फेरीस आणि त्याचा पोपट ...
अमेरिकेच्या राजधानीत प्रकाशित होणाऱ्या इव्हीनिंग स्टार या वृत्तपत्राच्या १० फेब्रुवारी १९२७ च्या अंकात एका विशेष पोपटाची माहीती छापून आलेली आहे. पोपट आहे फक्त १२६ वर्षांचा.. पोपटाचं सर्वसाधारण वय किती ? हा चिकित्सक प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेऊ, कारण हा पोपट कोल्हापूरकरांसाठी विशेष आहे. कारण तो पोपट एकेकाळी कोल्हापूरच्या छत्रपतींकडे होता आणि त्यांनी तो कोल्हापुरात बराच काळ मुलकी अधिकारी म्हणून काम केलेल्या कर्नल डब्लू बी फेरीस यांना भेट दिला होता .
बातमीत म्हटलंय, "सध्या वयोमानानुसार या १२६ वर्षीय पोपटाची पिसे झडली आहेत. आणि त्याला थंडी वाजू नये, ऊब मिळावी म्हणून विशेष अशी छोटी जॅकेट्स शिवली जात आहेत. वय वाढेल तसं हा पोपट जास्तच बोलायला लागलाय. (पोपटपंची हा वयाचा परिणाम !!!!). शिवाय खाण्याचं ही विशेष असं पथ्य हा बुढाऊ पाळत नाही. शेंगदाणे, खजूर, केळी असा शेलका शेलका पचायला जड असा माल हा वयाची पर्वा न करता हा पोपटराव बिनधास्त हाणतो. "कोल्हापूरात काही वर्षे काढल्याचा हा परिणाम असू शकेल !!!!.
पोपटानंतर आता थोडी माहिती कर्नल फेरीसबद्दल.
![]() |
| कर्नल डब्लू .बी. फेरीस |
आजच्या कोल्हापूरला मध्ययुगीन आणि रोगराईनें बरबटलेले एक गाव ते काही सुंदर इमारतींच शहर म्हणून नवा चेहरा देण्यामागे ज्या काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घाम गाळला त्यांच्यापैकी हा कर्नल फेरीस..
१८७१ ला असिस्टंट पोलिटिकल एजंट म्हणून कोल्हापुरात आलेला हा फेरीस १९०६ ला निवृत्त होई पर्यंत कोल्हापूरकरांच्या एक दोन पिढ्या त्याच्या हाताखालुन गेल्या.
शहर स्वच्छतेवर विशेष लक्ष ठेवणारा म्हणून हा अधिकारी जुन्या काळात ओळखला जायचा. कोल्हापूर शहर सुधारणा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने तटबंदी पडण्याचा प्रस्ताव आणण्यात या फेरीसचा मोलाचा वाटा होता. तटबंदी पडली जाणार म्हणून त्याच्या खुनाचा प्रयत्न कोल्हापूरात झाला, तेही दोन वेळा .
१८७१ साली जेंव्हा फेरीस कोल्हापूरात बदलून आला त्यावेळच्या कोल्हापूरच्या स्वच्छतेचं वर्णन फेरीसने फक्त एकाच वाक्यात केलंय.
"कोल्हापूरात स्वच्छतेची स्थिती अशी आहे की प्रत्येक पेठेला स्वतःचा असा खास वेगळा वास (????) आहे. एखादा जन्मांध व्यक्ती सुद्धा फक्त वासावरून आपण कोल्हापूरातल्या कुठल्या पेठेत आहोत हे सांगू शकेल."
आज जवळपास दीडशे वर्षानंतर सुद्धा जर कुणाला डोळे बांधून फिरवलं तर खात्रीनं परीख पूल, ऋणमुक्तेश्वर भाजी मंडई, सदर बाजार फक्त वासावरून सहज ओळखता येऊ शकेल ...
धन्य धन्य ते आपलं गाव आणि आपली स्वच्छतेची परंपरा..
या फेरीसच्या नावानं सध्याच्या शिवाजी मार्केटच्या जागेवर एक मंडई(फेरीस मार्केट) उभारली होती. १९१२ मध्ये ते जाळण्याचाही प्रयत्न झाला होता.
![]() | |
| सध्याच्या केशवराव भोसले नाट्यगृहासमोरची उजवीकडील कमान | |
![]() |
| कमानीवरील फेरीस मार्केटच्या उद्घाटनावेळी लावलेला शिलालेख |
तिथलीच कमान नंतर हलवून केशवराव भोसले नाट्यगृह समोर हलवली. त्या कमानीचा मूळ जागेवरचं अतिशय दुर्मिळ छायाचित्र आज उपलब्ध आहे .
![]() |
| मूळ फेरीस मार्केटचा अतिशय दुर्मिळ आणि एकमेव फोटो. डावीकडे कमान दिसत आहे |
फेरीसचं नाव त्या कमानी शिवाय अजून एका ठिकाणी कोल्हापूरात आहे. ऑल सेंट्स चर्चमध्ये .. त्यात फेरीसचा कोल्हापूरात जन्मलेला मुलगा आजारी अवस्थेत मुंबईला नेताना त्याच्या हातातच कसा वारला हे कोरलंय..
कोल्हापूर शहराचा वारसा निर्माण करण्यात हातभार असलेल्या फेरीसची ही छोटीच पण विलक्षण आठवण ...
© भारत महारुगडे
९८२२४४९८५६






Comments
Post a Comment