पंचगंगेतल्या थरारक नौकानयन शर्यती !!!

एकेकाळी पंचगंगेत अशा पद्धतीचा नौकाविहार सुरु होता ...

या वारसा संपन्न कोल्हापूरात खरा आणि उपेक्षित वारसा कोण असेल तर पंचगंगा . कोल्हापूर म्हणजेच पंचगंगा आणि पंचगंगा म्हणजेच कोल्हापूर ही वस्तुस्थिती कोणीही नाकारणार नाही. या जीवनदायीनी पंचगंगेच्या अनंत उपकाराखाली कोल्हापूरकरांच्या कित्येक कृतघ्न पिढ्या सरल्या. होय कृतघ्नचं !!! कारण हेच कोल्हापूरकर दिवसेंदिवस तिच्या विनाशाला कारणीभूत ठरत आहेत !!! 

ज्या पंचगंगेत कोल्हापूरकरांच्या अनेक पिढ्या पोहत मोठ्या झाल्या त्याच पंचगंगेत एकेकाळी सांघिक नौकानयन शर्यतींचा थरार चालायचा हे आज कुणाला सांगूनही पटणार नाही. आजच्या कोल्हापूरकरांना पंचगंगेत बोटी फक्त पुराच्या वेळी बचावकार्य करतानाच नजरेस पडतात. पण एक काळ याच बोटींनी घाटापासून प्रयागपर्यन्त पंचगंगेचं पात्रात गाजवला आहे. 

याचं खरं श्रेय जातं ते प्राचार्य चार्ल्स हेन्री कँडी यांनाच.. राजाराम कॉलेजचे पाहिले प्रिन्सिपल. १८८० ते १८९९..


प्राचार्य कँडी हे केंब्रिज विद्यापीठाचे विद्यार्थी. लंडनच्या थेम्स नदीत पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑक्सफोर्ड विद्यापीठाविरुद्ध केंब्रिजचे नेतृत्व करताना नौकानयनाच्या अनेक शर्यती त्यांनी जिंकल्या होत्या. त्यामुळे कोल्हापुरात आल्यावर पंचगंगेने त्यांना भुरळ घातली नसती तरच नवल !!! त्यांनी राजाराम कॉलेजतर्फे कोल्हापूरला फक्त क्रिकेटच शिकवले नाही तर पंचगंगेच्या पात्रात आधुनिक नौकाविहाराची सोयही केली. प्राचार्य कँडीनी लावलेले नौकानयनाचे वेड राजाराम कॉलेजमध्ये बोट क्लब च्या रूपाने कोल्हापुरात रुजले. 


नौकानयनाच्या शर्यतीसाठी सराव करणारे राजाराम कॉलेजचे विध्यार्थी 

कॉलेजच्या तीन चार बोटी कायमस्वरूपी घाटावर बांधूनच ठेवलेल्या असत. मागणीप्रमाणे विद्यार्थ्यांना त्या मिळायच्या. दिवसभर ही पोरं घाट ते प्रयाग अशा चकरा मारायचीत. वल्ही मारून तळहाताना पडलेले घट्टे इरेसरीने दाखवले जायचे. हा सगळा सराव चालायचा तो वर्षातून एक दोनदा होणाऱ्या बोटींच्या शर्यतीसाठी...

पंचगंगा घाट ते प्रयाग मार्गावर या शर्यती व्हायच्या आणि आजकाल फुटबॉल सामन्यांना जशी गर्दी होते तशीच गर्दी कोल्हापूरचे नागरिक या शर्यतीसाठी करायचे.

कॉलेजच्या बोट क्लबतर्फे नागरिकांना बोट चालवण्याचे रीतसर प्रशिक्षणही दिले जायचे. पौर्णिमेच्या रात्री नौकाविहार करण्याचे थ्रिल अनुभवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडायची. 

राजाराम बंधारा बांधायच्या आधीचा हा फोटो .. त्यामुळे मंदिरे नदी पात्राबाहेरच आहेत.

संपूर्ण मुंबई प्रांतात या नौकानयन क्षेत्रात कोल्हापूरला स्पर्धा होती ती फक्त पुण्याची !!! मुळा मुठेच्या पात्रात पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे विध्यार्थी अगदी असाच नौकानयनाचा सराव करायचे .. विशेष म्हणजे आज एकविसाव्या शतकात देखील पुण्यात ही प्रथा रेगाटा या वार्षिक कार्यक्रमा अंतर्गत सुरू आहे. मात्र १९४६ नंतर कोल्हापूरात या बोट क्लबचा उल्लेख देखील सापडत नाही.आज घाटावरचे जे काही जुने फोटो उपलब्ध आहेत त्यात दोन गोष्टी मात्र हटकून दिसतात. पंचगंगेचे नितळ स्वच्छ पाणी आणि त्यात दोघा तिघांच्या गटाने वल्ही मारत नौकानयन करणारे कोल्हापूरकर .. 

विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी आता इतिहास जमा होऊन फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत. 

सहज मनात विचार येतो , कोल्हापूरचा एखादा विद्यार्थी पुण्यात शिकताना जेंव्हा मुळामुठेच्या पात्रात वल्ही मारत असेल तेंव्हा त्याच्या पूर्वजांनी पंचगंगेत केलेल्या सरावाचे बळ त्याला  मिळत असेल का ?


--भारत पांडुरंग महारुगडे 

९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर 

Comments

  1. यानिमित्ताने पंचगंगेत पुन्हा नौकानयन चालू होईल ही आशा

    ReplyDelete
  2. हे माहीत नव्हते .खूपच आश्चर्यकारक माहिती खूप धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!