कोल्हापूरातलं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज चौक. तिशी चाळिशीच्या पुढच्या पीढीसाठी या ठिकाणचा उल्लेख फक्त शिवाजी पुतळा किंवा शिवाजी चौक असा केला तरी चालतो, कारण हृदयांतरीचे छत्रपती असलेल्या महाराजांना छत्रपती म्हणून संबोधलं नाही, तर अवमान होतो अशी नवी समज येण्याआधी मोठी झालेली ही पीढी !! न्यूयॉर्कसाठी टाइम्स स्क्वेअरचं जे महत्त्व, त्याहून काकणभर चढच, महत्व कोल्हापूरसाठी या चौकाचं !! कोल्हापूरच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उलाढालींचा साक्षीदार हाच चौक!या चौकाची जागा तशी पहिल्यापासून मोक्याची. तटबंदी असताना राजवाड्या समोरची म्हणून मानाची शनिवार वेस ही इथंच होती. नंतरच्या काळात इंग्रजी अंमल दाखवणारा लेस्ली विल्सन पुतळा आणि फेरीस मार्केट याच चौकात वसले. पण खऱ्या अर्थाने हा चौक गाजला तो शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यावर. हाकेच्या अंतरावर असलेल्या बिंदू चौकात अनेक राजकीय, सामाजिक चर्चा नेहमी घडतात पण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होते ती मात्र इथंच महाराजांच्या पुतळ्याला हार घालून. आता परंपराच आहे ती. भारताने कुठल्याही क्षेत्रात अत्युच्च यश मिळवल्यावर होणाऱ्या कोल्हापूरातल्या जल्लोषाचा साक्षीदार ही हाच पुतळा. फक्त अस्तित्वाने अखंड कोल्हापूर भारून टाकणाऱ्या कोल्हापुरातील या पहिल्या शिवप्रतिमेचा जन्मपट आज आपण उलगडून बघणार आहोत. आणि या शिवप्रतिमेच्या जन्माचे निर्विवाद श्रेय कुणाला असेल तर ते फक्त भालजीनां, भालजी पेंढारकरानां !!!
 |
| शनवार वेशीतला, सर लेस्ली विल्सन पुतळा |
शनवार वेशीतला विल्सनचा पुतळा विद्रूप करून दोन वर्षे होऊन गेली होती. तेंव्हापासूनचं सरकारने पुतळा झाकून ठेवला होता. आणि आता तो पुतळा तिथून काढायच्या हालचाली सुरू झाल्या. इथंच भालजींच्या मनाने उचल खाल्ली. त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला पाहिजे असं त्यांचं पहिल्यापासूनच मत होतं. प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या वंशजांच्या राजधानीत शिवछत्रपतींची एकही जाहीर, सार्वजनिक प्रतिमा नसावी याचं शल्य भालजींच्या उरात होतं. आणि त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यायचं ठरवलं. काम सोपं नव्हतं. एकतर ब्रिटिश रेसिडेंटची परवानगी घ्यावी लागणार होती आणि दुसरे म्हणजे या राष्ट्र कार्यासाठी करवीरच्या जनतेचा पाठिंबा उभा करायला लागणार होता. कारण प्रजापरिषदेसारख्या राजकीय चळवळीतील अनेक नेत्यांचा या कार्याला विरोध होण्याची शक्यता होती. पण भालजीनीं यातून पद्धतशीर मार्ग काढला. स्थानिक वृत्तपत्रातून लेख, निवेदने यांचा सपाटा त्यांनी सुरू केला. कोल्हापूर, हे छत्रपतींचे संस्थान आहे आणि श्री शिवछत्रपतींचा पुतळा उभारणे हा कोल्हापूरच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. अशी भूमिका भालजीनीं मांडली आणि ती लोकांनी उचलून धरली. हळूहळू शिवप्रतिमा ही एकट्या भालजींची नसून संपूर्ण कोल्हापुरची मागणी आहे असं चित्र तयार झालं. यात प्रजापरिषदेचा विरोध पाचोळ्या सारखा उडून गेला.आता महत्त्वाचे काम उरले होते सरकारची मर्जी वळवणे. रेसिडेंट कर्नल हॅरिसन बरोबर भालजीनीं भेट ठरवली. "करवीरच्या आम जनतेचे श्री शिवछत्रपती हे आराध्य दैवत आहेत आणि ब्रिटिश सरकारही वेळोवेळी त्यांच्या नावाचा उपयोग करून घेतं", याची स्पष्ट जाणीव भालजीनी त्यांना करून दिली. अपेक्षेप्रमाणे हॅरिसन नी विरोध दर्शवला आणि विल्सनचा नवा पुतळा बसवण्या संबंधी हालचाली सुरू असल्याचे सांगितले.
"पण नवा पुतळा ही विद्रूप केला तर काय?", या भालजींच्या प्रश्नावर मात्र हॅरिसन निरुत्तर झाले. भालजीनी जाहीर केलं की शिवप्रतीमेचा संपूर्ण खर्च ते एकटे करणार आहेत त्यामुळे सरकारवर कुठलाही भार येणार नाही. हॅरिसन संभ्रमात पडले आणि त्यांनी विचारासाठी वेळ मागून घेतला. अडथळा दूर झाला नाही पण जागेवरून हलला होता. फक्त गरज होती एका जोरदार प्रहाराची !!! आणि तो प्रहार ही भालजीनी केला. आता कोल्हापुरात या शिवप्रतीमेसाठी निदर्शने आणि चौकाचौकात कोपरा सभा सुरू झाल्या. शहरातलं हे वातावरण बावड्यातल्या रेसिडेन्सीत पोचायला असा कितीसा वेळ लागणार. स्वतः हॅरिसन नी भालजीना बोलावून घेतलं. पण अजून सरकारचा निर्णय काही होत नव्हता.
"१९४२च्या चळवळी नंतर आता सरकार बद्दल कोल्हापूरच्या जनतेच्या मनात असंतोष वाढलाय आणि सरकारने पुतळ्या संदर्भात काही बळजबरी केली तर लोक प्रक्षुब्ध होतील आणि पुन्हा विद्रूपीकरणासारखा प्रकार घडला तर सरकारचे हसे होईल." हे पटवण्यात भालजी यशस्वी ठरले.
भालजीनीं बाजी मारली. कर्नल हॅरिसन नी तोंडी समंती दिली. पण नोकरशाहीच्या कामकाजातून लेखी संमती मिळायला अजून वेळ लागणार होता. १९४५ च्या एप्रिल मधला शेवटचा आठवडा होता तो. गडबड करायला हवी होती कारण ब्रिटिश सरकारचे मन कधी बदलेल याची शाश्वती नव्हती. त्या आधीच पुतळा उभारावा लागणार होता. आता खरी कामाला सुरुवात होणार होती.
भालजीनी तर पुतळ्याची दिशा ही ठरवून ठेवली होती. त्यालाही एक खास कारण होतं....
पुतळ्यासाठी रक्कम कशी उभारायची , काम कोणाला द्यायचं, असे अनेक प्रश्न आता भालजींसमोर फेर धरायला लागले. सुदैवाने पुतळा घडवण्यासाठी आधुनिक विश्वकर्मा कोल्हापुरातच होता. बाबुराव पेंटर.. ते या शिवकार्याला नाही म्हणणे शक्यच नव्हते. पुतळ्याचा आकार, पवित्रा कसा असावा याबद्दल आता दोघांच्या बैठका सुरू झाल्या. मुळात हा चौक मोठा, त्यामुळे पुतळा असेल तो पूर्णाकृती आणि मोठा यावर दोघेही ठाम होते. पुतळा बनवण्यासाठी आधार म्हणून महाराजांचे कोणते चित्र घ्यावे याची चाचपणी सुरू झाली. सुदैवाने या प्रश्नाला देखील उत्तर मिळाले. राजाराम कॉलेजचे दिवंगत प्राचार्य डॉ. बाळकृष्ण यांचा महाराजांवर दांडगा अभ्यास! अस्सल डच साधने वापरून त्यांनी लिहिलेले इंग्रजीतील पहिले शिवचरित्र Shivaji The Great हे काही काळापूर्वीच कोल्हापुरात प्रकाशित झाले होते. भालजीनी त्याचा अभ्यास केला आणि इटालियन प्रवासी निकोलाओ मनुची याने प्रत्यक्ष महाराजांना बघून काढलेले चित्र हेच प्रमाण मानून पुतळा घडवण्याचे ठरले. आता पुढची कसोटी पुतळ्यासाठी लागणारे तांबे मिळवण्याची होती. दुसरे महायुध्द ऐन भरात होते, त्यामुळे तांबे मिळवणे आणि त्यांची वाहतूक करणे जिकिरीचे झाले होते. इथे उपयोगी पडली ती भालजींची माणसे जोडायची कला. चित्रपट उद्योगामुळे खंडीभर माणसे त्यांनी जोडलेली. त्यापैकीच एकाने तांबे मिळवून कोल्हापुरात पोचते करायची हमी घेतली. तरीही भालजीनी पदरमोड करून घसघशीत रक्कम त्यांच्या हातात ठेवली आणि तांबे सुखरूप कोल्हापुरात पावते झाले.
विल्सन पुतळ्याचा चौथरा हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी खूपच मोठा दिसला असता. त्यामुळे सुरुवातीपासूनच तो लहान असावा असे ठरले होते. साठ सत्तर माणसे लावून मूळ चौथरा उतरवून भालजीनीं योग्य त्या लहान आकारात पुन्हा बांधून घेतला. या कामाचा वेग बघून कोल्हापुरात आता पुतळ्याची चर्चा जोर धरायला लागली. त्यावेळेस प्रसिद्ध शिल्पकार व्ही.पी. करमरकर हे काही कारणास्तव कोल्हापुरातच होते. महाराजांची शिल्पं बनवण्यात त्यांचा मोठा हातखंडा !! बाबुराव पेंटर आणि त्यांचा, कमीत कमी वेळेत पुतळा कसा घडवता येईल यावर विचार सुरू झाला. शांताराम बापूंच्या राजकमल स्टुडिओच्या काही शिल्पांचे काम त्याचं वेळेला कोल्हापुरात सुरू होते. त्यातील काही भाग उपयोगात येण्यासारखे होते. काम थोडे सोपे झाले. पुतळ्याचे काही भाग फक्त नव्याने ओतवून घ्यावे लागणार होते. अडचणी जशा येत होत्या तसा मार्गही निघत होता. इकडे भालजीनीं कर्नल हॅरिसनचा अंदाज घेऊन पुतळा उद्घाटनाची तारीखही जाहीर करून टाकली. भालजीनी पायाला भिंगरी बांधली होती. उद्घाटनाचे नियोजन, पुतळ्यासाठी लेखी परवानगीचा पाठपुरावा आणि पुतळ्याच्या कामावर धावती भेट यासाठी त्यांना दिवसाचे २४ तास ही कमी पडत होते. कामं आता पुढं सरकायला लागली. पुतळ्याचे भाग जसजसे ओतवून तयार होत होते तसा भालजींचा हुरूपही वाढत होता. बघता बघता उद्घाटन दुसऱ्या दिवसावर येऊन ठेपले. त्या आदल्या रात्री पुतळा जोडून तयार व्हायचा होता. आणि ती बातमी आली !!!. भालजींवर जणू नियतीने क्रूर डाव टाकला. पुतळ्याचा काही भाग ओतकामात समाधानकारक येत नव्हता. सर्वांनी हात टेकले शेवटी. रात्र उलटून चालली होती. चार पाच तासात काम उरकले नसते तर पुतळा उद्घाटनासाठी तयार झाला नसता. भालजींच्या तोंडचे पाणी पळाले. अशावेळी देवासारखे धावून आले, श्री मदनमोहन लोहिया. कोल्हापूर शुगर मिलचे मॅनेजर. रात्रीतून शुगर मिलच्या तंत्रज्ञाना त्यांनी कामाला लावले. पुतळ्याचे पुढचे काम आता शुगर मिलच्या लोकांनी हातात घेतले. सकाळपर्यंत पुतळ्याचा बिघडलेला भाग दुरुस्त करायचे आव्हान त्यांच्यासमोर होते.
१४ तारखेची सकाळ उजाडली. शुगर मिलच्या लोकांची नुसती हात घाई चालली होती. तिकडं चौकात गटागटाने लोक हळूहळू जमायला लागले. आजपर्यंत फक्त चित्रातचं महाराजांना लोकांनी बघितले होते त्यामुळे पुतळ्यातले महाराज बघायला लोक हरखून जमले होते. पण, अजूनही नुसताच रिकामा चौथराच दिसत होता. लोकांच्यात कुजबुज वाढायला लागली. उद्घाटनाची वेळ जवळ आली, टळून गेली तरी पुतळ्याचा पत्ता नव्हता. जमलेली गर्दी अस्वस्थ व्हायला लागली. उद्घाटनासाठी कोल्हापूरचे पंतप्रधान (होय पंतप्रधानच!!) माधवराव बागवे आणि मुंबईहून शेठ माणिकलाल चूनीलाल वेळेवर उपस्थित झाले होते. दरबार कडून आलेले राजाराम रायफल्सचे पथकही मानवंदना देण्यासाठी कधीचे येऊन थांबले होते. भालजींच्या समोर प्रसंग बाका होता. अजून रेसिडेंटकडून पुतळा उभारण्यासाठी अधिकृत परवानगी आली नव्हती. तिकडं पुतळा काय स्थितीत आहे याचाही पत्ता नव्हता. आणि इकडं फक्त भालजींच्या शब्दावर सगळं कोल्हापूर त्या चौकात एकवटलं होतं. तेवढयात कुणीतरी बातमी फोडली.. सरकारी परवानगी मिळालेली नाही, पुतळा बसणार नाही. आणि भालजींच्या संयमाचा कडेलोट झाला. चौथऱ्यावर भालजी चढले आणि खड्या आवाजात गर्जले, "शिछत्रपतींचा पुतळा उभा राहील , आणि तो पण आजच !!! तसं न झाल्यास आजचा दिवस भालजीच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल ". गर्दी थबकली. हे बोलण पुरं होतंय तेवढयातचं रेसिडेन्सीतून परवानगी मिळाल्याचं पत्र दाखल झालं. त्याचवेळी भगव्या ध्वजात आच्छादलेला शिवछत्रपतींचा पुतळा खडखड्यातून येताना दिसला. भालजींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. प्रत्यक्ष महाराज दरबारात येत असल्याचे वातावरण तयार झाले. राजाराम रायफल्स च्या बँडच्या तालावर, हलगी तुतारीच्या नादावर लहान मुले, म्हातारे कोतारे आणि अवघं कोल्हापूर वय विसरून बेभान होऊन नाचायला लागलं. जणू शिवराज्याभिषेकाचे चित्रच कोल्हापुरात उभे राहिले.
 |
| स्वप्न साकार होताना...... भालजी, शिवपुतळ्यासोबत ,उद्घाटन प्रसंगी... |
भालजीनी ठरवल्याप्रमाणे १४ मे १९४५ रोजी, कोल्हापूर पाठीशी घेऊन उत्तरेकडे दिल्लीच्या रोखाने तलवार उंचावणारी ही कोल्हापूर संस्थानातील सर्वात पहिली शिवप्रतिमा या चौकात विराजमान झाली.
 |
| पुतळ्याचा चौथरा , सद्य स्थितीत... |
 |
| भालजींच्या कष्टाचं चीज ... |
अवघ्या १८ दिवसात हा पुतळा तयार केला गेला. भालजी आणि श्री शिवछत्रपती यांच्यातलं नियतीने ठरवलेलं नातं कोल्हापूरात ठसठशीतपणे कायमस्वरूपी उभं राहिलं. आजही इतक्या वर्षानंतर एखादा सामान्य कोल्हापूरकर जेंव्हा या शिवप्रतिमेसमोर कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतो तेंव्हा आपोआपच भालजी आणि त्यांच्या शिवनिष्ठेला दंडवत घातला जातो.
© भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
Comments
Post a Comment