सुदैवाने वाचलेला कोल्हापूरचा दुर्दैवी वारसा !!!!!
काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरात वारसा सप्ताह संपन्न झाला. वारसा अस्तित्वात असणाऱ्या शहरांमध्ये कोल्हापूरचा नंबर फारच वरचा आहे. अर्थात हा वारसा आपण किती तळमळीने जपतोय हा विषय वेगळा !!!. आधीच्या पीढीतल्या कोल्हापूरकरांनी हा वारसा निर्माण केला, जपला, काही मोडला आणि काही आपल्यापर्यंत हस्तांतरित केला. आजच्या घडीला त्या दर्जाची वारसास्थळे आपण निर्माण करू शकत नसलो तरी जपू शकतो, पण असं किती ठिकाणी होतं याच उत्तर शोधणं अवघड आहे.माझा आजचा विषय वेगळा आहे. वारसा टिकवण्याबद्दलचं रडगाणं सांगण्यापेक्षा, आहे तो वारसा मागच्या पीढीने कसा टिकवला, काय प्रसंग घडले, याची माहिती आज घेऊ.
सर्वांच्या नजरेत असलेला पण सर्वांकडून दुर्लक्षित असा कोल्हापूरचा एक वारसा म्हणजे आपली बिंदू चौकातली तटबंदी आणि तिचे बुरुज. शहर विस्तारीकरणात मूळ तटबंदी पाडून आज त्या जागेवर रस्ते आहेत. पण आज दिसतोय तो तटाचा भाग, बुरुज आणि वेस कसे वाचवले गेले याबद्दलचा हा प्रपंच.....
| The Glimpses Of India या अतिशय दुर्मिळ ग्रंथात आणि करवीर रियासतीत छापलेलं कोल्हापूरच्या तटाचे एकमेव छायाचित्र !! |
कोल्हापूरचा पहिला वहिला मास्टर प्लॅन..
१८८१ साली कोल्हापूरच्या पोलिटिकल एजंटने कोल्हापूर नगरपालिकेत काही महत्त्वाचे बदल केले. (कोल्हापूर नगरपालिका ,स्थापना १८५४, म्हणजे आपली को.म.न.पा. जवळपास पावणे दोन शतके जुनी आहे.) मुख्य भर हा शहर स्वच्छता आणि शहर सुधारणा आणि त्यायोगे शहर विस्तारीकरण हाच होता. तशी, त्या दृष्टीने पावलं ब्रिटिशांनी खूप आधी पासूनच टाकायला सुरू केली होती. राजाराम छत्रपतीनां १८७०च्या आधीच त्यांनी जुन्या राजवाड्यातुन काढून रेसिडेन्सीलाजवळ अशा बावड्यातल्या लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये ठेवलं होतं. त्यामागे एक हेतू असाही होता की राजा मागोमाग प्रजेने सुदधा तटाच्या बाहेर राहायला जावे आणि शहरातली दाटी कमी व्हावी. या दाटीमुळेच शहर स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला होता. आणि याच मूळ होतं ते कोल्हापूर भोवती असणाऱ्या चार एक मैल परीघ असणाऱ्या तटबंदीचा !!! शिवाय गावात मोकळी खेळती हवा मिळत नसल्यानेही एक प्रकारची मरगळ पसरलेली असायची. त्यामुळे पोलिटिकल एजंटकडून तट पाडण्याबद्दल नगरपालिकेवर दबाव यायला सुरुवात झाली .या संदर्भात त्यांच्यासमोर रोल मॉडेल होती मुंबई . वीस वर्षांपूर्वी मुंबईची तटबंदी सर बार्टल फ्रिअरने पाडल्यामुंळे मुंबईत फोर्ट भागात जागेची विपुलता निर्माण झाली , देखण्या इमारती उभारल्या गेल्या आणि मुंबई किल्ल्यातलं आरोग्यमान देखील सुधारलं होतं. त्याचाच प्रयोग कोल्हापुरात करायचा होता .
कोल्हापुरात या पाडकामाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला गेला . हा काळ लक्षात घ्या. नगारखान्याजवळचं नक्षीदार राजाराम हायस्कुल कर्नल श्नायडरच्या प्रयत्नांमुळे राजाराम कॉलेज म्हणून मुंबई युनिव्हर्सिटीला जोडलं गेलं होतं. शिवाजी पूल, टाऊन हॉल लोकांच्या सवयीचे झाले होते. पाण्याच्या खजिन्यातलं पाणी चाव्यांद्वारे चौकचौकात खेळत होतं. एका अंगाला थोरल्या दवाखान्याचं बांधकाम वर वर चढत होतं. पार तिकडं रेसिडेन्सीजवळ नवा राजवाडा आकारत होता. म्हणजे जुनं कोल्हापूर कात टाकून, नवा रंग गावावर चढत होता. त्यासाठीच तट पाडणं गरजेचं आणि कालसुसंगत आहे याची जाणीव लोकांना झालेली होती. तरीही तटाच्या पाडकामाला अडथळा केला जात होता. कारण काहीतरी नवं बनण्याऐवजी काहीतरी लयाला जाणार होतं. तट पाडल्यावर कोल्हापूर उघड्यावर पडेल आणि चोराचिलटांचं फावणार असा समज गावभर पसरला होता. त्यामुळेच कोल्हापूरच्या या पहिल्या वाहिल्या मास्टर प्लॅनला कडाडून विरोध झाला. कदाचित एखादी कृतिसमितीही बसली असावी.
त्याच सुमारास म्हणजे १८८३ साली चौथ्या शिवाजी छत्रपती महाराजांना ब्रिटिशांनी तब्येतीच्या कारणावरून दरबारी कामकाजातुन दूर केलं आणि कोल्हापूर संस्थनावर रिजंट म्हणून जयसिंगराव घाटगे (थोरल्या शाहू महाराजांचे जनक वडील,आबासाहेब ) यांची नेमणूक केली. त्यांच्या काळातच रंकाळ्याची देखणी तटबंदी आणि टॉवरचं बांधकाम पूर्ण झालं. पण आबासाहेब घाटगेनां सुद्धा तट पाडायचं काम रेटता येईना इतका विरोध कोल्हापूरात वाढला होता. याशिवाय लोकांचे अर्ज, विनंत्या सुरूच होत्या. पण कामाला काही गती येत नव्हती. पण पुढे काहीतरी वेगळेच घडणार होते. कान टोचायला शेवटी सोनारच येणार होता.
सर जेम्स फर्ग्युसन...
हा मुंबई इलाख्याचा (Bombay Presidency) तत्कालीन गव्हर्नर. कोल्हापूर याच इलाख्यात येत असल्याने कोल्हापूरचा पोलिटिकल एजंट मुंबईच्या गव्हर्नरलाच जबाबदार असायचा.
फेब्रुवारी-मार्च १८८३....
फर्ग्युसन आणि त्याचा स्टाफ चिंचलीच्या शेतकी आणि जनावरांच्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेला होता. चिंचली, कुरुंदवाड आणि इचलकरंजी मार्गे तो कोल्हापूरात रेसिडेन्सीत आला. साहेबाचा साहेबच तो. त्यामुळे गव्हर्नरच्या स्वागतासाठी कोल्हापूरातले प्रमुख रस्ते कमानींनी सजले, घरांना चुन्याचा हात देण्यात आला. गावभर पताका टांगल्या. कोल्हापूर नगरपालिकेतर्फे सर जेम्स फर्ग्युसन च्या सत्कारासाठी टाऊन हॉल मध्ये विशेष सभा भरली. मुंबई इलाख्यात रेल्वेचे जाळे तयार करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नाबद्दल गव्हर्नरचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
सत्काराला उत्तर देण्यासाठी सर जेम्स उठला आणि भर सभेत , तट पाडण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबद्दल नगरपालिकेचे वाभाडे काढले. त्याचं भाषण जागेअभावी इथं देता येणार नाही, पण कोल्हापूरकरांच्या सवयीबद्दल अतिशय टोकेरी शब्दात त्यानं नाराजी व्यक्त केली. चोर, शत्रूंच्या भीतीबद्दल बोलताना तो म्हणाला,
" आज इंग्रजी आमदानीत दुर्बळातला दुर्बळ व्यक्तीही कोल्हापूर ते पुणे असा प्रवास कुठलीही भीती न वाटता करू शकते , मग तट पाडल्यावर कोल्हापूरची सुरक्षितता धोक्यात येईल अशी भीती कोल्हापूरकरांना वाटायचं कारणच काय ?"
शेवटी, काम पूर्ण न झाल्यास खुद्द Governor Office कडून हे काम पुरं केलं जाईल असा निर्वाणीचा इशारा त्यानं दिला. आणि दुसऱ्याच दिवशी सर जेम्स फर्ग्युसन, नव्याने बांधलेल्या आंबा घाटाचे उदघाटन करण्यासाठी मलकापूर मार्गे निघून गेला.
| सर जेम्स फर्ग्युसन... |
इकडं नगरपालिकेचा जोर वाढला आणि लोकांचा विरोध शिथिल होऊ लागला. पण तेढ काही मिटली नाही. शेवटी कोल्हापूर नगरपालिकेने अधिकृत ठरावच केला की...
१. शहाराभोवतीचा तट पाडून टाकणे.
२. तटाबाहेरील खंदक मुजवणे.
३. तट पाडून आणि खंदक मुजवून तयार झालेल्या जागेवर रस्ते तयार करणे
४. शिल्लक राहिलेली जागा घरे बांधण्यासाठी वापरणे.
या ठरावाला होणाऱ्या लोकांचा विरोधाची तीव्रता करण्यासाठी, आदितवार वेस ते विजापूर वेस (आजची मिरजकर तिकटी ) यामधील तीन आणि आदितवार वेस ते शनिवार वेशी दरम्यानचा एक बुरुज, या बुरुजांमधला तटाचा भाग आणि आदितवार वेशीचा काही भाग ऐतिहासिक अवशेष म्हणून ठेवावीत असा सर्वानाच खुश करणारा मार्ग निवडला गेला .सर्व पाडकाम पुरं व्हायला १८८९ साल उजाडलं .आणि आज दिसणारे तटाचे अवशेष टिकवले गेले. (आदितवार वेशीजवळचं खंदकातलं शेषशायी विष्णूचं मंदिरही पुढं मागं आजच्या मिरजकर तिकटीला स्थलांतरित केलं गेलं.त्याबद्दल पुन्हा कधीतरी !!)
पण, हाच भाग का टिकवला?
गुजरी ही तेंव्हाची मुख्य बाजारपेठ !!. आदितवार वेशीतून जाणारा रस्ता (आजचा राजाराम रोड) नगारखान्यासमोरून एक उजवी आणि एक डावी घालून, गुजरी मार्गे सरळ रंकाळा वेशीतच जायचा. शिवाय तटाबाहेर रविवारी मोठा बाजार भरायचा. यामुळे वर्दळ नेहमीची !! त्यामुळे बाजारपेठेला जवळचा असा तटाचा भाग पाडला नसावा. शिवाय जुना राजवाडा, अंबाबाईचं देऊळ, राजाराम कॉलेज आणि करवीर नगर वाचन मंदिर यांच्या देखण्या इमारती यांचं सानिध्य !!! यामुळेचं आजचे बिंदू चौकातले अवशेष पाडले गेले नसावेत. त्यावेळी वाचवलेला आदितवार वेशीतला काही भाग आजघडीला दगडांनी चिणून बंद केला आहे. इथूनच जवळ आत असलेल्या तुरुंगातली फाशी द्यायची व्यवस्था होती त्यामुळे त्याला फाशी गेट पण म्हटलं जायचं. जुन्या कोल्हापूरची आवड असणाऱ्यानां इच्छा असेल तर फारसे कष्ट न करता अजूनही ही बंद केलेली वेस बघायला मिळते. विशेष म्हणजे आज जे बुरुज शिल्लक आहेत त्यांची नावे देखील उपलब्ध आहेत. कोल्हापूरातलेच संशोधक अमित आडसुळे यांनी ती शोधली आहेत. निज्यामबिंदू, हणमंत आणि नरसिंगा बुरुज !!!!
| दगडांनी बंद केलेला मूळ आदितवार वेशीचा भाग... |
| उजवीकडे असणारी कमान / वेस नंतरच्या काळातली आहे. |
एकेकाळी कोल्हापूरचं रक्षण करणारे हे तट बुरुज आज मात्र पार्किंग मधल्या पर्यटकांच्या गाड्या मोजताना दिसतात. कोल्हापूरच्या याच तटा बुरुजांनी काय काय सोसलंय , बघितलंय माहीत आहे ?
- महादजी शिंद्यांच्या कवायती फ्रेंच पलटणीच्या तोफांचा भडीमार पचवलाय.
- शिंद्यांच्या फौजेंतले फ्रेंच शिपाई मारले गेल्यावर त्यांची तटाबाहेर खणलेल्या कबरींचे हेच बुरुज साक्षीदार आहेत.
- याच बुरुजानी तासगावच्या पटवर्धनांच्या फौजेचा सामना केलाय आणि त्यानंतर जळणारं कोल्हापूर ही बघितलंय.
- दोन-पावणे दोनशे वर्षांपूर्वी कोल्हापूरला धडा शिकवायला आलेला ब्रिटिश अधिकारी कॅप्टन जेम्स वेल्श याच तटा बुरुजांना ओलांडून कोल्हापुरात १८२७ साली आला आणि म्हणाला मला हे शहर मला ब्युनॉस आयर्सची आठवण करून देतंय . (अर्जेंटिनाची राजधानी ).
- याच बुरजानी एकेकाळी (१९२३) बाबुराव पेंटरांच्या सिंहगड चित्रपटाच्या प्रोमोशन साठी तानाजी, कडा चढत असलेलं भव्य कटआऊट अंगावर ल्यालंय .
- याच बुरुजांरुन १९४२च्या लढ्यात क्रांतीवीर मल्लू हणबर यांनी सब जेल मधून मारलेली उडी गाजली .
- याच बुरुजांनी बिंदू नारायण कुलकर्णीचं हौतात्म्य बघितलंय .
- या बुरुजांच्या समोरच डॉ आंबेडकरांच्या हयातीतला पहिला पुतळा बसवला गेलाय .
आता नंतरच्या काळात, गेल्या काही वर्षात हे बुरुज आणि तटबंदी राजकीय भाषणांची धुळवड बघत आलेत .
पण तसं बघायला गेलं तर या बाबतीत कोल्हापूर सुदैवी !!!
कारण शहरविस्ताराचा असाच प्रसंग मुंबई शहराच्या तटबंदीच्या बाबतीत जेंव्हा घडला तेंव्हा मुंबईची झाडून सगळी देखणी इंग्रजी पद्धतीची तटबंदी, आणि सुंदर असे तिन्ही दरवाजे अपोलो गेट, बाजार गेट आणि चर्चगेट जमीनदोस्त करण्यात आले. नाही म्हणायला सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ तटबंदीचे अतिशय तुटपुंजे अवशेष बघायला मिळतात.पण तेही आधुनिकतेच्या बुरख्यात ओळखू येत नाहीत. पण कोल्हापूरात मात्र व्यवस्थितपणे बुरुज आणि तटाचा भाग जुन्या कोल्हापूरची आठवण करून देत उभे आहेत.
याचं खरं श्रेय त्या शतकापूर्वीच्या कोल्हापूरकरांनाच. ते कोल्हापूरकर केलेल्या उपकारांची जाण ठेवत होते. कोल्हापूरकरांनी उपकार मानावे अशा मोजक्या वास्तूंपैकी काही उदाहरणे म्हणजे राजाराम कॉलेज, सी पी आर, आणि हे तट बुरुज !!!. यांनी आपापल्या परीने शिक्षण, आरोग्य आणि संरक्षण या बाबतीत कोल्हापूरवर छाप सोडली आहे. पीढी दर पीढी आपली रगेल आणि रंगेल कोल्हापूरी वृत्ती परंपरेने आपण वागवत आलोय मग उपकारांची जाण ठेवायची शतकापूर्वीच्या कोल्हापूरकरांची वृत्ती आजच्या पीढीतले कोल्हापूरकर बाणवण्यात का कमी पडतायत ?
| एकेकाळी ज्यांनी तोफांचा मार झेलला आज ते कचरा झेलतायत .. बालगोपाल तालमीकडे असणारा बुरुज ... |
| कधीही पडतील असे तटाचे अवशेष ... हे कुठल्यातरी अनगड किल्ल्यावरचे नाहीत , कोल्हापूर शहरातले आहेत .. |
| रविवारी पंचगंगेच्या घाटावर जमणाऱ्या स्वच्छता योध्यानी एखादा दिवस इकडं मोहरा वळवायला हरकत नाही... |
बिंदू चौकात दिसणारा एकमेव बुरुज सोडला तर बाकीचे अवशेष मात्र पर्यटकांची वाहने, कचरा ,पोखरणाऱ्या झाडांची मूळे, गवत आणि लघुशंका उरकणाऱ्या लोकांच्या गर्दीत हरवलेले दिसतात. त्यांची आजची अवस्था बघून वाटतंय की शतकापूर्वीच ते जमीनदोस्त झाले असते तर आजची अवकळा आली नसती.
आज बिंदू चौकात वावरताना या सर्व घडामोडींचा मागमूसही लागत नाही.मी मात्र कोल्हापूरात आल्यावर तटाच्या रस्त्यावरून जाताना पापाची तिकटी ओलांडून गंगावेशीकडे जायला निघतो तेंव्हा फर्ग्युसनच्या नावानं चांगभलं म्हणून मोकळा होतो!!!
--भारत पांडुरंग महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
Comments
Post a Comment