काळा घोडा मुंबईचा, वारसा मात्र कोल्हापूरचाही !!!
![]() |
प्रिन्स ऑफ वेल्श उर्फ अल्बर्ट एडवर्ड याचा हा पुतळा त्याच्या पेक्षा त्याच्या काळ्या घोड्याच्या नावानेच ओळखला जायचा . |
कोल्हापुरला वारसा समृद्ध शहर बनवण्यात करवीरकर छत्रपती आणि करवीरची जनता यांच्याबरोबरच ब्रिटिशांचाही मोलाचा वाटा आहे. रॉयल रोड म्हणजे आजच्या भावसिंगजी रोडच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जुनी न्यायाधीश कचेरी, टाऊन हॉल, सी पी आर हॉस्पिटल, राजाराम हायस्कूल यासारख्या इमारतींचा कालातीत वारसा उभारण्यामागे करवीर दरबारची इच्छाशक्ती,अर्थशक्ती आणि ब्रिटिश सरकारची क्रीयाशक्ती हेच कारणीभूत आहेत. चार्ल्स मॅन्ट, वॉल्टर डकेट, आर. जे. शानोन यासारख्या कल्पक ब्रिटिश अभियंत्यांनी मध्ययुगीन कोल्हापूर बदलून टाकलं आणि आजचं कोल्हापूर उभा केलं.
मुळात कोल्हापुरची भौगोलिक परिस्थती दक्षिण मराठी संस्थनांवर वचक ठेवण्यास सोयीची असल्याने कोल्हापूर ब्रिटिशांचे लाडकं शहर होतं. ज्याप्रमाणे मुंबईला पूर्वेकडील लंडन बनवण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती, त्याच धरतीवर कोल्हापूरला दक्षिण महाराष्ट्रातील मुंबई बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता हे या सर्व इमारती बघून दिसतं. कोल्हापूरचे छत्रपती आणि ब्रिटिशांचे संबंध काही अपवाद सोडता कायमच सौहार्दपूर्ण राहिले. त्याचा फायदा कोल्हापूरला झाला आणि कोल्हापूर बाहेर सुद्धा छत्रपतींची छबी झळकायला लागली. त्यातूनच कोल्हापूरबाहेरही उभी राहिली कोल्हापुरची काही अपरचित वारसास्थळे...
काळा घोडा परिसर, मुंबई...
व्हिक्टोरियन काळात (सन १९००च्या आधी) मुंबईत फोर्ट भागात व्हिक्टोरिया राणीचा मुलगा प्रिन्स ऑफ वेल्स याचा फिल्डमार्शलच्या इतमामात घोड्यावर बसलेला अतिशय देखणा पुतळा होता. काळया पाषाणातला हा राजपुत्राचा पुतळा ओळखला जायचा तो मात्र त्याच्या रेखीव अशा घोड्याच्या शिल्पामुळेचं !!!काळा घोडा !!!
मुंबईतले प्रसिद्ध ज्यू व्यापारी सर अल्बर्ट ससून (पुण्यातल्या ससून हॉस्पीटलला यांचच नाव आहे.) यांनी प्रिन्स ऑफ वेल्स, १८७५ मध्ये भारत भेटीवर आला होता त्याची आठवण म्हणून हे देखणं शिल्प स्वखर्चाने मुंबईत बसवलं होतं.
पण याचा कोल्हापूरशी काय संबंध ?
खूप जवळचा आणि रोज नजरेसमोर राहणारा संबंध आहे. आधी पार्श्वभूमी समजून घेऊ. राजपुत्राच्या याच दौऱ्याप्रसंगी कोल्हापूरचे बाल छत्रपती शिवाजी चौथे (शिवाजी पुल यांच्याच नावचा) हे प्रिन्स ऑफ वेल्सला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते आणि त्या भेटीत कोल्हापुरात एक भव्य हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कोल्हापूर आणि इंग्लंड यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून पुढे हे हॉस्पिटल प्रिन्स ऑफ वेल्सच्याच नावाने ओळखलं गेलं.
अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल.
आजचं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय !!!! सी.पी.आर. मात्र ही भेट अजूनही एका दुसऱ्या कारणाने आजही शतकानंतरही चर्चेत असते. याच भेटीत कोल्हापूर दरबारकडून शककर्ते शिवरायांची तलवार प्रिन्स ऑफ वेल्सला भेट म्हणून देण्यात आली. अर्थात याबद्दल अनेक वाद, दावे आहेत आणि आपण ते टाळलेले बरे. (माझ्या संग्रहात त्या ऐतिहसिक भेटीचा ब्रिटिश वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेला इतिवृत्तांत आहे त्यावर पुन्हा कधीतरी लिहीनच!!)
आता पुन्हा काळया घोड्याकडे वळू..
या काळया घोड्याच्या पुतळ्याचं अनावरण १८७९ साली मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते झालं.
( हाच गव्हर्नर कोल्हापुरात पाण्याच्या खजिन्याचं बांधकाम बघायला आणि न्यू पॅलेसची पायाभरणी करायला आला होता आणि घोड्यावरून पडुन पाय मोडून बसला होता.)
पुतळ्याचा चबूतरा पुतळ्यापेक्षाही सुरेख होता. चार ही बाजूला सुंदर भित्तिशिल्पं (म्युरल) कोरली होती. आणि यातलं एक शिल्प होतं, "प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत प्रवेश करताना त्याचं स्वागत कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी चौथे हे करतायत असं." यात कोल्हापूर छत्रपतींबरोबर इतर ही मान्यवर लोक आहेतच. पण वयाने लहान अशा छत्रपतीनां सुद्धा या शिल्पात स्थान द्यावं लागलं अशी कोल्हापूरची थोरवी त्यावेळी निर्माण झालेली होती. ब्रिटिशांनी निर्माण केलेला कोल्हापूरचा, कोल्हापूर बाहेरचा वारसा !!!
![]() |
| व्हिक्टोरियन मुंबईत फोर्ट भागात रॅम्पार्ट रो आणि फोर्ब्ज स्ट्रीट याच्या जंक्शनवर उभा असलेला काळा घोडा पुतळा ! मागे एल्फिन्स्टन कॉलेज आणि ससून लायब्ररीची पार्श्वभूमी !! |
पुढे स्वातंत्र्यसंग्रामात असंतोषाची झळ अशा पुतळ्यांना सोसावी लागली. पण काळा घोडा मात्र यातून बचावला. १९६० नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान हा पुतळा चबुतऱ्यासकट तिथून हलवला गेला. सध्या तो भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयात. चबुतऱ्याचा मात्र ठाव ठिकाणा नाही. मी शोधायचा प्रयत्न केला पण कुठेही तो चबुतरा आणि त्याच्यावरचं कोल्हापूर छत्रपतींचे शिल्प मिळालं नाही !!!
पण एक आशेचा किरण मिळाला. मूळ पुतळा आणि त्याचा चबुतरा बोएम नावाच्या शिल्पकाराने बनवला होता. त्यावेळी त्याने चबुतऱ्याचे प्लास्टर मॉडेल बनवलेलं होतं. ते अजूनही सव्वाशतक उलटलं तरी लंडनच्या म्युझियमध्ये जपून ठेवलेलं आहे. मुंबईवर प्रेम करणारे दिल्लीतले माझे मित्र विनायक तलवार यांनी या मॉडेलचा फोटो उपल्बध करून दिला.
![]() |
| बोएम ने बनवलेलं आणि लंडनमध्ये प्लास्टर मॉडेलच्या स्वरूपात जपून ठेवलेला काळ्या घोड्याच्या पुतळ्याचा चबुतरा. |
कोल्हापुरात उभ्या असलेल्या सुंदर इमारती याच चौथ्या शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण झाल्या. शिवाजी पूल ही त्यांच्याच नावाचा . पण या सर्व ऐतिहासिक ठेव्याची कोल्हापुरात काय अवस्था आहे ते सांगायला नको. मात्र कोल्हापूरचा हा वारसा, सी पी आर चा जन्मप्रसंगाचा साक्षीदार अजूनही मुंबई आणि लंडनमध्ये सांभाळला जातोय.



Comments
Post a Comment