कोल्हापूरला,आजचं कोल्हापूर बनवणारा अजनबी ...वॉल्टर मार्डन डकेट RE ...


 "Why Seek Ye The Living Among The Dead, He Is Not Here."

स्पेनमधल्या एका कबरीवर असलेलं एक सुंदर अर्थपूर्ण वाक्य. भावार्थ असा, "या कबरीत निजलेला तुम्हाला या मुडद्यांचा जगात सापडणार नाही, तो तुम्हाला तुमच्याच जिवंत जगात आजूबाजूला सापडेल." आणि खरोखरच या कबरीतला माणूस आपल्याला दररोज ठिकठिकाणी कोल्हापूरात भेटतो, ते ही गेले दीडशे वर्ष !


वॉल्टर मार्डन डकेट, RE. इंग्रजी नोकरशाहीच्या PWD खात्यातला, रॉयल इंजिनीअर्स (RE) च्या अंतर्गत काम करणारा एक लष्करी अभियंता. Royal Engineers, Bombay आणि Royal Engineers, Bengal या दोन विभागांनी अचाट कामं करून सम्राज्यशाहीच्या ताब्यातून मिळवलेला भारताचं रूप पालटून टाकलं. काय काय उभं केलं नाही त्यांनी ? रस्ते, घाट,पूल, शासकीय इमारती, बंदरं, बागा,रेल्वे स्टेशन्स. थोडक्यात आज रोजच्या आपल्या वावरातल्या अनेक सोयीची सुरुवात RE नी करून दिली. स्वतःच्या नावापुढं RE ही अक्षर लागणे म्हणजे भूषण होतं  त्या काळात .आणि याच RE, Bombay तर्फे 1872 साली मेजर पदावर बढती मिळून वॉल्टर डकेटची Excecutive Engineer म्हणून नेमणूक झाली ती कोल्हापूरात...

तो पर्यंत डकेटने एडनहुन (आफ्रिका) मुंबईत येऊन Land Reclaimation, Prong's Lighthouse सारखे महत्वाचे प्रोजेक्टस यशस्वीपणे पूर्ण केलेले होते. आता डकेटची कारकीर्द कोल्हापुरात बहरणार होती .

त्यावेळचं कोल्हापूर नजरेसमोर आणा. एक तटबंदी-बुरुजांनी बंदिस्त असे एक मध्ययुगीन शहर. अत्यंत दाटीवाटीची वस्ती. अरुंद रस्ते. आल्याआल्या डकेट भिडला ते राजाराम हायस्कूलच्या कामाला (जुन्या राजवाड्याच्या नगारखान्याच्या बाजूची वास्तू). चार्ल्स मॅन्ट या मुरब्बी वास्तुकाराने कल्पना केलेली इमारत डकेटने उभा करून दाखवली (१८७४).

राजाराम हायस्कुल, कोल्हापूर  ...

मॅन्ट-डकेट जोडगोळीचं पुढचं काम म्हणजे टाऊन हॉलची उभारणी(१८७६). याच टाऊन हॉलच्या ७ एकरावर पसरलेल्या (तेंव्हा) बागेचं डिझाईन आणि उभारणी मात्र डकेटने एकट्याने केली. या बागेतल्या मध्यावरचा कारंजा डकेटच्या कल्पनाशक्तीची झेप दाखवतो.

टाऊन हॉल, कोल्हापूर 

याच सुमाराला भारतातली शहरं रस्तामार्गाने जोडण्याची मोहीम Royal Engineers ने सुरू केली. आणि डकेटच्या आयुष्यातला माईलस्टोन ठरणारा प्रोजेक्ट डकेटने सुरू केला. 

शिवाजी पूल किंवा ब्रम्हपुरी पंचगंगा पूल  (तत्कालीन नाव) आणि आंबा घाट. (१८७४-१८७८). 

त्यावेळी डकेटच्या हाताखाली काम करणाऱ्या रॉबिनसन नावाच्या इंजिनिअरने पुल आणि घाटाच्या बांधकामादरम्यानच्या आठवणी, calculations वर काही व्याख्याने दिली आहेत. त्यात डकेटचं Civil Engineering Skill किती excellent होतं आणि या बांधकामादरम्यान अचानकपणे येणाऱ्या अडचणींवर engineering way ने वेळोवेळी कशी मात केली हे रॉबिनसन ठासून सांगतो. पंचगंगेला येणाऱ्या पुराचा सर्व्हे करून पिलर्सची उंची , घाटातली minimum turning radius कशी अभ्यास करून निश्चित केली याबद्दल रॉबिनसन अगदी खुलून सांगतो. या पुलाची आणि आंबा घाटाची काही  Basic Engineering Drawings बघण्याचे भाग्य मला मिळाले आहे.


शिवाजी पूल, कोल्हापूर 



शिवाजी पुलावरची डकेटच्या नावाची कोनशीला ... 


डकेटचं पुढचं काम म्हणजे रंकाळा संवर्धन आणि पाणीपुरवठा योजना. तेंव्हा १८७७ चा दुष्काळ कोल्हापूरात सुरू झालेला होता. आणि हा प्रोजेक्ट एका दुहेरी जबाबदारीने डकेट ने पेलला आणि यशस्वी करून दाखवला. याच कामादरम्यान डकेटला कर्नल म्हणून बढती मिळाली. या प्रोजेक्टअंतर्गत रंकाळ्याचं सुशोभिकरण तर होतंच पण शहरासाठी रंकाळ्याचं पाणी पुरवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा उभा करायचं होतं.

आज रंकाळ्याच्या बाजूची भिंत आणि त्यावरचे नक्षीदार स्तंभ, टॉवर , फुटपाथ या अंतर्गत उभारले गेले आणि कोल्हापूरच्या समाजजीवनात अमर होऊन गेले. डकेटच्या engineering skill बद्दल मी स्वतः एक engineer म्हणून आवडलेली गोष्ट सांगतो. जेंव्हा आपण रंकाळ्याच्या भिंतीवर बसतो तेंव्हा त्या भिंतीच्या वरच्या भागाची रुंदी आणि angle काही अशाप्रकारे design केलेत की बसणाऱ्या माणसाला मागे पाण्यात पडण्याची शक्यता अजिबात वाटत नाही.

पाणी पुरवठा करण्यासाठी जवळपास १० मैल लांबीची पाईपलाईन, २३३ पाण्याची आउटलेट्स, धुण्याच्या चाव्या इतका सगळा पसारा एकेकाळी कोल्हापुरात उभा करण्यात आला. आज हा सगळा ऐवज कुठे गडप झालाय कुणाला माहीत ? (या रंकाळा बांधकामादरम्यानच्या बऱ्याच मजेशीर आठवणी माझ्या संग्रहात आहेत.)


रंकाळा टॉवर ...


रंकाळ्यावर राजघाटावरची डकेटच्या नावाची कोनशीला ... 

डकेटच्या कार्यकालादरम्यानच कोल्हापूरची तटबंदी पाडायला सुरुवात झाली आणि शहराने आजचा चेहरा धारण करायला सुरुवात केली.कोल्हापूरच्या वास्तव्यातंच डकेटने गोकाक येथील पाण्यावर चालणाऱ्या कॉटन मिलचे काम पूर्ण केले.

१८७९ च्या दरम्यान डकेटची बदली पुण्यात झाली. पुण्यातही आजची फुले मंडई, पेशवे दप्तर अशी चिरंतन कामे डकेट करत राहिला. यथावकाश डकेट लंडनला गेला आणि तिथे त्याच्या skillset आणि experience ला अनुसरून कामे करत राहिला . 

कोल्हापुरातल्या त्याच्या कामाची व्याप्ती बघितली तर लोकोपयोगी अशा सर्व प्रकारच्या प्रोजेक्ट्स मध्ये त्याचा सक्रिय सहभाग असलेला दिसून येतो .कोल्हापूरला आजचं कोल्हापूर बनवणारा हा शिल्पकार आयुष्यात येणाऱ्या बदलांना सामोरे जात कोल्हापूरातून गेला पण आपल्या कामाची अमीट अशी छाप इथल्या समाजजीवनावर सोडूनच. डकेटने उभ्या केलेल्या वास्तू आता इतक्या सवयीच्या झाल्या आहेत की त्यांच्याशिवाय कोल्हापूरची कल्पना होऊ शकत नाही. काळाच्या ओघात डकेट विसरला गेलाय पण त्याची creations अजरामर ठरलीत.


ता.क.

डकेटची आठवण येऊन हा लेख लिहिण्यामागचं कारण सांगतो.

सहा महीने लॉकडाऊन नंतर कोल्हापूरात आल्यावर अचानकपणे मला डकेट भेटला. 

CPR समोरून बावड्याला जाताना भावसिंगजी रोडवर जितीचा ओढा ओलांडताना पुलावर डकेट भेटला.

दगडी बांधकामांचं Victorian age मधलं सुंदर उदाहरण असणारा हा पूल म्हणजे डकेटने कोल्हापूरला दिलेली अजून एक भेट. जुन्या कागदोपत्री याची नोंद फक्त जुना पूल अशीच आहे. कुणी याच बांधकाम केलं याबद्दल कुठेही नोंद कदाचित केलेली नाही. न्यू पॅलेसचं सुरू असलेलं बांधकाम आणि इंग्रजांची रेसिडेन्सी यांना सोयीचं व्हावं म्हणून हा पूल डकेटने बांधलेला दिसतोय.

 पुलाच्या चारही कोनशीला ज्यावर मेजर डकेटचं नाव आहे ,रस्त्यावरच्या डांबरी थरात खाली गेलेल्या आहेत. मरणाची धूळ आणि कचरा यामुळे त्या कोनशीला ओळखू येत नाहीत. मी जमेल तशी साफसफाई करून फोटो येण्याइतपत त्या स्वच्छ केल्या. त्यावेळी येणारेजणारे वेड लागलेल्या माणूस म्हणून माझ्याकडे बघत होते हे सांगायला नको.

जुन्या पुलावरची डकेटच्या नावाची कोनशीला 


जुन्या पुलावरची डकेटच्या नावाची कोनशीला  


डकेटच्या कबरीवर लिहिल्याप्रमाणे तो त्याच्या कबरस्थानात भेटत नाही. 

डकेट भेटतो राजाराम हायस्कुलचं जाळीदार नकसकाम बघताना.

डकेट भेटतो टाऊन हॉलच्या बागेत दुपारी उन्हाची विश्रांती घेताना.

डकेट भेटतो रंकाळ्यावर भिंतीवर बसून टॉवरकडे बघताना.

डकेट सुरक्षितपणे पंचगंगापार करून देतो. 

डकेट आंबा घाटातून सुखरूप कोकणात पोचवतो. 

असा डकेट , जुन्या पुलावर अडगळीत पडलेल्या कोनशीलेवरही भेटतो. 


-----फक्त आपणच त्याला ओळखू शकत नाही.


डकेटची कबर, स्पेन   



© भारत पांडुरंग महारुगडे ,

९८२२४४९८५६

मु. पो. करवीर नगरी 


संदर्भ :

1. Road Making in Western India - Robinson

2. British Library London.

3. कोल्हापुरात अनेक जुन्या वास्तूंवर असलेल्या पण अडगळीत पडलेल्या कोनशिला ..


Comments

  1. Great my dear..आपण ज्यांनी आपलं शहर सुंदर बनवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले त्यांना विसरता कामा नये..डकेटचं कार्य सनोर आणून तू मोठं काम केलंयस मित्रा..लिहित राहा..!!

    ReplyDelete
  2. भारत दादा,
    नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण, तांत्रिक तपशीलासहित बौद्धिक व सामाजिक माहितीत भर टाकणारा लेख...
    कोल्हापूरातील सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या, पण नुसता वापरून वाट लावलेल्या असंख्य वास्तु आणि त्यांंच्या शिल्पकारांना उजेडात आणण्याच्या तुझ्या धडपडीला, मेहनतीला मनापासून सलाम...

    ReplyDelete
  3. छान 👌

    मी इतकी वर्षे कोल्हापूर मध्ये राहत असूनही याबद्दल काहीच माहिती नव्हती.

    धन्यवाद!!🙏

    ReplyDelete
  4. खूप माहितीपूर्ण लेख, आपण हा वारसा जपला पाहिजे 🙏🙏

    ReplyDelete
  5. भारत,नमस्ते...
    लै भारी लिवलंय बग. कोल्हापूर मधून सांगलीच्या वालचंद ला तू अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून पुण्यात कार्यरत झालास पण कोल्हापूर ची नाळ तुटू दिली नाहीस.
    Love belly चे शल्यचिकित्सा चे पुस्तक म्हणजे एम बी बी एस चे शिक्षण घेताना चे एक छान पुस्तक.त्यातली एक *फूट नोट* आहे....
    *Eyes will not see what the mind does not know*.
    भारत ! तुझ्या मनाला माहिती समजून घ्यायची समज आहे म्हणूनच तुझ्या डोळ्यांना हे सगळं दिसतंय.
    ब्रिटिश लायब्ररीतून कोल्हापूर ची माहिती तू मिळवलीस आणि कितीतरी झाकून राहिलेली कोल्हापूर ची माहिती तुला मिळाली.
    *खुल जा सिम सिम* सारखी आलिबाबाची गुहा तुला मिळाली.
    भारत! तुझा अभिमान आणि गर्व वाटतो की ही गुहा तू सगळ्यांना *ब्लॉग* मधून खुली करून ठेवलीस.
    खूप लिहीत रहा आज ब्लॉग च एक छान पुस्तक तयार करून प्रसिद्ध झालं की पर्वणी असेल पुढच्या पिढीला...
    खूप खूप शुभेच्छा...
    काही वेळापूर्वी तुझ्याशी फोन वरून बातचीत झाली.आणि कोल्हापूर च्या वैद्यकीय संघटनेच्या( कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे) अध्यक्षांचा , डॉ आबासाहेब शिर्के,भुलशास्त्र तज्ञ यांचा फोन आला,की
    भारत पांडुरंग महारुगडे ला के एम ए कट्टा ला बोलवूया.... *डॉक्टर्स ना कोल्हापूर ची ओळ्खकरून देऊ दे भारत ला*..
    फोनवरून आमंत्रण देईनच पण इथूनच देतोय आमंत्रण.
    तू नक्की येशील के एम ए कट्ट्यावर बोलायला....
    तुझा भटक्या मित्र,
    डॉ किरण.
    डॉ किरण भिंगार्डे, भुलशास्त्र तज्ञ कोल्हापूर.

    ReplyDelete
  6. खुप मत्वची माहिती आपण दिलीत. त्या बद्दल भरत साहेब आपले आभार.

    ReplyDelete
  7. छान ,अभ्यासपूर्ण माहिती देणारा लेख ,शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. उत्तम माहीत मिळाली

      Delete
  8. हे जर कोल्हापुर महानगरपालिकेने व्यवस्थीत पणे कर्तव्य करत सांभाळून ठेवा ठेवला .तो पाॅलीशवाले लोकांना घेऊन स्वच्छ धुवून घ्यावीत म्हणजे कोल्हापुर वैभवात आणखी मानाचे तुरे लागण्यास वेळ लागणार नाही पुरातन वास्तु जतन होईल व पय॔टन लोकांना कोल्हापुर बद्दल माहिती मिळेल .तरी भरतराव आपणास शतस प्रमाण

    ReplyDelete
  9. खुप छान अत्यंत सुंदर अभ्यास पूर्ण लिहिले आहे त्याबद्दल अभिनंदन आहे

    ReplyDelete
  10. खुप छान माहिती दिली आहे.

    ReplyDelete
  11. 🙏खूप छान माहिती 🙏

    ReplyDelete
  12. खूप छान माहिती 🙏

    ReplyDelete
  13. अतिशय माहितीपूर्ण लेख��❤️����

    ReplyDelete
  14. खूपच छान अगदी वाचनीय

    ReplyDelete
  15. खूपच छान माहिती
    अत्यंत अभ्यासपूर्वक माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा
    Er. D. V. Shah
    New shahupuri, kolhapur 9271751098

    ReplyDelete
  16. The article is very informative and inspiring for present engineers aiming challenging projects .

    ReplyDelete
  17. अप्रतिम लेख. डकेत चे काम अतुलनीय आहे. ते अमर राहील. या लेखातून त्याविषयी कृज्ञतापूर्वक उल्लेख करून कोल्हापूरची प्रतिमा आणखी उजळली गेली आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  18. खुप अभ्यासपूर्वक माहिती दिली...शतशः आभार सर 🙏🙏

    ReplyDelete
  19. सुंदर कोल्हापूर बनवण्यात कोणाचा वाटा आहे हे आज कळाले,
    ही माहिती पुरविल्या बद्दल आपले मनापासून आभार .

    ReplyDelete
  20. कोल्हापूरच्या सौदर्याचे नावीन्य या माहीतीच्या आधारे समजले .छान माहिती मिळाली . आपले धन्यवाद .

    ReplyDelete
  21. Very Nice Bharat

    ReplyDelete
  22. भरतजी,खूप खूप छान,माहितीपूर्ण लिखान.
    जुन्या कोल्हापूर बद्दल आस्था असणा-या प्रत्येक कोल्हापूर वासियांसाठी अभिमानास्पद वाटावा.हा वारसा होण्यासाठी नक्कीच प्रयत्न व्हावेत असे वाटते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सिंक्लेअरचा बंगला ... The Palace of Sinclair...

लक्ष्मी विलास : कोल्हापूरच्या माणुसकीचा जिवंत दस्तऐवज...

ब्रम्हस दानं धर्मगुतेत कारितं !!!