कोल्हापूरच्या डोंगरनादाचा उगम ...
साधारणपणे ५०-६० च्या दशकांमध्ये संगठीत गिर्यारोहणाने (Group Trekking) महाराष्ट्रात, विशेषकरून मुंबई, ठाणे आणि डोंबिवली भागात बाळसे धरायला सुरुवात केली. पुणे वगळता इतर जिल्हे या क्षेत्रात फार उशिरा आले. पण याला अपवाद होता कोल्हापूरचा.
पन्हाळा, जोतिबा हाकेच्या अंतरावर असलेल्या कोल्हापूरला तसं हे क्षेत्र नवीन नव्हतं. शिवरायांच्या पन्हाळा ते विशाळगड या ऐतिहासिक मोहिमेची शिदोरी कोल्हापूरकरांच्या पाठीशी गेली साडेतीनशे वर्ष होतीच. त्यामुळेच सुरुवातीला दोन चार जण एकत्र येऊन डोंगर दऱ्या फिरण्याचा हा जो नाद लागला तो आज व्यावसायिक तत्वावर चालणाऱ्या अनेक ट्रेकिंगच्या संस्थांमध्ये रूपांतरीत झालेला दिसतोय. पण आज वटवृक्ष झालेल्या या नादाची बीजे कोल्हापुरात कशी रुजली याचा हा आढावा..
कोल्हापूरातला कुठलाही ट्रेकर तुम्हाला रविवारी कुशिऱ्यातून पुढे जोतिबाच्या वाटेवर भेटेल, अगदी न चुकता. हा भटकंतीचा वारा इतका कानात भिनलेला असतो की जणू डोंगर दऱ्यांची साथ, आईच्या पोटातूनच हे लोक घेऊन आलेले असावेत. पण या मागे पुण्याई आहे ती गेल्या साठेक वर्षांपूर्वी कोल्हापूरात उभारलेल्या एका अपरिचित संस्थेची.
राजाराम कॉलेजचा गिर्यारोहण विभाग...
१९६० मध्ये जेंव्हा डोंगरांचं व्यसन असलेल्या संस्था मुंबई पुण्याची हद्द ओलांडून बाहेर यायच्या होत्या त्या काळात कोल्हापूरातल्या राजाराम कॉलेज मध्ये संगठीत गिर्यारोहणासाठी विशेष विभाग सुरू करण्यात आला. स्थापनेपासून १९७७ पर्यंत या विभागाकडून विद्यार्थ्यांच्या मोहिमा पन्हाळा, रांगणा ,गगनबावडा , वासोटा अशा ट्रेकिंगच्या दृष्टीने बेसिक समजल्या जाव्यात अशा किल्ल्यांवर काढल्या जात. आज जरी या मोहिमा इतक्या सोप्या वाटत असल्या तरी डोंगर फिरणे म्हणजे भिकेचे डोहाळे अशी मानसिकता असलेल्या काळात हे मोठे पाऊल होते, ते ही विध्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या सहभागातून..
जानेवारी १९७७.. कोल्हापूरातल्या गिर्यारोहणाने कूस बदलली...
राजाराम कॉलेजचे तीन विध्यार्थी श्री भुषण शेंडुरे, नागेशकर आणि पंडितराव यांनी सरळ कॉलेजच्या नकसदार इमारतीलाच रोप फिक्स केले आणि कोल्हापूराने पहिल्यांदाच रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, झूमारिंग यांची ओळख करून घेतली. कुस्ती आणि फूटबॉल या पलीकडेही रग जिरवायचा खेळ असतो याची जाणीव पंचगंगेच्या काठावर पहिल्यांदाच लोकांना झाली. ट्रेकिंगमध्ये अवघड समजले जाणारे असे प्रस्तरारोहणाचे कौशल्य राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूरकारणांसाठी खुले करून टाकले. पुढच्याच महिन्यात फेब्रुवारी १९७७ मध्ये पन्हाळा ते विशाळगड अशी मोहीम विध्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सहभागातून पार पडली. याच दरम्यान कॉलेज कडून विद्यार्थ्यांसाठी खास हॅवर सॅक शिवून घेतल्या गेल्या . कॉलेजचे नाव छापलेली सॅक घेऊन आता गिर्यारोहण विभाग नवनवीन मोहिमांसाठी सज्ज झाला .
हम भी कुछ कम नही म्हणत नंतरची विशेष मोहीम विद्यार्थिनींच्या पुढाकाराने पार पाडली गेली, गारगोटी ते मिणचे. Ladies Special अशा या मोहिमेला विशेष प्रसिद्धी मिळाली ती दै. पुढारीचे पत्रकार श्री मोहन हवालदार यांच्यामुळे. याच मोहिमेपासून स्फूर्ती घेऊन हवालदार आणि इतर काही राजरामियन यांच्या सहभागातून उभी राहिली कोल्हापूर जिल्हा गिर्यारोहण संस्था. व्यावसायिक तत्वावर चालणारी ही कोल्हापूरातली पहिली संस्था.
पण तो पर्यंत कॉलेजमधून बाहेर पडलेलले इतर काही राजरामीयन आपल्याबरोबर तीन चार जण घेऊन नाशिक पर्यंतच्या खाजगी मोहिमा काढण्यात पारंगत झाले होते. आज जे कोल्हापूरात ट्रेकिंगचं वारं पसरलेलं दिसतंय त्याच श्रेय या खाजगी मोहिमाना निश्चितपणे आहे. पण group trekking श्रेय मात्र निर्विवाद पणे राजाराम कॉलेजच्या गिर्यारोहण विभागालाच जातं.
पुढची दाजीपूर ते गगनगड ही मोहीम स्थानिक वाटाडे मदतीला घेऊन विक्रमी संख्येने विध्यार्थ्यांनी पार पाडली, भर पावसाळ्यात. आता पोटभर अनुभव गाठीला आलेला होता. कॉलेजला सह्याद्री पलीकडचे डोंगर खुणावत होते. आणि मोहीम आखली गेली ती सरळ हिमालयात. किशतवाड भागात कॉलेजच्या १५ विद्यार्थ्यांनी ही मोहीम यशस्वी केली.
चढलेला डोंगर ज्या प्रमाणे उतरावा लागतो त्याच प्रमाणे कौतुकाचे आणि धाडसांचे शिखर गाठलेल्या या संस्थेला नंतरच्या काळात उदासीनता आली. यातून बाहेर पडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. कॉलेजतर्फे प्रा. ब. शि. कुलकर्णी आणि प्रा. म. पं. पाटील यांनी कळसुबाई ते अनाईमुडी अशी दोन हजार किलोमीटरची मोहीम वेगवेगळ्या टप्प्यात आखली. अत्यंत धाडसी अशी ही खर्चिक मोहीम पैशाअभावी रखडली.
काळ बदलत गेला तसा कॉलेजचा हा विभाग नामधारी बनत गेला. पण तोपर्यंत त्या विभागाने तयार केलेले डोंगरयात्री स्वतंत्रपणे मोहिमा काढू लागले होते. या खाजगी मोहिमा म्हणजे या झाडाला लागलेली फळेच होती. त्यामुळेच आज कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात ज्या ट्रेकिंगच्या अग्रगण्य संस्था आहेत त्यांचा धागा कुठल्याना कुठल्या रूपाने राजाराम कॉलेजच्या गिर्यारोहण विभागाशी जुळलेला आढळेल.
डोंगरात भटकणे म्हणजे माती खाणे अशा मानसिकतेतून बाहेर पडलेला कोल्हापुरातला हा बदल येत्या काही दिवसातच कु. कस्तुरी दीपक सावेकर च्या रूपाने हिमालयात एव्हरेस्ट सर करेल तेंव्हा कोल्हापूरच्या गिर्यारोहण क्षेत्रातला तो सर्वोच्च शिरपेच ठरेल. एव्हरेस्टला गवसणी घालणाऱ्या कोल्हापूरकरांच्या या डोंगराच्या नादाची सुरुवात कुठून झाली असावी हे सांगण्याचा हा एक लहानसा प्रयत्न...
भारत महारुगडे,
मु. पो. करवीरनगरी
९८२२४४९८५६
![]() |
| राजाराम कॉलेज गिर्यारोहण विभाग .. सन १९७६. खुद्द प्राचार्य भ गो देशमुख (कोट टाय घातलेले ), कॉलेजची हॅवर सॅक पाठीला लावून मोहिमेच्या तयारीत उभे दिसतात . |

पूर्वाश्रमीचे हेच बाळकडू तुमच्यात उतरले आहे. लेख असो वा ट्रेक, उत्तमपणे सादर करणे हे कसब आपण मिळवले आहे. त्यात उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा!!
ReplyDeleteखूप छान लिहिलंयस मित्रा..हाडाचा संशोधक आहेस खरा..
ReplyDeleteआताच वाचले.
ReplyDeleteगोष्ट मोठ्या डोंगरा एवढी.