एका उत्खननाची पहिली गोष्ट , सगळ्यात पहिली !!!!

सर्वसाधारणपणे एखाद्या शहराची प्रगती त्या शहराचा वारसा गिळंकृत करते. पण कोल्हापूरच्या बाबतीत मात्र, होणाऱ्या प्रगतीमुळे वारसा उघडकीला येण्याचं दुर्मिळ उदाहरण घडलं. आणि पुढे थोड्याफार प्रमाणात हा वारसा जपला गेला. मी ब्रम्हपुरीबद्दल बोलतोय. या प्रकरणाचा एकंदर एक वेगळाच कोन समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

शिवाजी पुलाच्या उजवीकडे दिसणारा ब्रम्हपुरी टेकडीचा आजचा परिसर 


ब्रम्हपुरी !!!! कोल्हापूरात सध्या trending मध्ये असणारा विषय. नागरी प्रशासन आणि पुरातत्व खाते यांच्यात सुरू असलेली जुगलबंदी आणि ती असहायपणे टेनिसकोर्टवरच्या बॉल प्रमाणे पाहणारा सामान्य नागरिक, अशी आजची परिस्थिती आहे. या भागातली अतिक्रमणे आणि पुरातत्व खात्याचा १०० मीटरचा नियम या गुंत्यात मला अडकायचं नाही, पण या वादाच्या मुळापर्यंत मात्र तुम्हाला घेऊन जायचयं. सर्वसाधारणपणे मागे कधीतरी ब्रम्हपुरीवर उकराउकरी (कोल्हापूरी शब्द) होऊन कसल्यातरी मूर्ती सापडल्यात एवढीच आसपासच्या रहिवासी आणि सामान्य कोल्हापूरकरानां असलेली माहिती. तसं बघायला गेलं तर कोल्हापूर इतकं जुनं आहे की गावातल्या कुणाच्याही परड्यात उकरलं तरी काहीतरी सापडावं अशी परिस्थिती आहे. (दोनेक वर्षांपूर्वी जोतिबा रोडवर खुदाईदरम्यान वीरगळ सापडलेला आठवत असेल.) मग गावाबाहेरच्या ब्रम्हपुरी टेकडीवर पुरातत्व खात्याला १९४४ ते १९४६ पर्यंत दोन उत्खनने करण्यासाठी अशा कोणत्या घटना घडल्या? यामागे प्रेरणा काय होती? 


या लेखात याच घटनांची  टप्प्याटप्प्याने माहिती घेऊ.

 * १९४४-४५ उत्खनन पहिले :

२७ जानेवारी १९४५ च्या संध्याकाळी साडेपाच वाजता राजाराम कॉलेजचे शोधक प्राध्यापक कुंदनगार यांना निरोप मिळाला. दोन महिन्यापूर्वी ब्रम्हपुरी टेकडीवर त्यांनी जे उत्खनन सुरू केले होते त्याला यश मिळाले होते. ब्रम्हपुरी टेकडीवर प्राचीन अवशेष मिळतात या प्रचलित माहितीमुळे त्यांनी हे खोदकाम हातात घेतले होते. यश मिळेल की नाही याबद्दल साशंक असतानाच हा आनंदाचा निरोप मिळाला होता. अंदाजे तीन मीटर खोलीवर धातूचे दोन हंडे आणि एक कढई मिळाली. या कढईत ब्रॉंझच्या जवळपास शंभरावर छोट्यामोठ्या कलात्मक वस्तू होत्या. एकंदर माहिती घेता असं कळलं की त्यावेळेपर्यंत इतक्या मोठया प्रमाणात ब्रॉंझच्या वस्तू भारतीय उपखंडात इतरत्र कुठेही सापडलेल्या नव्हत्या. विशेष उल्लेखाची घटना म्हणजे यात मिळालेली अर्ध्या वीत उंचीची ग्रीक सागर देवता Poseidon पॉसीडॉन ची ब्रॉंझची मूर्ती!! दोन हजार वर्षांपूर्वी मूळ संगमरवरी मूर्तीच्या ब्रॉंझच्या छोटेखानी वीस प्रतिकृती बनवल्या गेल्या होत्या. कोल्हापूरात सापडलेली ही त्यापैकीच एक असावी असा संशोधकांचा अंदाज आहे. या शिवाय खेळण्यातली बैलगाडी, हत्तीवरचे स्वार, आरसे, सुरई अशा इतर वस्तू प्राध्यापक कुंदनगारांना मिळाल्या. या सर्व वस्तू आजही टाऊन हॉल मध्ये बघायला मिळतात. 

प्राध्यापक कुंदनगारांना १९४५ साली सापडलेला रोमन पॉसिडॉन 

या उत्खननाची नेमकी जागा म्हणजे पंचगंगेकडून शिवाजी पुलाकडे जाताना, डावीकडे नारायणदास महंतांचा मठ आहे त्याच्या बरोबर समोरची टेकडीवरची जागा !!!

*१९४५-४६ उत्खनन दुसरे:

पहिले उत्खनन हे स्थानिक स्वरूपाचे होते. पण त्यात सापडलेला साठा बघून पुरातत्व क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष कोल्हापूरकडे वेधले गेले. पुण्याचे डेक्कन कॉलेज म्हणजे या क्षेत्रातले प्रसिद्ध नाव. या कॉलेजतर्फे प्राध्यापक सांकलिया आणि प्राध्यापक दीक्षित यांनी ब्रम्हपुरीवर थोड्याच दिवसात नव्या उत्खननाची सुरुवात केली. हेच ते गाजलेले सांकलिया दीक्षित उत्खनन !!. 

पहिल्या उत्खननात ज्या वस्तू मिळाल्या त्यांचा कोल्हापूरशी असलेला संबंध शोधणे आणि त्या आधारे इथला सांस्कृतिक काल निश्चित करणे हा मुख्य हेतू धरून या दोघांनी पहिल्या खुदाईच्या जागे पासून थोडे मागच्या बाजूला पूर्वेकडे खोदकाम सुरू केले. अपेक्षेप्रमाणे विटांचे बांधकाम, मातीच्या भांड्यांचे तुकडे, नाणी अशा प्रकारचे अवशेष मिळाले आणि त्याच्यावरून सातवाहन कालीन वसाहत या टेकडीवर एकेकाळी नांदली असावी असा निष्कर्ष काढला गेला. या उत्खननाची माहिती आजही Excavations at Brahmapuri (Kolhapur) 1945-46, by Hasmukh Dhirajlal Sankalia and Moreshwar Gangadhar Dikshit  या रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेली आहे.

ही जागा म्हणजे ब्रम्हपुरी पिकनिक पॉइंटसमोर, टेकडीवरचा सर्वात उंचीवरचा भाग !!! 

१९४६ साली ब्रम्हपुरी टेकडीवर झालेल्या उत्खननाचे दुर्मिळ छायाचित्र  !!
डाव्या कोपऱ्यात शिवाजी पूल दिसतोय ..
सौजन्य : कोल्हापूर टाऊन हॉल , दैनिक सकाळ 

मला वाटतं इथपर्यंतची माहिती आतापर्यंत वेळोवेळी प्रसिद्ध झाली आहे आणि चौकस कोल्हापूरकरांना थोड्याफार प्रमाणात माहिती देखील आहे. आता या ब्रम्हपुरी प्रकरणाच्या उगमाचा म्हणजे वर उल्लेख केलेल्या उत्खननाच्या मूळ कारणांचा वेध आपण घेणार आहोत. हाच या लेखाचा मूळ हेतू आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सन १८७३-७४!!!  कोल्हापूर शहर हे सर्व दक्षिण मराठा संस्थानांची राजधानी म्हणून ब्रिटिशांनी जाहीर केले आणि कोल्हापूरच्या उत्कर्षाला सुरुवात झाली. यात शहराच्या सुशोभीकरण, नागरीकरण आणि दळणवळण यावर विशेष भर दिला गेला. कोल्हापूर शहर इतर भागाशी जोडण्यासाठी रस्ते PWD खात्यातर्फे बनवण्यात आले. याच अंतर्गत मंजूर झाला ब्रम्हपुरी पंचगंगा पूल....आजचा शिवाजी पूल !!!

आधुनिक कोल्हापूरचा निर्माता वॉल्टर मार्डन डकेट या ब्रिटिश अभियंत्यांने या पुलाचा आराखडा बनवला. आणि रामचंद्र महादेव या कंत्राटदारानी हा पूल बांधायचे कंत्राट मिळवले. पुलाचा सर्व्हे आधीच पुरा झाला होता. प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याआधी समान नेऊन टाकण्यासाठी तात्पुरता रस्ता करण्याचे काम सुरू झाले. यासाठी ब्रम्हपुरी टेकडीवर खोदकाम सुरू झाले.

शिवाजी पुलाच्या बांधकामासाठी निघालेल्या टेंडरची जाहिरात , ८ डिसेंबर १८७३

त्यावेळची ब्रम्हपुरी टेकडी नजरेसमोर आणा. टेकडीवर एका बाजूला बुऱ्हाणशहाची कबर आणि फकीर लोकांची दोन चार घरे. पूर्वेच्या बाजूला उतार संपला की नागरी वस्तीचा बुधवार आणि केसापूर पेठेचा भाग. तर पश्चिमेला खडा कडा आणि पायथ्याला नव्वद अंशात वळून वाहणारी पंचगंगा.  टेकडीच्या दक्षिणेला खर्डेकरांची पेरूची बाग . या बागेला उजवीकडे ठेऊन टेकडीवरूनच उत्तरेला स्मशानात सुभेदाराच्या आणि आईसाहेबांच्या घाटाकडे गेलेला रस्ता अशी परिस्थिती. स्मशानात जायची  परिस्थिती उदभवली  नसेल तर इतर वेळेला टेकडीवर राबता अगदी नसल्यातच होता . 

नदीकडे जायच्या बाजूला टेकडीवर cutting सुरू झाले. आणि या कामादरम्यान खोदकाम मजुरांना काही शिशाची आणि तांब्याची नाणी सापडली. अशी नाणी सापडणे हा प्रकार त्यावेळच्या कोल्हापूरात काही नवीन नव्हता. शिवाय ही काही सोन्याचांदीचीही नाणी नव्हती. त्यामुळे या प्रकरणाचा जास्त गवगवा झाला नाही. हे बांधकाम शिस्तप्रिय ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असल्याने रीतसर पंचनामा करून ही नाणी मुंबईला रॉयल एशियाटिक सोसायटीत पुढच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आली.हे ब्रह्मपुरीवरचे सगळ्यात पाहिले उखनन (१८७३) !!! पुलाचं बांधकाम महत्त्वाचे असल्याने अपघाताने घडलेली ही घटना कुणाच्या नजरेत ही आली नाही आणि महत्त्वाचीही वाटली नाही.

पण सर्वांचं लक्ष वेधून घेणारी आणि ब्रम्हपुरीचे पुरातत्वीय महत्व वाढवणारी घटना पुढे घडणार होती, फक्त तीनच वर्षांनीं !!!!

सन १८७७:

पुलाचं बांधकाम सुरू होऊन तीन वर्षे झाली होती. बांधकाम बरचसं वर चढलं होतं. पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचं काम करण्यासाठी ब्रम्हपुरी टेकडीचा भाग खुदाई करून मोकळा करण्यात येत होता.

आणि एकेदिवशी या खोदकामात चक्क अस्सल सोन्याचे मणी सापडले !!!!.

या घटनेचा इत्यंभूत गोषवारा कोल्हापूरचे कारभारी रावबहादूर बर्वे यांनी मुंबईच्या गव्हर्नर ऑफिसला कोल्हापूरच्या पोलीटिकल एजंटामार्फत कळवला. ते पत्र माझ्या संग्रहात आहे. ही घटना कशी घडली, काय काय सापडले याचा संपूर्ण बारीकसारीक तपशील या पत्रात दिला आहे.या पत्रातला मूळ मजकूर खालील प्रमाणे,

६ डिसेंबर १८७७,

प्रति,

कर्नल श्नायडर,
पोलिटिकल एजंट,
कोल्हापूर.

सध्या पंचगंगेवर पुलाचं बांधकाम सुरू आहे. पूर्वेच्या बाजूला हा पूल थेट ब्रम्हपुरी टेकडीलाच भिडणार आहे. पुलाचा कोल्हापूरबाजूचा  शेवटचा खांब जिथे टेकडीला मिळतो तेथील टेकडीच्या भागाचे खुदाई करून सपाटीकरण सुरू आहे. तिथेच पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यांच्या पसरणाऱ्या भिंतीचे (Wing Wall) बांधकाम होणार आहे. दिनांक २२ नोव्हेंबर १८७७ रोजी या ठिकाणच्या खोदकामात अंदाजे सहा फूट खोलीवर विटांच्या दोन भिंती आढळल्या. या भिंती एकमेकांपासून अंदाजे आठ फूट अंतरावर आहेत. दोन भिंतीच्या मध्ये तांब्याचा एक मोठा हंडा मिळाला आहे. हा हंडा बहुतेक अनेक शतकं जमिनीत गाडला गेलेला दिसतोय. त्याची काठाळी आणि मुख्य भाग गंजून गेल्यामुळे तुटलेले आहेत. या हंड्यात जे काही सापडलं त्याचा तपशील असा..

१. सोन्याचे ३३ मणी आणि काही दागिने. हे सर्व अस्सल चोख सोने असून दागिन्यांवर रेखीव कलाकुसर आहे.

२. पितळ किंवा कांस्य धातूची वेगवेगळ्या आकाराची भांडी. यातली बरीचशी भांडी पसरट असून त्यावर कोरीव नक्षीकाम आहे.

३. शिशाची नाणी १८६५ नग, तांब्याची नाणी १०० नग. या नाण्यांवरील ठसे (मुद्रा) हे तीन वर्षांपूर्वी सापडलेल्या नाण्यासारखेच आहेत.

४. ओळख न पटणाऱ्या काही वस्तू..

असं दिसतं की काही शतकांपूर्वी या टेकडीवर एखादी वस्ती असावी. ज्या भांड्यात या वस्तू मिळाल्या त्याची तपासणी केली असून ते खात्रीपूर्वक तांब्याचेच आहे.
सापडलेल्या वस्तूंपैकी प्रत्येकी दहा नाणी, चार सोन्याचे मणी आणि दागिन्यांचे दोन तुकडे मुंबईला अभ्यासासाठी पाठवले असून उर्वरित साठा हा टाऊनहॉल संग्रहालयात ठेवला आहे.

-- महादेव वासुदेव बर्वे.

रावबहादूर बर्वेनी खोदकामात सापडलेल्या वस्तूंसंदर्भात लिहिलेले पत्र 

बर्वेनीं  यातल्या काही वस्तूंचा एक फोटो काढला आणि तो या पत्राबरोबर जोडला. सुदैवाने तो फोटोही उपलब्ध आहे.

१८७७ मध्ये शिवाजी पुलाच्या कठड्यांच्या बांधकामासाठी केलेल्या खोदकामात सापडलेल्या बौद्ध पूजेतील  वस्तू 

त्यावेळचे ब्रिटिश वर्चस्व असणाऱ्या पुरातत्व क्षेत्रात या घटनेमुळे खळबळ उडाली. आणि याचा अभ्यास जोरात सुरू झाला. पुढच्याच वर्षी प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक डॉ. रामकृष्ण भांडारकर यांनी याविषयावर एक शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीत प्रसिद्ध केला. भारतात इतरत्र आढळलेले अशा पद्धतीचे विटांचे बांधकाम, सापडलेल्या वस्तू यावरून त्यांनी कोल्हापूरातल्या बौद्ध संस्कृतीबद्दल ठाम निष्कर्ष काढला. बर्वेना ज्या वस्तूंची ओळख पटली नाही त्या निश्चितपणे बौद्ध भिक्खुंच्या पूजेतील होत्या हे भांडारकरानी सप्रमाण दाखवून दिले. सापडलेले विटांचे बांधकाम म्हणजे बौद्ध स्तूपाच्या भोवती असलेल्या इतर इमारतींचे आहे हे त्यांनी जाहीर केले. जी नाणी सापडली होती त्यावरच्या चिन्हांचा अर्थ त्यांनी उलगडून दाखवला आणि ब्रम्हपुरी टेकडीचा सातवाहन काल सिद्ध केला.

आता, आजच्या काळात परत येतोय.... 

चौकस वाचकांना प्रश्न पडलाअसेल की सोन्याचे मणी सापडलेली जागा नक्की कोणती? 
शिवाजी पुलाचे दोन्ही कठडे कोल्हापूरकडे येताना पूल संपतो तिथं पंखासारखे पसरले आहेत. त्यांच्या शेवटी दोन्ही बाजूला अतिशय कलात्मक दगडी खांब आहेत आणि त्यांच्यावर देवनागरी आणि इंग्रजीत शिवाजी पूल असं लिहिलं आहे. Wing Wall म्हणजे अशीच पसरत जाणारी भिंत.. 

म्हणजे सोन्याचे मणी सापडले ते ठिकाण, म्हणजे कोल्हापूरकडून जाताना जिथं शिवाजी पूल सुरू होतो तीच जागा !!!!

शिवाजी पुलाचे शेवटच्या पिलर जवळचे कलात्मक खांब
शिवाजी पुलाचे कोल्हापूरबाजूचे कठडे , पसरलेले 


  


Wing Wall 

अशा तऱ्हेने १८७३ आणि १८७४ मध्ये कोल्हापूरचा सर्वात प्राचीन वारसा उघडकीला आणण्यास कारणीभूत ठरला तो कोल्हापूरच्या बदलाचे आणि प्रगतीचं प्रतिक असणारा शिवाजी पूल !!! अपघाताने लागलेल्या या शोधामुळे ब्रम्हपुरी टेकडीचा नाव पुरातत्त्व खात्यात गाजले. पण नंतरच्या काळात वाढत्या नागरीकरणामुळे हा वारसा पुढे  शोधण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. नागरिकरणाचे प्रमुख कारण म्हणजे शिवाजी पुलामुळे सोपे झालेले दळणवळण. ब्रह्मपुरी चर्चची नंतरच्या काळात झालेली उभारणी आणि बुऱ्हाणशहा दर्ग्याचे विस्तारीकरण यामुळे इथल्या मोकळ्या जागा रहिवासाखाली आल्या. त्यामुळे हा महत्वपूर्ण शोध फक्त कागदपत्रांत बंद होऊन राहिला आणि फक्त माहितीच्या रूपातच जिवंत राहिला. आणि या माहितीच्या आधारे प्राध्यापक कुंदनगारांनी जे उत्खनन केले त्यात रोमन पोसिडॉन मिळाला आणि पुन्हा एकवार ब्रह्मपुरीचे नाव गाजले.

पण आजची परिस्थिती अशी आहे की कुंदनगार ,सांकलिया आणि दीक्षितानी खोदलेले खड्डे बुजवून त्यावर पक्की घरे आहेत. त्यात राहणाऱ्यानां कल्पनाही नाही की कोणता अमूल्य ठेवा त्यांच्या उशाशी पायाशी गाडला गेलाय !!

ब्रम्हपुरी ही एकेकाळी टेकडी होती याच्याही आता फार कमी खुणा शिल्लक राहिल्या आहेत. तोरस्कर चौकातल्या नुकत्याच लयाला गेलेल्या एके काळच्या नावेच्या कारखान्याच्या आणि पेरूच्या बागेमागे असणाऱ्या चढावरच्या  मूठभर जागेतला घनदाट झाडीचा भाग एकेकाळी हा परिसर कसा असेल याची चुणूक दाखवतो.

कोल्हापूरच्या अस्तित्वाच्या सर्वात प्राचीन खुणा आता बहुधा कायमस्वरूपी काळाच्या उदरात गडप झाल्यात असं मानायला हरकत नाही.१८७३ आणि १८७७ साली शिवाजी पुलाच्या रुपात जी प्रगती झाली त्यावेळी हा प्राचीन ठेवा ,वारसा स्वतःहुन आपल्यासमोर आला. पुढे १९४५ पर्यंत कुंदनगार, सांकलिया आणि दीक्षितांनी प्रयत्न केले आणि त्या वारशाने थोडी हालचाल केली पण आता तो कायमचा हरवला आहे.आपण तो संभाळायला , explore करायला कमनशिबी ठरलो..मुद्दाम मी टेकडीवरची घरे आणि इतर बांधकामे बघून आलो आणि जाणवले,

We have missed the bus, FOREVER  !!!! 


--भारत पांडुरंग महारुगडे 

९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर 


विषयांतर : 

१. बर्वेंच्या पत्रावरून लक्षात येतंय की टाऊन हॉल मध्ये संग्रहालय अगदी १८७७ मध्येही होतं.
२. ब्रम्हपुरी सोडून कोल्हापुरात अजून एका ठिकाणी प्राचीन दगडी मूर्ती सापडलेल्या आहेत .. केशवराव भोसले नाट्यगृह !!! टाऊन हॉल मध्ये बघायला मिळतात 

संदर्भ :
१. Excavations at Brahmapuri (Kolhapur) 1945-46, Sankaliya -Dikshit 
२. Road Building in Western India-Robinson
3. Royal Asiatic Society Papers 

Comments

  1. भारत, तुमच्यासारख्या पुरातत्त्व व इतिहास संशोधकांची आज खूप गरज आहे.
    धन्यवाद या माहितीबद्दल!!

    ReplyDelete
  2. अभ्यासपुर्व माहिती भारत दादा.आज नविन माहितीची भर पडली.खुप धन्यवाद.

    ReplyDelete
  3. भारत, अप्रतिम माहिती दिली आहे, खूप खूप छान लेख ! धन्यवाद ! ! !

    ReplyDelete
  4. सुधीर पाटील29 March 2022 at 03:07

    अप्रतिम माहिती सर.
    मी ब्रह्मपुरीजवळच जुना बुधवार पेठेत राहतो पण मला देखिल तुमच्या या लेखामुळे खरा इतिहास समजला.
    मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  5. भारत अतिशय सुंदर लेखन , नवीन माहिती

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!