेशीच्या बाहेर उभारलेल्या पहिल्या स्वागत कमानीजवळ जमा होऊ लागले. आणि बघता बघता तंबुपर्यंतचा दीड मैलाचा परिसर टोप्या, फेटे आणि मुंडाशानी फुलून गेला. वेशीबाहेरच्या स्वागत कमानी जवळ नगरपालिकेचे पदाधिकारी, कोल्हापुरातले काही प्रतिष्ठित नागरिक आणि कोल्हापूर नेटीव्ह इन्फंट्रीचा प्रमुख कॅप्टन फेरिस लष्करी बँड घेऊन उभा होता. तर तंबू जवळ स्वतः बाल छत्रपती, कारभारी बर्वे आणि पॉलिटिकल एजंट श्नायडर कोल्हापूरच्या वतनदारांसह दरबार तर्फे स्वागतासाठी हजर होते.

ब्रिटिश माणूस वेळेचा पक्का !!! बरोबर साडेसातच्या ठोक्याला बड्या साहेबाची बग्गी, तंबू समोर येऊन ठाकली आणि दरबारतर्फे स्वागत करण्यासाठी एकच धांदल उडाली. रिवाजाप्रमाणे तंबूत आदर सत्कार, उपस्थितांची ओळख आणि इतर सोपस्कार पार पडले. जी कामे हाती घेतली होती त्याचा थोडाफार आढावा घेण्यात आला. दरबार तर्फे स्वागत झाल्यावर बड्या साहेबाचा लवाजमा आता कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. हा लवाजमा आता मिरवणुकीसारखा वाटू लागला. कारण गव्हर्नर साहेबाच्या बग्गी मागोमाग आता दरबारी मानकऱ्यांच्या बग्या सामील झाल्या.

शहरात स्वागत करायचा मान नागरिकांचा !!! आणि नागरिकांतर्फे नगरपालिकेचा !!! दुरूनच हा लवाजमा येताना दिसल्यावर टाचा वर करून लोकांची बघायची धडपड सुरू झाली. कोल्हापूरचे नागरिकांनी आजवर गोरा साहेब बघितला होता पण गोऱ्या साहेबाचा बडा साहेब आज ते प्रथमच बघणार होते. बग्गी स्वागत कमानी जवळ आली आणि नेटीव्ह इन्फंट्रीतर्फे लष्करी सलामी देऊन बँड वाजवून बड्या साहेबांचे स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर नगरपालिकेतर्फे डेप्युटी एज्युकेशन इन्स्पेक्टर आणि आयुक्त रावसाहेब बाळ परशुराम पंडित यांनी स्वागतपर भाषण सुरू केले. अतिशय फर्ड्या इंग्रजीत हे भाषण होते. एकेकाळी चोरा चिलाटांचा वावर असलेला गावभाग आता ब्रिटिश राज्यात निर्धोक झाला. जीवघेणी कॉलराची साथ , स्वच्छतेच्या उपायांमुळे आटोक्यात आली.  शिक्षणासाठी दरबार आणि ब्रिटिश सरकारचे प्रयत्न राजाराम हायस्कूलच्या रूपाने फळाला आले. दळणवळण सुव्यवस्थित व्हावे म्हणून सध्या पंचगंगेेवर बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा (शिवाजी पुल) या भाषणात आवर्जून उल्लेख होता. बाल छत्रपतींच्या शिक्षणाबद्दल सरकार घेत असलेल्या कष्टाबद्दल विशेष आभार मानण्यात आले. एकंदरीत कोल्हापूरचे नागरिक, कोल्हापूर संस्थानात विक्टोरिया राणीची प्रजा म्हणून सुखात आहेत असाच भाषणाचा सुर होता. सामान्य लोकांसाठी लगेच या भाषणाचा मराठी तर्जुमा वाचून दाखवण्यात आला.

साहेब सत्काराला उत्तर द्यायला उभे राहिले. लोकांची त्यांना बघायला चुळबुळ सुरु झाली. पण पोलिसांच्या धाकामुळे शिस्त मोडली नाही. साहेबांच्या भाषणात मुख्यत: आभार आणि कोल्हापुरची प्रशंसा होती. कोल्हापूर आणि बाल छत्रपती यांचे भविष्य कसे उज्ज्वल आहे यावर विशेष भर होता. लोकं भाषण समजत नसून ही माना डोलवत होते. भाषण संपल्यावर नगरपालिके तर्फे भेटवस्तू देऊन सत्कार झाल्यावर, ही सर्व मिरवणूक गावात प्रवेशती झाली. तोफांच्या सलामीत बडा साहेब कोल्हापुरात आले. तटावर लोकांची दाटी झाली होती. रात्री नऊ वाजले की तोफेचा आवाज ऐकायची सवय असूनही या तोफांच्या आवाजाने ही गर्दी शहारली. शहरातल्या रस्त्यावर, प्रत्येक घरावर लोकांची झुंबड उडाली होती. साहेबांचा लवाजामा गावातून राजवाडा मार्गे शनिवार वेशीतून (आजचा शिवाजी महाराज पुतळा परिसर) रेसिडेन्सी कडे रवाना झाला तेंव्हा सकाळचे नऊ वाजले होते.


अशी ही साहेबाच्या भेटीची दीडशे वर्षांपूर्वीची कथा. आजच्या मापाने मोजलं तर ही भेट सर्वसाधारण वाटेल. प्रत्यक्ष काही भरीव घटना यांत नसल्या तरी तत्कालीन कोल्हापुरात फिरून येण्याचा अनुभव या भेटीच्या वर्णनातून मिळतो. याच भेटी नंतर कोल्हापूरचे महत्त्व मुंबईत वाढले आणि भविष्यात मुंबईच्या गव्हर्नर च्या अशा अनेक भेटी व्हायला लागल्या. याचं फळ अनेक सुंदर इमारती, योजना यांच्या रूपाने कोल्हापूर शहराला मिळालं. 

 

© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६

Comments

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!